संरक्षण मंत्रालय
दुहेरी वापराच्या तंत्रज्ञानाच्या विकासासंबंधीच्या द्विपक्षीय नवोन्मेष करारावर डीआरडीओ आणि इस्राईलचे संरक्षण आणि संशोधन विकास महासंचालनालय यांनी केल्या स्वाक्षऱ्या
Posted On:
09 NOV 2021 8:43PM by PIB Mumbai
प्रमुख वैशिष्ट्ये:
- दुहेरी वापराचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी उभय देशांतील स्टार्टअप आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये नवोन्मेषाला या करारामुळे मिळणार चालना
- स्टार्टअप आणि उद्योगजगताकडून ड्रोन, रोबो, कृत्रिम बुद्धिमत्ता आदी क्षेत्रातील उत्पादने आणि नव्या पिढीचे अद्ययावत तंत्रज्ञान वापरात येणार
- विकासाच्या या प्रयत्नांना डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि इस्राईलचे संरक्षण संशोधन विकास महासंचालनालय यांच्याकडून एकत्रितपणे निधी उपलब्ध होणार
भारत-इस्राईल तांत्रिक सहकार्य वाढत चालल्याचे द्योतक म्हणून डीआरडीओ आणि इस्राईलचे संरक्षण संशोधन विकास महासंचालनालय यांनी एका द्विपक्षीय नवोन्मेष करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. दुहेरी वापराच्या तंत्रज्ञानाच्या विकासाला गती देण्यासाठी उभय देशांतील स्टार्टअप आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमध्ये संशोधन आणि विकासाला तसेच नवोन्मेष म्हणजे अभिनव संकल्पनांना प्रोत्साहन देणे, हा या करारामागील उद्देश आहे. या करारावर आज म्हणजे 09 नोव्हेंबर 2021 रोजी नवी दिल्लीत संरक्षण संशोधन विकास विभागाचे सचिव तथा डीआरडीओचे अध्यक्ष डॉ.जी.सतीश रेड्डी आणि इस्राईल संबंधित महासंचालनालयाचे डॉ.डॅनियल गोल्ड यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
या करारानुसार, ड्रोन, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम म्हणजे पुंज तंत्रज्ञान, फोटॉनिकस, जैव-संवेदकता, ब्रेन-मशीन इंटरफेस, ऊर्जा-साठवण, आदी क्षेत्रांत अद्ययावत तंत्रज्ञान आणि उत्पादने वापरात आणण्यासाठी दोन्ही देशांतील स्टार्टअप आणि उद्योगक्षेत्र एकत्रितपणे काम करणार आहेत. दोन्ही देशांच्या विशिष्ट गरजांनुसार ही उत्पादने व तंत्रज्ञान विकसित केले जाईल. यासाठी डीआरडीओ आणि इस्राईलचे संरक्षण संशोधन विकास महासंचालनालय यांच्याकडून एकत्रितपणे निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या करारांतर्गत विकसित होणारी तंत्रज्ञाने उभय देशांना त्यांच्या देशांतर्गत वापरासाठी उपलब्ध असतील.
***
N.Chitale/J.Waishampayan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1770388)
Visitor Counter : 312