उपराष्ट्रपती कार्यालय

ईशान्य प्रदेशाच्या विकासाशिवाय भारताचा विकास अपूर्ण आहे – उपराष्ट्रपती


उपराष्ट्रपतींनी वैज्ञानिक समुदायाला, भारताला पुन्हा एकदा विश्वगुरुचे स्थान प्राप्त करून देण्यासाठी काम करण्याचे केले आवाहन

उपराष्ट्रपतींनी इम्फाळ येथील जैविक साधनसंपत्ती आणि शाश्वत विकास संस्थेमधील वनस्पती आधारित औषध निर्मिती सुविधेचे केले उद्‌घाटन

गावकऱ्यांना स्थानिक भाषेतून विकास योजनांची माहिती देण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

Posted On: 05 OCT 2021 9:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5  ऑक्टोबर 2021

भारतीय वैज्ञानिक समुदायाने राष्ट्र उभारणीसाठी दिलेल्या योगदानाचे उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी आज कौतुक केले आणि ते म्हणाले की आपल्या देशाची भविष्यकाळातील प्रगती आपल्या शास्त्रज्ञांच्या समर्थ हाती सोपविलेली आहे. आपल्या संशोधकांनी आणि शास्त्रज्ञांनी महत्वाच्या इतर गटांसोबत खांद्याला खांदा लावून काम करावे आणि भारताला पुन्हा एकदा ‘विश्वगुरु’चा सन्मान प्राप्त करून द्यावा असे आवाहन त्यांनी केले. ‘भारताच्या ईशान्य प्रदेशातील जैविक साधनसंपत्तीतून निर्माण होणारी जैवअर्थव्यवस्था’ या विषयावर आयबीएसडी अर्थात जैविक साधनसंपत्ती आणि शाश्वत विकास संस्थेने आज इम्फाळ येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय चर्चासत्रातील सहभागींना उद्देशून ते बोलत होते. तर्कसंगत विचारसरणी आणि शास्त्रीय दृष्टीकोन या प्रागतिक देशाच्या कोनशीला आहेत असे मत उपराष्ट्रपतींनी मांडले. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या शास्त्रज्ञांना उद्देशून ते म्हणाले की वेगाने प्रगती करणाऱ्या देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व्यावहारिक पद्धतीने शास्त्रीय ज्ञान वापरण्यासाठी आवश्यक शिक्षण, प्रशिक्षण, लक्ष्य आणि शिस्तबद्धता तुमच्याकडे आहे.

ईशान्य प्रदेशाच्या विकासाशिवाय भारताचा विकास अपूर्ण आहे यावर भर देत उपराष्ट्रपती म्हणाले की, ईशान्य प्रदेशाच्या सर्वंकष विकासासाठी बहु-आयामी दृष्टिकोनाचा स्वीकार करून केंद्र सरकार ईशान्य प्रदेशाला प्राधान्य देत आहे. विकास आणि समृद्धीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र सरकारसोबत एकत्रितपणे टीम इंडियाच्या सच्च्या उर्जेने काम करण्याचे आवाहन त्यांनी देशातील सर्व राज्यांना केले. शांती ही प्रगतीसाठी पूर्वापेक्षित गरज आहे याचा पुनरुच्चार करत उपराष्ट्रपती म्हणाले की, देशाची एकता आणि अखंडता यांच्या बाबतीत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही.

पारदर्शकता आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाच्या गरजेवर भर देत उपराष्ट्रपती नायडू म्हणाले की गरिबांसाठी देण्यात आलेला निधी दुसरीकडे वापरला न जाता किंवा कमी न होता त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. प्रशासनात मातृभाषेचा वापर करण्याचे महत्त्व ठासून सांगत त्यांनी गावकऱ्यांना विकास योजनांची माहिती स्थानिक भाषेत दिली जावी असा आग्रह व्यक्त केला.

या कार्यक्रमात उपराष्ट्रपतींनी इम्फाळ येथील जैविक साधनसंपत्ती आणि शाश्वत विकास संस्थेमधील वनस्पतीआधारित औषध निर्मिती सुविधेचे उद्‌घाटन केले. ईशान्य प्रदेश त्यातील समृध्द परीसंस्थांच्या वैविध्यासह जैवविविधतेचे भांडार आहे असे निरीक्षण नोंदवत नायडू यांनी शाश्वत विकासासाठी आधुनिक जैवतंत्रज्ञानविषयक साधनांचा वापर करून या प्रदेशातील जैवसाधनसंपत्तीचे उत्तम व्यवस्थापन करत असल्याबद्दल आयबीएसडीचे कौतुक केले.

केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीत येत असलेली आयबीएसडी संस्था ईशान्य प्रदेशात वनस्पतीआधारित औषध निर्मितीला प्रोत्साहन देत असल्याबद्दल देखील त्यांनी आनंद व्यक्त केला. पारंपरिक आरोग्य सुविधा पद्धतींचे दस्तावेजीकरण, शास्त्रीयदृष्ट्या प्रमाणीकरण आणि मूल्यमापन यांच्या उद्देशाने हाती घेतलेले अभियान हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल असून ईशान्येकडील प्रदेशांमध्ये प्रचलित असलेल्या विविध पारंपरिक उपचार पद्धती आणि अफाट प्रमाणातील वनसंपदेच्या संदर्भात याला विशेष महत्त्व प्राप्त होते असे ते म्हणाले.

वनस्पतीआधारित औषध निर्मिती अभियान मुख्यतः विषाणूरोधक, बॅक्टेरियाविरोधी, बुरशीनाशक आणि कीटक विरोधक इत्यादी उपचारात्मक क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करेल याची नोंद घेत या क्षेत्रामुळे पारंपरिक उपचार पद्धती लोकप्रिय होण्यास मदत होईल आणि कोविड-19 सारख्या आजारांचा सामना करण्यासाठी परिणामकारक पर्यायी वनौषधींचा विकास करण्यासाठी देखील ते उपयुक्त ठरेल असे मत उपराष्ट्रपतींनी व्यक्त केले. या कार्यक्रमाअंतर्गत उच्च दर्जाची बाष्पनशील तेले निर्माण करणाऱ्या वनस्पतींवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय अधिकाधिक शेतकऱ्यांना या प्रदेशात सुगंधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी आकर्षित करण्यात यशस्वी होईल असे नायडू म्हणाले.

स्थानिक जैवसाधनसंपत्तीसह उत्पादनाचे विकसन, प्रक्रिया आणि तंत्रज्ञान यांच्या संदर्भातील परिवर्तनशील दृष्टिकोनामुळे पारंपरिक ज्ञानावर आधारित उपचार द्रव्ये विकसित करण्यात मदत करेल आणि त्यातून या प्रदेशाचा सामाजिक-आर्थिक विकास होईल आणि पारंपरिक आरोग्य सेवादात्यांना देखील याचा लाभ होईल असे मत उपराष्ट्रपती नायडू यांनी व्यक्त केले. ईशान्य प्रदेशात अन्न आणि पाणी यांचा प्रमाणित दर्जा सुनिश्चित करण्यासाठी आयबीएसडीने हाती घेतलेल्या उपक्रमांचे देखील त्यांनी कौतुक केले.

संस्थेमध्ये केल्या जाणाऱ्या संशोधन कार्याची फळे या प्रदेशातील सर्वसामान्य जनतेला चाखायला मिळावीत यासाठी आयबीएसडी आयोजित करत असलेल्या असंख्य कार्यक्रमांबद्दल देखील उपराष्ट्रपतींनी कौतुक व्यक्त केले.

मणिपूर सरकारने या भागातील विकासाला चालना देण्यासाठी आरोग्य, शिक्षण, कृषी, दूरसंचार आणि संपर्क यासारख्या महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला उपराष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणात दिला. राज्य सरकारने या भागातील युवकांना विविध क्रीडा प्रकारांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे असे देखील त्यांनी सांगितले.

 

S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1761264) Visitor Counter : 212