अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्राप्तिकर विभागाचे महाराष्ट्रातील विशिष्ट उद्योगपती/ मध्यस्थांवर छापे

Posted On: 07 OCT 2021 10:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2021

प्राप्तिकर विभागाने महाराष्ट्रातील विशिष्ट उद्योगपती/ मध्यस्थ आणि सरकारी अधिकारी यांचा समावेश असलेल्या एका मोठ्या वर्तुळावर छापे घातले ज्याची सुरुवात 23.09.2021 पासून झाली होती. सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून याबाबतची माहिती गुप्तचरांकडून घेतली जात होती. या छाप्यांदरम्यान एकूण 25 निवासी आणि 15 कार्यालयांवर छापे घालण्यात आले तर 4 कार्यालयांचे सर्वेक्षण करण्यात आले. मुंबईमधील ओबेरॉय हॉटेलमधील काही स्यूट्स या मध्यस्थांपैकी दोघांनी कायमस्वरुपी भाड्याने घेतले होते आणि त्यांच्या ग्राहकांची भेट घेण्यासाठी त्यांचा वापर केला जात होता. या स्यूटची देखील तपासणी करण्यात आली. मध्यस्थ आणि सरकारी अधिकारी यांचा समावेश असलेल्या या वर्तुळाकडून आपल्या दस्तावेजांमध्ये विविध गोपनीय सांकेतिक खुणांचा वापर केला जात होता आणि काही दस्तावेज तर 10 वर्षांपूर्वीचे होते. या शोधमोहिमेत एकूण 1050 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे आढळले. हे मध्यस्थ कॉर्पोरेट आणि उद्योगपतींना भूमी हस्तांतरित करून देण्यापासून ते सर्व प्रकारच्या सरकारी मंजुरी मिळवून देण्यापर्यंत एन्ड टू एन्ड सेवा उपलब्ध करून देत होते. संपर्कासाठी अतिशय गोपनीय असलेली एन्क्रिप्टेड माध्यमे आणि माहिती नष्ट करणारी उपकरणे वापरल्यानंतरही प्राप्तिकर विभागाला त्यातून महत्त्वाची डिजीटल माहिती पुन्हा मिळवण्यात यश मिळाले आणि विविध बेकायदेशीर कृत्यांचे पुरावे असलेल्या छुप्या जागेची देखील माहिती मिळाली. रोख रक्कम पाठवण्यासाठी या मध्यस्थांनी आंगडियांचा देखील वापर केला आणि तपासादरम्यान या आंगडियांपैकी एकाकडून सुमारे 150 लाख रुपये जप्त करण्यात आले. त्याशिवाय एका उद्योगपतीने/मध्यस्थाने शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी करून आणि त्यांचे हस्तांतरण सार्वजनिक उपक्रम आणि मोठ्या कॉर्पोरेटना करून मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी उत्पन्न जमा केल्याचे देखील तपासात आढळले. अनेक वरिष्ठ सनदी अधिकारी/त्यांचे नातेवाईक आणि इतर प्रमुख व्यक्तींनी या योजनांमध्ये गुंतवणूक केल्याचे दिसून आले. चौकशी केलेल्या व्यक्तींपैकी काहीजण स्थावर मालमत्ता आणि बांधकाम व्यवसायात असल्याचे आढळले. याविषयीचे रोख रकमेच्या पावत्या आणि चुकाऱ्यांचे पुरावे आढळले. जप्त केलेले मोबाईल फोन, पेन ड्राईव्ह, हार्ड ड्राईव्ह्ज, आयक्लाऊड, ई-मेल्स इत्यादींमधून मोठ्या प्रमाणावर डिजिटल माहिती मिळाली असून त्याची तपासणी आणि विश्लेषण सुरू आहे.

आतापर्यंत 4.6 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम आणि 3.42 कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या तपासादरम्यान सापडलेले 4 लॉकर प्रतिबंधात्मक आदेशाखाली आहेत. पुढील तपास सुरू आहे.

 

S.Tupe/S.Patil/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1761911) Visitor Counter : 760


Read this release in: English , Hindi , Telugu