वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

गेल्या काही वर्षात भारताच्या थेट परकीय गुंतवणुकीत झपाट्याने वृद्धी -पियुष गोयल


संरक्षण आणि किरकोळ व्यापार क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी वाणीज्य मंत्र्यांचे दक्षिण कोरियाला निमंत्रण

Posted On: 12 NOV 2021 8:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर 2021

वाणीज्य आणि उद्योग, वस्त्रोद्योग, ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी आज सांगितले की, गेल्या काही वर्षामध्ये भारताच्या थेट परकीय गुंतवणुकीत झपाट्याने वृद्धी होत आहे.

सीआयआय-केआयटीए यांच्या वतीने आयोजित भारत-कोरिया व्यावसायिक भागीदारी मंचाच्या वतीने चौथ्या आवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये बोलताना पियुष गोयल म्हणाले, भारत आज गुंतवणुकीसाठी एक आकर्षक आणि सर्वांच्या पसंतीचे स्थान बनला आहे.

संरक्षण आणि किरकोळ व्यापार यासारख्या नवीन क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दक्षिण कोरियाच्या उद्योजकांना पियुष गोयल यांनी आमंत्रित केले.  ‘‘आम्हाला ऑटोमोबाईल्स, वस्त्रोद्योग, अन्न प्रक्रिया, चामड्याची उत्पादने, धातू, खनिजे, रसायने यांच्याबरोबरच पोलादासारख्या आमच्या काही पारंपरिक क्षेत्रांमध्ये पूरक सामर्थ्य वाढवायचे आहे. तसेच संरक्षण, ई-कॉमर्स आणि किरकोळ क्षेत्रामध्ये नवीन उदयोन्मुख संधी पाहण्याची आवश्यकता आहे.’’

वाणीज्य मंत्री गोयल यावेळी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचे सन्माननीय राष्ट्रपती मून यांनी कौतुक करून नवीन दक्षिणी धोरण म्हणून त्याचे समर्थनही केले आहे. कुशल मनुष्यबळ, कमी किंमतीमध्ये उपलब्ध होणारे उत्पादन आणि भारतातल्या व्यवसायांना मिळणारा सरकारचा पाठिंबा अशा सगळ्या गोष्टींचा स्पर्धात्मक आणि तुलनात्मक लाभ घेऊन भारताने मेक इन इंडियासाठी देऊ केलेल्या संधींचा कोरियाच्या अनेक कंपन्यांनी फायदा घेतला आहे.

‘‘संपूर्ण खंडाला औषधांचा आणि लसींचा  पुरवठा केल्यामुळे आमची ओळख आता औषध निर्माता देश म्हणून सर्वांना झाली आहे, असे सांगून पियुष गोयल पुढे म्हणाले, आगामी वर्षात आम्ही पाच अब्ज लसींचे उत्पादन करण्याची सिद्धता केली आहे. आणि लसीकरणानंतर जगभरातल्या लोकांची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्याची योजना आम्ही तयार करीत आहोत.

पियुष गोयल यावेळी म्हणाले, आपल्या अर्थव्यवस्थेने पुन्हा उसळी घेतली आहे. कदाचित जगभरामध्ये सर्वात वेगवान विकासदर गाठणाऱ्यांपैकी ती असणार आहे. आपला निर्यातीचा दर सातत्याने उच्चांक निर्माण करीत आहे. आत्मनिर्भर भारताचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने आपण  आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करीत आहोत.

सरकारने उद्योग आणि सेवांना पाठिंबा देण्यासाठी अनेक धोरणात्मक उपाय योजना केल्या आहेत, असेही गोयल यांनी यावेळी सांगितले.

 

S.Patil/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1771324) Visitor Counter : 222