संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोवा सागरी परिसंवाद -2021


सागरी व्यवहारांचे महत्त्व विचारात घेण्यासाठी भारतीय नौदलाचा पुढाकार

Posted On: 10 NOV 2021 8:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर 2021

07 ते 09 नोव्हेंबर 2021 या कालावधीत गोवा येथे यशस्वीरित्या आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या गोवा सागरी परिसंवादामध्ये  बांगलादेश, कोमोरोस, इंडोनेशिया, मादागास्कर, मलेशिया, मालदीव, मॉरिशस, म्यानमार, सेशेल्स, सिंगापूर, श्रीलंका आणि थायलंड या हिंद महासागर क्षेत्राच्या तटीय प्रदेशातील नौदल प्रमुख/ सागरी संस्थांचे प्रमुख एकत्र आले. गोवा सागरी परिसंवादाच्या या वर्षीची संकल्पना सागरी सुरक्षा आणि भविष्यातील अपारंपारिक आव्हाने : हिंद महासागर क्षेत्र नौदलाच्या  सक्रिय भूमिकेसाठी एक अभ्यास ही होती. सागरी क्षेत्रात ‘दैनंदिन शांतता राखण्यासाठी आव्हानांवर मात करण्याची’ गरज लक्षात घेऊन ही तयार करण्यात आली होती.

परिसंवादाला संबोधित करताना, संरक्षण सचिव श्री अजय कुमार यांनी गोवा सागरी परिसंवाद (GMC) हा हिंदी महासागर क्षेत्रामध्ये (IOR) भारताच्या रचनात्मक सहभागाचे प्रतीक असल्याचे सांगितले. संरक्षण सचिवांनी नमूद केले की सागरी सुरक्षा आणि आर्थिक समृद्धी अनादी काळापासून परस्परसंबंधित आणि एकमेकांवर अवलंबून आहेत. सागरी सुरक्षेसाठी बहुलवादी सहकार्याला चालना देण्यासाठी IONS, IORA, BIMSTEC, कोलंबो सुरक्षा परिसंवाद इत्यादी विधायक सहभागांनी बजावलेल्या भूमिकेवरही त्यांनी भर दिला. परराष्ट्र सचिव श्री हर्षवर्धन श्रृंगला, यांनी त्यांच्या बीजभाषणात सागरी वाहतूक आणि लॉजिस्टिक हे नील अर्थव्यवस्थेचे प्रमुख घटक असून ते विशेषतः हिंदी महासागर क्षेत्रातील देशांसाठी महत्त्वाचे असल्याचा पुनरुच्चार केला.

विविध शिष्टमंडळ स्तरावरील चर्चांमध्ये प्रख्यात विद्वान, विषय तज्ञ आणि अनुभवी नौदल अधिकारी यांचे समृद्ध योगदान आढळून आले ज्यामध्ये गोवा सागरी परिसंवाद -2021 संकल्पनेशी संबंधित अंतर्दृष्टी, विचारप्रवर्तक कल्पना आणि संभाव्य उपाय मांडले गेले. नौदल प्रमुखांच्या हस्ते ‘मेक इन इंडिया’ संरक्षण आणि शिपयार्ड पॅव्हेलियनचे उद्घाटनही करण्यात आले, ज्यामध्ये DPSU/खासगी शिपयार्ड्स उदा. M/s MDL, GSL, L&T आणि चौगुले ग्लोबल, गोवा यांनी त्यांच्या जहाजबांधणी क्षमतांचे प्रदर्शन केले. भेट देणार्‍या शिष्टमंडळांना हिंद महासागर क्षेत्राकरिता पाणबुडी बचाव यंत्रणेला चालना देण्यासाठी भारतीय नौदलाच्या डीप सबमर्जन्स आणि रेस्क्यू व्हेसेल (DSRV) क्षमतेचे प्रात्यक्षिक देखील देण्यात आले, तसेच भारताच्या स्वदेशी बनावटीच्या जहाजबांधणीचे प्रदर्शन करण्यासाठी ऑनबोर्ड गाइडेड मिसाइल डिस्ट्रॉयर INS कोचीचा दौरा देखील करण्यात आला.

गोवा सागरी परिसंवादात संवादाच्या पलीकडे जाऊन ठोस परिणामांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे मत समारोप सत्रात नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग यांनी व्यक्त केले. त्यांनी भविष्यातील परिसंवादांसाठी चार मार्गदर्शक तत्त्वे प्रस्तावित केली, उदा., पुनरावृत्ती आणि वाढीव नफा, पूरक गोष्टी करणे, एकत्रित आणि लक्ष्य निर्धारित कार्यान्वयन आणि सर्वात शेवटी विद्यमान क्षमतांचे कौशल्य वर्धन करणे आणि त्या वाढवणे.

या वर्षाच्या सुरुवातीला गोवा सागरी परिसंवाद 21 मध्ये निर्धारित केल्या गेलेल्या ‘सामान्य सागरी प्राधान्यक्रमांची’घोषणाही या परिसंवादात झाली.

गोवा सागरी परिसंवाद 21 च्या समारोप प्रसंगी सर्व राष्ट्रांनी योगदानयोग्य उपक्रमांवर एकत्रितपणे काम करण्यासाठी प्रयत्न करण्यास आणि भविष्यातील परिसंवादात पुढील रचनात्मक उपक्रम पुढे नेण्याचे मान्य केले.

 

S.Patil/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1770751)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil