नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जेएनपीटी बंदरातील रस्त्यांच्या सिमेंटीकरण प्रकल्पाचे उद्या जहाज वाहतूक मंत्री उद्‌घाटन करणार

Posted On: 12 NOV 2021 5:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर 2021

 

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते उद्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) मधील रस्त्यांच्या सिमेंटीकरण प्रकल्पाचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे. त्यांच्या हस्ते जेएनपीटी रूग्णालयातल्या वैद्यकीय ऑक्सिजन प्रकल्पाचे लोकार्पणही करण्यात येणार आहे. यावेळी लहान बंदराच्या उपक्रमातल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स (बीएमसीटीपीएल)च्या कामाचा आढावाही ते घेणार आहेत. यासंदर्भात ईओडीबी, लहान कंटेनर्स, वाधवा पोर्टस्, आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामाविषयीचे सादरीकरण करण्यात येणार आहे. बंदराच्या कामासंदर्भात संबंधितांबरोबर मंत्र्यांच्या बैठकांचे आयोजन  करण्यात आले आहे.

नवी मुंबई येथे असलेले  जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारतातले कंटेनर हाताळणी करणारे प्रमुख मालवाहतूक बंदर आहे. देशाच्या एकूण मालवाहतुकीपैकी जवळपास 50 टक्के कंटेनरकृत मालवाहतूक या बंदरातून होते. 26 मे, 1989 पासून या बंदरातून मालवाहतूक केली जात आहे. तीन दशकांच्या कार्यानंतर जेएनपीटी  ‘बल्क कार्गो टर्मिनल’मधून आता देशातले प्रमुख कंटेनर बंदर झाले आहे. जेएनपीटी बंदर जगातल्या 200पेक्षा जास्त बंदरांना जोडले गेले आहे. जागतिक स्तरावर  शीर्ष 100 कंटेनर बंदरांच्या सूचीमध्ये या बंदराचा 33 वा क्रमांक आहे.

सध्या जेएनपीटी बंदरामध्ये पाच टर्मिनलवरून मालवाहतूक केली जाते. यामध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट कंटेनर टर्मिनल (जेएनपीसीटी), न्हावाशेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल (एनएसआयसीटी), गेटवे टर्मिनल्स इंडिया प्राय. लिमिटेड (जीटीआयपीएल), न्हावाशेवा इंटरनॅशनल गेटवे टर्मिनल (एनएसआयजीटी), आणि नव्याने सुरू झालेले भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेड (बीएमसीटी) यांचा समावेश आहे. या बंदरामध्ये सामान्य मालवाहतुकीसाठी उथळ पाण्यावर ‘बर्थ’ ची सुविधा आहे तसेच लिक्विड कार्गो टर्मिनल असून त्याचे व्यवस्थापन अीपीसीएल -आयओसीएल यांच्यामार्फत करण्यात येत आहे. चौथे कंटेनर टर्मिनल  विकसित करण्यात येत असून त्याचे काम दोन टप्प्यात करण्यात येत आहे. यामध्ये पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून तिथून मालवाहतुकीसंबंधीचे व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. तर दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण होवून, तिथे 2022-2023 मध्ये प्रत्यक्ष कामकाज सुरू होईल असे अपेक्षित आहे. या दुसऱ्या टप्प्याच्या कामामध्ये 2,000 मीटर लांबीच्या धक्क्याचे काम होणार असून यामुळे वार्षिक क्षमतेत 4.8 दशलक्ष टीईयूची वृद्धी होणार आहे.  जेएनपीटीने आंतरराष्ट्रीय भांडवल आणि उत्पादन क्षेत्रातल्या जगातल्या दिग्गजांना आकर्षित करण्यासाठी 277 हेक्टर क्षेत्रामध्ये बहुउत्पादन ‘सेझ’ विकसित केले आहे. याशिवाय जेएनपीटी वाढवण येथे  सॅटेलाईट पोर्ट विकसित करीत आहे. तसेच मुख्य शहरांपासून काहीशा दूर असणाऱ्या भागात औद्योगिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी जेएनपीटीच्या वतीने जालना, वर्धा, सांगली आणि नाशिक येथे प्रत्येकी एक अशा, चार ड्राय बंदराचा विकास करण्यात येत आहे. जेएनपीटीने देशातल्या  व्यापारी आणि वाणिज्य व्यवहारासाठी एक प्रमुख घटक म्हणून मजबूत स्थान निर्माण केले असून जगभरात सर्वत्र विनाखंड सेवा देण्यासाठी जेएनपीटी कटिबद्ध आहे.

 

N.Chitale/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1771247) Visitor Counter : 288