नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

2030 पर्यंत 450 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा स्थापित क्षमतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत सज्ज : नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

Posted On: 11 OCT 2021 5:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 ऑक्टोबर 2021

 

दुबई एक्सपो 2020 येथे आयोजित हवामान आणि जैवविविधता सप्ताहादरम्यान फिक्की (FICCI) च्या सहकार्याने, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने 6 ते 8 ऑक्टोबर 2021 या कालावधीत अनेक कार्यक्रम आयोजित केले. या कार्यक्रमांमध्ये भारताची नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरी आणि महत्वाकांक्षा, भारतातील नवीकरणीय ऊर्जेची उदयोन्मुख क्षेत्रे आणि संधी या विषयांचा समावेश होता. भारतीय सौर ऊर्जा महामंडळ (एसईसीई) आणि भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेद्वारे (आयआरईडीए) संचालित केलेल्या कार्यक्रमांचा देखील यात समावेश होता. सौरऊर्जेच्या विनाअडथळा वापरासाठी सीमा ओलांडून परस्परसंवादाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या वतीने वन सन वन वर्ल्ड वन ग्रिड (ओएसओडब्ल्यूओजी) या संकल्पनेवर आधारित एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जग परिवर्तनाच्या शिखरावर आहे आणि हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी त्वरित सुधारात्मक पावले उचलणे आवश्यक आहे, यावर नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंह यांनी आज नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय - फिक्की -  भारतीय सौर ऊर्जा महामंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना भर दिला.

भारतीय सौर ऊर्जा महामंडळाची झालेली प्रगती आशादायी आहे आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रे विकसित होण्यासाठी सज्जतेच्या दृष्टीने, प्रगतीची ही गती कायम ठेवणे अपेक्षित आहे असे सांगत सिंह यांनी  भारतीय सौर ऊर्जा महामंडळाने नवीन जगतातील ऊर्जा महामंडळ बनण्यासाठीचा आपला दृष्टीकोन सांगितला. भारताने एक रोमांचक प्रवास सुरू केला असून जिथे जाण्याचे पूर्वी कोणी धाडस केले नाही त्यादिशेने भारताची वाटचाल सुरु आहे आणि 2030 पर्यंत 450 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भारतीय सौरऊर्जा महामंडळ सतत कार्यरत राहील, असे ते म्हणाले.

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा, रसायने आणि खते राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी बोलताना सांगितले की, ऊर्जा क्षेत्र संपूर्ण जगात आमुलाग्र बदल घडवून आणणार आहे आणि यापुढील भविष्य नवीकरणीय ऊर्जेचे आहे.

 

* * *

S.Tupe/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1762985) Visitor Counter : 280


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi