गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज गोव्यात धारबांदोडा इथे राष्ट्रीय न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठाच्या तिसऱ्या परिसराचा कोनशिला समारंभ


गोव्याच्या नागरिकांनी स्वातंत्र्यासाठी कठोर संघर्ष केला, अनेकांनी गोवा मुक्तीसाठी हौतात्म्य पत्करले आणि या बलिदानामुळेच स्वतंत्र गोवा आज भारताचा भाग

गोवा मुक्ती संग्रामासाठी संघर्ष करणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र श्रद्धांजली- अमित शाह

Posted On: 14 OCT 2021 8:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  14 ऑक्टोबर 2021

देशातील फौजदारी गुन्हेविषयक न्यायव्यवस्थेचा कायापालट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये जे छोटेसे बीज लावले होते, त्याचा आज विशाल वटवृक्ष झाला असून राष्ट्रीय स्तरावर, कायदाव्यवस्थेला अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यात आपले महत्वाचे योगदान देत आहे, असे मत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले. 

शाह यांच्या हस्ते  आज गोव्यात धारबांदोडा इथे राष्ट्रीय न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठाच्या तिसऱ्या परीसराचा कोनशिला समारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री  श्रीपाद नाईक आणि केंद्रीय गृहसचिवांसह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी अमित शाह यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे स्मरण केले. पर्रीकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून, या प्रदेशाचा कायापालट करण्याची सुरुवात केली, असे शाह म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली,, तत्कालिन संरक्षण मंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांनी दोन खूप महत्वाची कामे केलीत, ज्यासाठी देश कायम त्यांचे स्मरण ठेवेल, असे त्यांनी सांगितले. त्यापैकी एक म्हणजे, देशातल्या तिन्ही सैन्य दलांच्या सेवानिवृत्त सैनिकांसाठी ‘वन रँक, वन पेन्शन’ व्यवस्था लागू केली. सैन्यातील जवान आपल्या आयुष्याचा एक मोठा भाग अत्यंत खडतर परिस्थितीत, देशाच्या संरक्षणासाठी व्यतीत करत असतात. त्यांचा त्याग, तपस्या आणि बलिदानाचे मूल्य पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनोहर पर्रीकर यांनी ओळखले होते, असे गृहमंत्री म्हणाले. दुसऱ्या कार्याबद्दल श्री अमित शहा म्हणाले की,  वर्षानुवर्षे  देशाच्या सीमा ओलांडून हल्ले होत होते आणि  दहशतवाद पसरवला जात होता  आणि नवी दिल्लीतुन निवेदन  करण्याशिवाय अन्य काहीच केले जात नव्हते.मात्र जेव्हा काश्मीरच्या पुंछमध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि आपले जवान हुतात्मा झाले, तेव्हा  पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री  श्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच  सर्जिकल स्ट्राईक करून भारताने जगाला संदेश दिला की,  भारताच्या सीमेवर छेडछाड करणे इतके सोपे नाही.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाची  (एनएफएसयू)  कल्पना सर्वप्रथम  देशाचे पंतप्रधान आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी मांडली होती. श्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगातील पहिले न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याचे काम सुरु केले आणि जेव्हा ते पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाची स्थापना केली.कुख्यात,  अट्टल गुन्हेगार  आणि नवीन गुन्हेगारांना शोधून काढणे हा या मागचा उद्देश  आहे, असे शाह म्हणाले. जेव्हा  गुन्हेगारांविरुद्धच्या खटल्याच्या  तपासाचे प्रमाण वाढेल तेव्हाच कुख्यात  गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे काम  केले जाऊ शकते,  मात्र  हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा न्यायालयात फिर्यादीच्या  वकिलाच्या हातात वैज्ञानिक पुरावे असतील, असे श्री .अमित शाह यांनी सांगितले.न्यायवैद्यक विज्ञान संकल्पना आपल्या देशात तर आली आणि विद्यापीठही आता स्थापन झाले आहे ,मात्र  मनुष्यबळाची इतकी कमतरता होती की, खटल्यांची लांबच लांब रांग लागली , त्यामुळे न्यायालयात  खटले प्रलंबित राहिले, असे गृहमंत्री म्हणाले. ते म्हणाले की, जोपर्यंत आपण मनुष्यबळ  आणि न्यायवैद्यक क्षेत्रातील तज्ञ तयार करत नाही, तोपर्यंत या क्षेत्राला त्याच्या उन्नतीकडे नेणे अशक्य आहे.

श्री अमित शाह म्हणाले की, 6 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असलेल्या सर्व गुन्ह्यांसाठी न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा  तपास अनिवार्य करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी देशाच्या 600 हून अधिक जिल्ह्यांमध्ये एक चांगला कार्य संघ  आणि जिल्हास्तरीय व्यायवैद्यक विज्ञान  प्रयोगशाळा तयार कराव्या लागतील. यासाठी किमान 30,000 ते 40,000 न्यायवैद्यक  शास्त्रज्ञांची आवश्यकता आहे आणि यासाठी न्यायवैद्यक विज्ञानाचे  शिक्षण हा एकमेव मार्ग आहे, म्हणूनच न्यायवैद्यक  विज्ञान विद्यापीठाची स्थापना केली आहे. या विद्यापीठाअंतर्गत अनेक महाविद्यालये सुरु होतील त्यामुळे  प्रत्येकाला रोजगार मिळेल असे सांगत  गोव्यातील मुलांमध्ये हे विद्यापीठ लोकप्रिय करण्याचे आवाहन त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांना केले. ते म्हणाले की,   200 विद्यार्थी आणि 5 विषयांसह  हे महाविद्यालय आज सुरू होत आहे आणि मी सर्व गोवावासियांना  सांगू इच्छितो की, त्यांच्या मुलांनी न्यायवैद्यक विज्ञान शिक्षण घेतले पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि त्यांनी त्यांची नोकरी सुनिश्चित  केली पाहिजे. न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठामध्ये  केवळ विद्यार्थ्यांना न्यायवैद्यक विज्ञानच शिकवले जाणार  नाही तर पोलीस अधिकारी , न्यायिक  अधिकारी , सायबर सुरक्षेशी संबंधित लोक आणि खाजगी कंपन्यांच्या सुरक्षेसंबंधीत  लोकांसाठी पदविका  अभ्यासक्रमांची व्यवस्था करण्यात आली आहे, असे श्री शाह म्हणाले. गोव्यामध्ये पर्यटन स्थळे आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेशी संबंधित पदविका अभ्यासक्रमही तयार करण्यासोबतच अंमली पदार्थांना आळा घालण्याच्या दृष्टीने, आणि तटीय पोलिसांसाठीही एक चांगली व्यवस्था निर्माण करावी असे श्री अमित शाह यांनी राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विज्ञान विद्यापीठांच्या  कुलगुरूंना सांगितले. ते म्हणाले की, मला खात्री आहे की,  येथे स्थापन होणारे महाविद्यालय केवळ गोव्यातच नव्हे तर संपूर्ण पश्चिम भारत आणि कर्नाटकपर्यंत आपला  दरवळ पोहोचवेल आणि कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रित करण्यात मदत करेल.

गोवा मुक्तिसंग्रामात आपले बलिदान देणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करत  श्री अमित शहा म्हणाले की, गोव्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी खूप कठोर  संघर्ष केला आहे.गोवा मुक्ती संग्रामासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे आणि म्हणूनच आज गोवा भारताचा संपूर्ण भाग आहे.गोवा विविध संस्कृतींच्या समन्वयाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे, असे श्री अमित शहा म्हणाले. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे  15 ऑक्टोबरपासून जगभरातील पर्यटक चार्टर विमानाद्वारे  गोव्यात येऊ शकतील. त्यांना पर्यटक व्हिसा दिला जाईल, यामुळे गोव्याच्या पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास गृहमंत्र्यांनी व्यक्त केला.

 

M.Chopade/R.Aghor/S.Chavan/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1764030) Visitor Counter : 385


Read this release in: English , Urdu , Hindi