संरक्षण मंत्रालय
नौदल कमांडरांची 2021 मधील दुसरी परिषद
Posted On:
16 OCT 2021 8:00PM by PIB Mumbai
भारतीय नौदलातील कमांडर श्रेणीच्या अधिकाऱ्यांची 2021 मधील दुसरी बैठक 18 ते 22 ऑक्टोबर 2021 या कालावधीत होणार आहे. युध्दनीतीच्या पातळीवरील महत्त्वाच्या सागरी सुरक्षा संबंधित मुद्द्यांसंबंधी चर्चा करण्यासाठीचा मंच म्हणून तसेच ज्येष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशी संस्थात्मक पातळीवरून संवाद साधण्यासाठीचे माध्यम म्हणून ही परिषद उपयुक्त ठरणार आहे. आपल्या भागातील सतत बदलत असणाऱ्या भू-सामरिक परिस्थितीमुळे, अशा परिषदेच्या आयोजनाचे महत्त्व आणि मूल्य अनेक पटींनी वाढते. भारतील नौदलाच्या भविष्यातील मार्ग घडविणाऱ्या अत्युच्च महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत निर्णय घेऊन, त्यावर चर्चा करणे, कार्याची दिशा निश्चित करणे आणि त्या दृष्टीने साधनांची रचना करणे यासाठी ही परिषद संस्थात्मक मंचाचे काम करते.
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग या परिषदेमध्ये भाषण करतील आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर उपस्थित नौदल कमांडरांशी संवाद साधतील.
नौदल प्रमुख आणि इतर उपस्थित नौदल कमांडरांमध्ये यावेळी चर्चिल्या जाणाऱ्या अनेक मुद्द्यांमध्ये, नौदलाने गेल्या काही महिन्यात हाती घेतलेल्या परिचालन, सामग्री, मनुष्यबळ विकास, प्रशिक्षण आणि प्रशासनविषयक प्रमुख उपक्रमांचा समावेश असेल, तसेच नौदलाच्या महत्त्वाची कार्ये आणि उपक्रम याविषयीच्या भविष्यातील योजनांबद्दल उहापोह होईल.
भारतीय नौदलाने शस्त्र-सज्ज, विश्वसनीय आणि संलग्न दल म्हणून घडण्यावर लक्ष केंद्रित केले असून कोविड-19 महामारीची परिस्थिती असून देखील नौदल विषयक नियमांचे खंबीरपणे पालन करीत आहे. भारताच्या सागरी संरक्षणाबाबत वाढत्या जागरूकतेच्या पार्श्वभूमीवर नौदलाने गेल्या काही वर्षांत परिचालनविषयक कार्यांमध्ये लक्षणीय विकास साधला आहे.
भारतीय संरक्षण दलांच्या तिन्ही सेवांमध्ये परिचालनविषयक सामायिक वातावरण निर्माण करणे आणि त्रि-सेवा समन्वय वाढविणे या दृष्टीने भारतीय संरक्षण दल प्रमुख आणि लष्करप्रमुख आणि हवाई दल प्रमुख नौदल कमांडरांशी या परिषदेमध्ये संवाद साधतील.
***
R.Aghor/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1764406)
Visitor Counter : 223