पर्यटन मंत्रालय
जुना गोवा येथे नूतनीकरण केलेल्या हेलिपॅडचे उद्घाटन
Posted On:
20 SEP 2021 6:55PM by PIB Mumbai
गोवा, 20 सप्टेंबर 2021
जुन्या गोव्यातील नूतनीकरण केलेल्या हेलीपॅडचे उद्घाटन केंद्रीय पर्यटन आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री जी किशन रेड्डी आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज झाले.
उद्घाटनाच्या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर तसेच आमदार आणि केंद्र सरकार व गोवा राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गोवा हे फक्त राष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणूनच प्रख्यात नाही तर एक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय ठिकाण आहे, असे केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
इस्रायल लष्कराचा अनुभव सांगताना सक्तीच्या लष्करी प्रशिक्षणानंतर इस्रायल लष्करातील जवान आपले आवडते स्थळ म्हणून नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या आणि खर्चाच्या दृष्टीने किफायतशीर असणाऱ्या गोव्याला पसंती देतात असे रेड्डी यांनी सांगितले. पर्यटन क्षेत्र हे एक महत्त्वाचे रोजगारनिर्मिती क्षेत्र असून केंद्र सरकार गोव्यातील पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी सहाय्य करून अधिकाधिक रोजगार निर्माण करत आहे असेही त्यांनी नमूद केले. गोवा स्वतंत्र झाले त्याला साठ वर्षे झाली. या साठाव्या वर्षात पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालय व्यवस्थित निधी पुरवून गोव्याला जगाच्या नकाशावर सर्वाधिक पसंतीचे पर्यटन स्थळ म्हणून आणणार आहे अशी खात्री ही त्यांनी दिली. केंद्र सरकार सदैव गोव्यातील नागरिकांसोबत आहे असा पंतप्रधानांचा संदेशही मंत्रीमहोदयांनी यावेळी दिला.
या हेलिपॅडच्या नूतनीकरणाला पाच कोटी रुपयांचा खर्च आला असून ते सरकारी तसेच खाजगी क्षेत्रालाही उत्तम प्रकारे उपयोगी पडेल अशी ग्वाही गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. गोव्यातील पर्यटनाचा विकास व्हावा हाच यामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
'स्वदेश दर्शन किनारी प्रदेश' या कल्पने अंतर्गत या हेलिपॅडचा विकास करण्यात आला आहे. स्वदेश दर्शन योजना ही केंद्राकडून राबवण्यात येणारी क्षेत्रीय योजना असून भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने पर्यटनक्षेत्राचा कल्पनाधारित एकत्रित विकास करण्याच्या दृष्टीने ही योजना आणली आहे.
देशातील पर्यटन केंद्रांचा विकास करण्याच्या दृष्टीने आखलेली ही योजना आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान, स्किल इंडिया, मेक इन इंडिया यासारख्या योजनांशी या योजनेचा मेळ घातला गेला आहे. पर्यटन क्षेत्र रोजगार निर्माण करत असून, विविध क्षेत्रांशी मेळ घालत आर्थिक विकासाला चालना देणारे क्षेत्र आहे.
* * *
M.Chopade/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1756494)
Visitor Counter : 249