कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
21 व्या शतकातल्या स्वयंपूर्ण भारताच्या वाटचालीत युवा वर्ग आघाडीवर राहून मार्ग दाखवेल- धर्मेंद्र प्रधान
नव्या शैक्षणिक धोरणामुळे शैक्षणिक संस्था जागतिक तोडीच्या संस्था म्हणून परिवर्तीत होतील- केंद्रीय शिक्षण मंत्री
आयआयटी भुवनेश्वरच्या व्याख्यान सभागृह संकुल आणि हॉल ऑफ रेसिडेंन्सचे धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते उद्घाटन
Posted On:
20 AUG 2021 7:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2021
राष्ट्र प्रथम या भावनेसह 21 व्या शतकातल्या स्वयंपूर्ण भारताच्या वाटचालीमध्ये आघाडीवर राहून मार्ग दाखवण्याचे काम युवा वर्ग करेल असा विश्वास केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला आहे. आयआयटी भुवनेश्वरच्या पुष्पगिरी व्याख्यान सभागृह संकुल आणि ऋषीकुल्य हॉल ऑफ रेसिडेंन्सचे उद्घाटन करताना ते आज बोलत होते. केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत यावेळी आयआयटी भुवनेश्वरचे संचालक प्राध्यापक आर व्ही राजा कुमार आणि कौशल्य विकास संस्था भुवनेश्वरचे अध्यक्ष राजन कुमार मोहपात्रा यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
आयआयटी भुवनेश्वरच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली,बेरोजगार,अल्प रोजगार आणि वंचित युवकांसाठी उद्योग क्षेत्राला उपयोगी तांत्रिक शिक्षणासह कौशल्य विकास उपक्रम वृद्धिंगत करण्यासाठी हा सामंजस्य करार आहे.
आपल्या युवकांना संधी प्रदान करण्यासाठी,उच्च शिक्षण संस्थाना सहाय्य करत सरकारने सर्वतोपरी अनेक पावले उचलल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी सांगितले. देशातले शैक्षणिक चित्र सुधारण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणले असून परवडणारे, सहज साध्य, समानता आणि दर्जा यावर आधारित हे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले. हे केवळ धोरण नव्हे तर आपल्या भविष्यासाठी दूरदृष्टीने आखलेला हा परिपूर्ण आराखडा आहे. विद्यार्थ्यांना लवचिक आणि पर्याय निवडीसह सबल करत विद्यार्थीभिमुख शिक्षण व्यवस्था उभारणे हा या धोरणाचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. नव्या शैक्षणिक धोरणामुळे आपल्या उच्च शैक्षणिक संस्था जागतिक तोडीच्या संस्था म्हणून परिवर्तीत होतील यावर त्यांनी भर दिला.
दर्जेदार संशोधन आणि नवोन्मेश यावर लक्ष केंद्रीत करत आयआयटी, भारताच्या प्रगतीचे आणि उच्च शिक्षणातल्या यशाचे निश्चितच प्रतीक बनल्याचे त्यांनी सांगितले.
S.Patil/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1747673)
Visitor Counter : 246