आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लोकसंख्या, मानवी भांडवल आणि शाश्वत विकास या विषयावरील चर्चासत्राचे डॉ. भारती पवार यांच्याकडून उद्घाटन

Posted On: 10 SEP 2021 6:15PM by PIB Mumbai

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज नवी दिल्ली येथे लोकसंख्या, मानवी भांडवल आणि शाश्वत विकास( निरोगी जनता- निरोगी भवितव्य) या विषयावरील एका चर्चासत्राचे उद्घाटन केले आणि अध्यक्षपद भूषवले. यावेळी त्यांनी दिल्ली विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ या संस्थेत एका लोकसंख्या घड्याळाचे देखील अनावरण केले. केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते यावेळी डॉ. दीपंजली हलोई आणि डॉ. सुरेश शर्मा यांनी लिहिलेल्या इन्फन्ट अँड चाईल्ड मॉर्टेलिटी इन आसाम- डेमोग्राफिक अँड सोशियो इकॉनॉमिक इंटररिलेशन्सया पुस्तकाचे आणि एचएमआयएस माहितीपत्रक/ रेडी रेकनर याचे देखील प्रकाशन करण्यात आले. यावेळी भारती पवार यांनी सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. काही अंदाजांनुसार 2027 पर्यंत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनणार असल्याने भारतातील लोकसंख्या या विषयावर अधिक व्यापक विचारमंथन होण्याची आणि त्याबाबत जागरुकता निर्माण करण्याची गरज पवार यांनी व्यक्त केली.

देशभरातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी आणि सर्वांसाठी आरोग्यहा पंतप्रधानांचा दृष्टीकोन साकार करण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय वचनबद्ध असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. लोकसंख्या स्थिर करण्याचा लोकसंख्या धोरणाचा उद्देश असला पाहिजे आणि त्यासाठी बृहद आणि सूक्ष्म असे दोन्ही प्रकारचे दृष्टीकोन आवश्यक असल्याचे पवार यांनी नमूद केले. सर्वांना स्वच्छ इंधन, निवारा, स्वच्छ पाणी आणि आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले. लोकांचे कल्याण करण्यासाठी आणि त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकसंख्येचा आढावा घेण्याचे काम अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगत यामध्ये लोकसंख्या संशोधन केंद्रे समकालीन विषयांवर संशोधन करत कशा प्रकारे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या केंद्रांनी केलेल्या व्यापक संशोधनाचा उपयोग लोकसंख्याविषयक धोरण तयार करण्यासाठी आणि योजनांचे मूल्यमापन करण्यासाठी अतिशय उपयुक्त असल्याचे सांगत या केंद्रांची प्रशंसा केली.

***

G.Chippalkatti/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1753904) Visitor Counter : 318