संरक्षण मंत्रालय

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी भारतीय तटरक्षक दलाचे स्वदेशी बनावटीचे ‘विग्रह’ जहाज राष्ट्राला अर्पण केले

Posted On: 28 AUG 2021 6:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 ऑगस्‍ट 2021

 

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज चेन्नई येथे भारतीय तटरक्षक दलाचे स्वदेशी बनावटीचे ‘विग्रह’ नावाचे जहाज राष्ट्राला अर्पण केले. या घटनेला ‘आत्मनिर्भर भारता’च्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल संबोधत ते म्हणाले की आज सेवेत दाखल झालेले नवे जहाज त्याच्या आराखड्याच्या संरेखनापासून बांधणीपर्यंत सर्वच पातळ्यांवर स्वदेशी पद्धतीने निर्माण केले गेले आहे. भारतीय संरक्षण दलाच्या इतिहासात प्रथमच एक-दोन नव्हे तर तब्बल सात जहाजांच्या निर्मितीसाठी खासगी क्षेत्रातील कंपनीसोबत करार करण्यात आला आहे हा मुद्दा त्यांनी बोलताना अधोरेखित केला. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2015 मध्ये हा करार केल्यानंतर सात वर्षांच्या आतच सर्व सात जहाजांची फक्त निर्मितीच पूर्ण झाली असे नव्हे तर आज त्या सर्व जहाजांची देशाच्या सेवेत दाखल होण्याची प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे.  

सर्वसमावेशकतेच्या भावनेतून शेजारी देशांना मदत करण्याच्या तटरक्षक दलाच्या भूमिकेची त्यांनी आठवण करून दिली. गेल्या वर्षी एमटी ‘न्यू डायमंड’ हे अत्यंत मोठे तेलवाहू जहाज आणि एमव्ही ‘एक्स-प्रेस पर्ल’  मालवाहू जहाज, या दोन्ही जहाजांना वाचविण्यासाठी तटरक्षक दलाने स्वयंप्रेरणेने केलेल्या मदतीचे त्यांनी कौतुक केले. ‘वाकाशियो’ या यांत्रिक जहाजातून तेल गळती झाल्यानंतर ती आटोक्यात आणण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने मॉरीशसला मदत पुरविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे देखील कौतुक केले.

कर्तव्याला केंद्रस्थानी ठेवून शेजारी देशांसोबत मैत्री, खुलेपणा आणि सहअस्तित्व निर्माण करण्याच्या भावनेला केंद्रस्थानी ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या सागर (या प्रदेशातील सर्वांसाठी संरक्षण आणि विकास) संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी तटरक्षक दलाने केलेल्या प्रयत्नांचे देखील कौतुक केले.

‘विग्रह’ जहाज विशाखापट्टणम तळावर कार्यरत असेल आणि तटरक्षक दलाच्या पूर्व विभागाच्या कमांडरांच्या परिचालन आणि प्रशासकीय नियंत्रणाखाली ते भारताच्या पूर्व भागातील समुद्रकिनाऱ्यावर कार्य करेल. कमांडंट पीएन अनूप यांच्यासह 11 अधिकारी आणि 110 कमर्चारी आयसीजीएस विग्रहवर तैनात असणार आहेत.

या 98 मीटर लांबीच्या पेट्रोलवर चालणाऱ्या जहाजाची रचना आणि बांधणी मेसर्स लार्सेन अँड टुब्रो जहाज बांधणी मर्या. या कंपनीने आधुनिक स्वदेशी तंत्रज्ञानाने केली आहे. त्यावर रडार, दिशादर्शन आणि संपर्क साधने तसेच उष्णकटिबंधातील समुद्राच्या वातावरणात कार्य करण्याची क्षमता असणारी संवेदके आणि यंत्रे बसविलेली आहेत. हे जहाज 40/60 बोफोर्स तोफ आणि 12.7 एमएम दूरनियंत्रित बंदूक आणि आग नियंत्रण प्रणालीने युक्त आहे. तसेच यावर अनेक प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त स्वयंचलित प्रणाली बसविलेल्या आहेत. बोर्डिंग ऑपरेशन, शोध आणि मदत, कायद्याची अंमलबजावणी  तसेच सागरी गस्त या कार्यांसाठी आवश्यक आलेले जुळे इंजिनयुक्त हेलिकॉप्टर आणि चार अतिवेगवान छोट्या बोटींची सोय करण्यात आली आहे. समुद्रात होणारी तेल गळती रोखण्यासाठी यावर मर्यादित प्रदूषण प्रतिसाद यंत्रणा बसविण्यात आली आहे. याचे वजन 2200 टन असून त्यावर बसविलेल्या 9100 किलो वॅटची डिझेल इंजिइंजिनांच्या सहाय्याने हे जहाज 5000 एनएमच्या इकॉनॉमिकल वेगासह 26 नॉट्स प्रती मैलाची कमाल वेगमर्यादा गाठू शकते.

तटरक्षक दलाच्या पूर्व विभागाच्या ताफ्यात समाविष्ट झाल्यानंतर, हे जहाज भारताच्या सागरी सीमांच्या संरक्षणासाठी तटरक्षक दलाच्या सनदीमध्ये दिलेल्या ईएफझेड निरीक्षण आणि इतर कर्तव्ये बजावेल. विग्रह जहाजाच्या समावेशानंतर भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात 157 जहाजे आणि 66 विमाने  समाविष्ट असतील.

आजच्या कार्यक्रमात तामिळनाडूचे उद्योगमंत्री टी थेन्नरासू, लष्कर प्रमुख जनरल एम.एम. नरवणे, भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक कृष्णस्वामी नटराजन, अतिरिक्त महासंचालक व्ही.एस. पठानिया यांच्यासह आयएनएस ‘विग्रह’ चे  कमांडिंग ऑफिसर कमांडंट पी.एन.अनूप आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

 

* * *

Jaydevi PS/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1749962) Visitor Counter : 311