रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला हरयाणातील सोहना, राजस्थानातील दौसा व बुंदी आणि मध्यप्रदेशातील रतलाम येथे दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेच्या कामात झालेल्या प्रगतीचा आढावा

Posted On: 16 SEP 2021 10:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2021

केंद्रीय रस्तेवाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दोन दिवसांच्या दौऱ्यात हरयाणातील सोहना, राजस्थानातील दौसा व बुंदी आणि मध्यप्रदेशातील रतलाम येथे दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेच्या कामात झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला.

सोहनामध्ये गडकरींनी हरयाणाचे मुख्यमंत्री एम एल खट्टर आणि केंद्रीय मंत्री राव इंदरजीत सिंग यांच्यासोबत एक्स्प्रेसवेच्या कामातील प्रगतीचा आढावा घेतला. हरयाणाला राजस्थान, मध्यप्रदेश, गुजराथ आणि महाराष्ट्र यांच्याशी जोडणाऱा हा एक्स्प्रेसवे या प्रदेशात समृद्धी व विकास घेऊन येईल असे मंत्रीमहोदयांनी सांगितले.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 53000 कोटींचे 15 प्रकल्प मंजूर झाले असून त्यापैकी 14 प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे असे गडकरी म्हणाले. हे प्रकल्प पुर्णत्वाला गेल्यावर दिल्ली एनसीआर मधील प्रदूषण लक्षणीयरित्या कमी होईल व वाहनकोंडीची समस्याही सुटेल असे गडकरी यांनी नमूद केले.  मुंबई दिल्ली हा 1,380 किमीचा एक्स्प्रेस वे हा देशातील सर्वाधिक लांबीचा एक्स्प्रेस वे असून तो मार्च 2023 पर्यंत पूर्ण होईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

राजस्थानातील दौसामध्ये गडकरींनी राज्यमंत्री बी.डी कल्ला आणि खासदार जसकौर मीणा, किरोडीलाल मीणा आणि माजी खासदार रामनारायण मीणा यांच्या समवेत एक्स्प्रेस वे च्या कामाचा आढावा घेतला. राजस्थानात 16,600 कोटी खर्चून, 374 किमी मार्गाचे काम होणार आहे. अल्वार, भरतपूर, दौसा, स्वामी माधोपूर टोंक, बुंदी आणि कोटा या जिल्ह्यातील विकासाला हा महामार्ग हातभार लावेल असे गडकरी म्हणाले. दिल्ली मुंबई एक्स्प्रेसवेच्या या पट्ट्यातील कामामुळे दिल्ली व जयपूर मधील अंतर दोन तासात कापता येईल, असे त्यांनी सांगितले.

मध्यप्रदेशातील रतलाममध्ये खासदार सुधीर गुप्ता, गुमान सिंग, अनिल फिरोजिया यांच्या समवेत त्यांनी दिल्ली मुंबई एक्स्प्रेसवेच्या कामाची पहाणी केली.  गडकरी म्हणाले की एक्स्प्रेसवेच्या या भागातील 245 किमी मार्गाचे काम 11,000 कोटी रुपये खर्चून होत आहे. दिल्ली मुंबई एक्स्प्रेस वे आणि चंबळ एक्स्प्रेसवे ही मध्यप्रदेशाच्या विकासाची ‘इंजिने’ होतील असे सांगत यामुळे रोजगाराची अनेक क्षेत्रे खुली होतील तसेच प्रदेशातील हातमाग, हस्तव्यवसाय आणि इतर उद्योगांना चालना मिळेल असे त्यांनी नमूद केले. रतलाम हे दिल्ली मुंबई एक्स्प्रेसवेवरील एक मुख्य केंद्र असून राज्यसरकारच्या सहकार्याने येथील औद्योगिक विकासासाठी हे मालवाहतूक केंद्र म्हणून आकाराला आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी सांगितले.

 

 

 

M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1755587) Visitor Counter : 149


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi