ग्रामीण विकास मंत्रालय

जागतिक व्यापार परिषदेच्या महासंचालक डॉ. गोझी ओकोंजो-इव्हिला यांनी स्वयंसहाय्यता बचत गटाचे सदस्य तसेच केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला


स्वयंसहाय्यता बचत गटाच्या सदस्यांनी बचत गटामध्ये काम करण्याबाबतचे त्यांचे अनुभव सामायिक केले

स्वयंसहाय्यता बचत गटाच्या सदस्यांनी महामारीच्या काळात हाती घेतलेल्या उपक्रमांचे डॉ. गोझी यांनी केले कौतुक

Posted On: 23 OCT 2021 6:50PM by PIB Mumbai

 

जागतिक व्यापार परिषदेच्या महासंचालक डॉ. गोझी ओकोंजो-इव्हिला सध्या भारत भेटीवर आल्या आहेत. या भेटीदरम्यान त्यांनी काल 22 ऑक्टोबर 2021 रोजी, भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी तसेच दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण रोजगार अभियाना अंतर्गत (डीएवाय-एनआरएलएम) प्रोत्साहन देण्यात आलेल्या स्वयंसहाय्यता बचत गटाच्या (एसएचजी) महिला सदस्यांशी  संवाद साधला.

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचे सहसचिव चरणजीत सिंग यांनी या चर्चेचे नेतृत्व केले. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचे संचालक राघवेंद्र प्रताप सिंग आणि मंत्रालयाच्या डीएवाय-एनआरएलएम अभियानाच्या राष्ट्रीय अभियान व्यवस्थापन विभागातील विषय तज्ञांचे पथक या बैठकीत सहभागी झाले होते.

चरणजीत सिंग यांनी डीएवाय-एनआरएलएम योजनेच्या घटकांचा आढावा सादर केला आणि कोविड-19 महामारीच्या काळात बचत गटांनी केलेल्या कार्याविषयी माहिती दिली.

डॉ. गोझी यांनी बचत गटाच्या सदस्यांकडे त्यांची कार्यक्षेत्रे, बचत गटात सहभागी झाल्यानंतरचे अनुभव, बचत गट उपक्रमाचा त्यांच्यावर झालेला आर्थिक तसेच सामाजिक परिणाम आणि कोविड आजाराने निर्माण केलेल्या आव्हानांना या महिलांनी कसे तोंड दिले याबाबत चौकशी करून माहिती घेतली.

स्वयंसहाय्यता बचत गटाच्या सदस्य महिलांनी बचत गटामध्ये सहभागी होऊन काम करताना आलेले अनुभव सर्व उपस्थितांशी सामायिक केले. या महिलांनी सांगितले की बचत गटाच्या कामामुळे त्यांची आर्थिक तसेच सामाजिक परिस्थिती सुधारली आहे आणि आता त्या त्यांचे कुटुंब, मुले आणि स्वतःची काळजी अधिक उत्तम प्रकारे घेऊ शकत आहेत.

बचत गटाच्या सदस्यांनी त्यांचे जीवन तसेच समाज यांच्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल जागतिक व्यापार परिषदेच्या महासंचालक डॉ. गोझी ओकोंजो-इव्हिला यांनी या महिलांचे अभिनंदन केले. बचत गटाच्या सदस्य महिलांनी महामारीच्या काळात हाती घेतलेल्या उपक्रमांबद्दल डॉ.गोझी यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आणि त्यांना भविष्यातील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.

***

R.Aghor/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1765991) Visitor Counter : 245