वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
पियुष गोयल करणार IITF अर्थात भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे उद्घाटन
Posted On:
10 NOV 2021 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर 2021
भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2021 चे उद्घाटन वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री पियुष गोयल यांच्या हस्ते 14 नोव्हेंबर 2021 रोजी नवी दिल्लीच्या प्रगती मैदानात होणार आहे. 40 व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात, असंख्य व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या संधींसाठी एक आदर्श गंतव्यस्थान म्हणून भारत ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (ITPO) भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. यावर्षी, भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत असलेल्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ या उत्सवासोबत या मेळ्याला विशेष महत्त्व आहे.
प्रगती मैदान येथील नवीन प्रदर्शन संकुलासह या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या आयकॉनिक इंटरनॅशनल एक्झिबिशन-कम-कन्व्हेन्शन सेंटर (IECC) प्रकल्पाचा अविभाज्य घटक असल्याने, संकुलात 13 ऑक्टोबर 2021 रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या चार नवीन आधुनिक प्रदर्शन सभागृहांचा समावेश आहे.
हा मेळा "आत्मनिर्भर भारत" या संकल्पनेवर केंद्रित आहे, ज्याचा उद्देश विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आणि आत्मनिर्भरतेला चालना देण्यासाठी देशांतर्गत मागणी पूर्ण करणे आणि जागतिक पुरवठा साखळी परिसंस्थेचा एक भाग बनणे हा आहे.
कोविड-19 महामारीमुळे सर्व अडचणी असूनही उत्कृष्ट कामगिरी करण्याची अनुकरणीय वचनबद्धता दर्शवणाऱ्या भारतीय उद्योजकांच्या उत्कृष्ट कामगिरीवर हा मेळा प्रकाश टाकतो. महत्त्वाचे म्हणजे, IITF ‘वोकल फॉर लोकल’ मोहिमेअंतर्गत भारतीय उत्पादनांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये नूतनीकरणाचा आत्मविश्वास आणि जोम निर्माण करण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ देते.
हा कार्यक्रम सर्व कोविड नियमावलीसह निर्धोक आणि सुरक्षित वातावरणात आयोजित केला जाईल.
भारत आणि परदेशातील जवळपास 3,000 प्रदर्शकांसह, IITF 2021 चे आयोजन एकूण 70,000 चौरस मीटर क्षेत्रावर केले जात आहे जे 2019 मधील मागील मेळ्याच्या जवळपास तिप्पट क्षेत्र आहे. बिहार भागीदार राज्य आहे, तर उत्तर प्रदेश आणि झारखंड राज्यांवर लक्ष्य केंद्रित असेल.
अफगाणिस्तान, बांगलादेश, बहरीन, किर्गिझस्तान, नेपाळ, श्रीलंका, संयुक्त अरब अमिरात, ट्युनिशिया आणि तुर्की या देशांचा यामध्ये सहभाग आहे.
S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1770779)
Visitor Counter : 248