अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्रातील कृषिविषयक उद्योगांच्या विकासासाठी आशियायी विकास बँक आणि भारत सरकार यांच्यात 10 कोटी डॉलर्सच्या कर्जाचा करार

Posted On: 27 OCT 2021 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 ऑक्टोबर 2021 


महाराष्ट्र राज्यातील शेतीतून मिळणारे उत्पन्न अधिक वाढविण्यासाठी आणि अन्नधान्याची नासाडी कमी करण्यासाठी कृषिविषयक उद्योगांना चालना देण्याच्या उद्देशाने आशियायी विकास बँक आणि भारत सरकार यांच्यातील 10 कोटी अमेरिकी डॉलर्सच्या कर्जाच्या करारावर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

भारतातर्फे केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विषयक विभागाचे अतिरिक्त सचिव रजत कुमार मिश्रा यांनी तर आशियायी विकास बँकेचे भारतासाठीचे निवासी संचालक ताकेओ कोनिशि यांनी बॅंकेतर्फे मॅग्नेट अर्थात महाराष्ट्र कृषीउद्योग नेटवर्क प्रकल्पाच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या.

करकरारावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर, मिश्रा म्हणाले की हा प्रकल्प बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी प्रत्यक्ष शेतातील उत्पादकतेत वाढ, काढणीपश्चात सुविधांचे आधुनिकीकरण आणि विपणन सुविधा निर्माण करणे अशा उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कृषिविषयक उद्योगांना समग्र पाठींबा देणार आहे. 

“महाराष्ट्रातील लहान आणि मध्यम स्वरुपाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांची काढणी-पश्चात आणि विपणन क्षमता सुधारणे, अन्नाची नासाडी कमी करणे आणि अर्थपुरवठा तसेच क्षमता बांधणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच फलोत्पादनासाठी मूल्य साखळीच्या पायाभूत सुविधांचा विकास करणे यासाठी हा प्रकल्प मदत करेल,” असे कोनिशि म्हणाले. “ग्रामीण भागातील विद्युतीकरण आणि गावांशी संपर्काच्या सुविधा वाढविणे या उपक्रमांच्या माध्यमातून सिंचन क्षमता वाढविण्यासाठी परस्पर पूरक प्रकल्पांवर काम करून भारताच्या ग्रामीण भागात स्थित्यंतर घडवून आणण्यासाठी आशियायी विकास बँकेकडून सध्या दिल्या जात असलेल्या मदतीच्या सोबतच या प्रकल्पाच्या हस्तक्षेपांना संरेखीत करण्यात आले आहे,” असेही त्यांनी सांगितले.

संपूर्ण भारतात होणाऱ्या फळे आणि भाजीपाल्याच्या उत्पादनाच्या अनुक्रमे 11% आणि 6% फळे आणि भाजीपाला यांचे उत्पादन महाराष्ट्रात होत असले तसेच देशातून निर्यात होणाऱ्या  एकूण फुलशेतीतील उत्पादनांपैकी 8% फुले महाराष्ट्रातून निर्यात होत असली तरीही लहान शेतकऱ्यांना उत्पादन वाढविण्यासाठी भांडवलाची कमतरता भासते आणि त्यांना नव्याने उदयाला येत असलेल्या उच्च-दर्जाच्या बाजारांपर्यंत थेट प्रवेश मिळत नाही. आशियायी बँकेकडून घेण्यात आलेल्या कर्जामुळे कृषी उत्पादक संघटनांना तसेच मूल्य साखळी संचालकांना 300 उपप्रकल्पांना अनुदान आणि मध्यस्थी कर्जाच्या माध्यमातून अशा शेतकऱ्यांना कर्ज पुरवठ्याची सुविधा सुरु करण्यात मदत होईल.  

या नव्या प्रकल्पामुळे एकेकट्या शेतकऱ्यांना तसेच कृषी उत्पादक संघटनांना स्वच्छ, सुगम आणि शाश्वत पीक साठवण आणि अन्नप्रक्रिया सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने सध्या सुरु असलेल्या 16 काढणी-पश्चात सुविधांचे आधुनिकीकरण केले जाईल आणि नव्या 3 सुविधांची उभारणी केली जाईल. या प्रकल्पाच्या मदतीने कृषी उत्पादक संघटनांना तसेच मूल्य साखळी संचालकांना विशेषतः महिलांच्या मालकीच्या आणि महिलांद्वारे संचालित होणाऱ्या संस्थांसाठी मूल्य साखळी वेगवान करणे तसेच पिकाची काढणी-पश्चात हाताळणी आणि व्यवस्थापन यांची क्षमता वाढविता येईल. याचा फायदा 2 लाख शेतकऱ्यांना होण्याची अपेक्षा आहे. 

कृषी उत्पादक संघटनांचा बाजाराशी संपर्क सुधारण्यासाठी आशियायी विकास बँक अनुदान तत्वावर त्यांच्या तंत्रज्ञानविषयक मदतीसाठीच्या विशेष निधीतून 5 लाख अमेरिकी डॉलर्सचे अनुदान तसेच गरिबी कमी करण्यासाठीच्या जपान निधीतून 20 लाख डॉलर्सची मदत देणार आहे. तंत्रज्ञानविषयक मदतीसाठीच्या अनुदानातून पिकांवर आधारित उत्कृष्टता केंद्रांचे जाळे विकसित केले जाईल, कृषी उद्योग आणि कृषी मूल्य साखळीतील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाला प्रोत्साहन आणि क्षमता बांधणीला पाठबळ पुरविले जाईल, तसेच मॅग्नेट संघ आणि महाराष्ट्र राज्य कृषी विपणन मंडळाच्या मालमत्ता आणि आर्थिक व्यवस्थापन क्षमतांमध्ये देखील वाढ करण्यात येईल. टोकाची गरिबी दूर करण्यासाठी सुरु असलेल्या अखंडित प्रयत्नांसोबतच समृद्ध, समावेशक,लवचिक आणि शाश्वत आशिया आणि प्रशांत परिसर निर्माण करण्यासाठी आशियायी विकास बँक कटिबद्ध आहे. सन 1966 मध्ये स्थापन झालेल्या या बँकेचे आशियातील 49 सदस्यांसह एकूण 68 सदस्य आहेत.

 

* * *

M.Chopade/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1767054) Visitor Counter : 305


Read this release in: English , Urdu , Hindi