गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह व्यवहार तसेच सहकार विभागाचे मंत्री अमित शाह यांनी पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे उत्तराखंडात निर्माण झालेल्या परिस्थितीचे हवाई सर्वेक्षण केले

प्रविष्टि तिथि: 21 OCT 2021 8:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  21 ऑक्टोबर 2021

केंद्रीय गृह व्यवहार तसेच सहकार विभागाचे मंत्री अमित शाह यांनी उत्तराखंड राज्याचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग, मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी, उत्तराखंडचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री डी एस रावत आणि संसद सदस्य अनिल बालुनी यांच्यासह हवाई सर्वेक्षण करून पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या उत्तराखंडातील देवप्रयाग, रामनगर, रामगड, गौलापार आणि रुद्रपुर या भागांतील परिस्थितीचा आढावा घेतला आणि या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. हवाई सर्वेक्षणानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सद्य परिस्थितीची माहिती घेतली.

केंद्र सरकारने योग्य वेळी पुरविलेल्या माहितीमुळे जीवितहानीचे प्रमाण कमी राखण्यात मदत झाली असे अमित शाह यांनी सांगितले. ते म्हणाले की, केंद्र सरकारने 16 ऑक्टोबरला 24 तासांची आगाऊ पूर्वसूचना जारी केल्यानंतर, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने एसडीआरएफ अर्थात राज्य आपत्ती निवारण दल, एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, आयटीबीपी अर्थात भारत-तिबेट सीमा पोलीस, लष्कर तसेच हवाई दलाला इशारेवजा सूचना पाठविल्यामुळे, नुकसान टाळण्यात मोठ्या प्रमाणात यश मिळाले. सर्व मोबाईल ग्राहकांच्या मोबाईलवर आगाऊ इशारे पाठविण्यात आल्यामुळे त्यांच्या अनावश्यक हालचाली टाळता आल्या. चारधाम यात्रेच्या यात्रेकरूंना पाऊस सुरू होण्यापूर्वी जेथे आहेत तेथेच थांबविण्यात आले आणि त्यामुळे एकाही यात्रेकरूच्या मृत्यूची बातमी आली नाही आणि आता तर ही यात्रा पुन्हा सुरु करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली. पाऊस सुरु होण्यापूर्वीच धोक्याचे इशारे मिळाल्यामुळे एनडीआरएफ, लष्कर, आयटीबीपी, एसडीआरएफ, राज्य प्रतिसाद पथके, अग्निशमन दल यांचे कर्मचारी विविध घटनास्थळी तैनात होते. नागरिकांना वाचविण्यासाठी हेलिकॉप्टर्सची देखील व्यवस्था करून त्यांना पाऊस सुरु होण्यापूर्वी  सावधानतेचा इशारा देऊन सज्ज ठेवण्यात आले होते अशी माहिती केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिली.

 

 M.Chopade/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1765580) आगंतुक पटल : 215
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil