संरक्षण मंत्रालय

प्रसिद्धी पत्रक : पीपी 17 ए इथे सैन्य मागे घेण्याची कार्यवाही

Posted On: 06 AUG 2021 7:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 ऑगस्‍ट 2021

 

  1. याच सप्ताहात माहिती दिल्याप्रमाणे, भारत आणि चीनच्या कोअर  कमांडरांच्या दरम्यान चर्चेची बारावी फेरी, 31 जुलै 2021 रोजी पूर्व लदाखच्या चुशूल –मोल्डो भागात पार पडली.
  2. यावेळी दोन्ही बाजूंच्या अधिकाऱ्यांमध्ये,  भारत-चीन सीमा भागाच्या पश्चिम क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळच्या उर्वरित भागातील तणाव कमी करण्याबाबत,  चर्चा झाली. या बैठकीचे फलित म्हणून दोन्ही बाजूंनी गोगरा इथला तणाव कमी करण्याबाबत सहमती व्यक्त केली. या भागात दोन्ही बाजुंचे सैन्य गेल्या वर्षी मे महिन्यापासून समोरासमोर उभे आहे.
  3. करारानुसार, दोन्ही बाजूंनी या भागात सैन्य तैनात करण्याची प्रक्रिया, टप्प्याटप्याने, परस्पर समन्वय साधत आणि खातरजमा करुन बंद केली जाणार आहे.  सैन्य माघारी घेण्याची ही प्रक्रिया गेले दोन दिवस म्हणजेच, 4 आणि पांच ऑगस्ट 2021 रोजी पार पडली. दोन्ही बाजूचे सैन्य आता आपापल्या स्थायी तळावर पोहोचले आहे.
  4. या भागात उभारण्यात आलेले सर्व तात्पुरते बांधकाम आणि इतर पायाभूत सुविधा, ज्या दोन्ही सैन्यांनी उभारल्या होत्या, त्याही पाडण्यात आल्या असून दोन्ही बाजूंकडून त्याची खातरजमा केली आहे. आता या भागात तणाव निर्माण होण्यापूर्वी प्रमाणेच भौगोलिक स्थिति पूर्ववत करण्यात आली आहे. 
  5. या करारानुसार, या भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे काटेकोर पालन केले जाईल, आणि दोन्ही बाजूंनी कारारातील तरतुदींचा सन्मान ठेवला जाईल. तसेच, सद्यस्थितीत कोणताही एकतर्फी बदल केला जाणार नाही, हे सुनिश्चित करण्यात आले आहे.  
  6. यासोबतच, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील आणखी एका संवेदनशील भागातील तणाव कमी करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंनी ही चर्चा पुढे नेत उर्वरित मुद्यांवर तोडगा काढण्याची काटिबद्धता व्यक्त केली आहे.
  7. भारतीय सेना, तसेच इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस, भारताचे सर्वभौमत्व अबाधित ठेवण्यास तसेच, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पश्चिम क्षेत्रात शांतता आणि सौहार्द कायम ठेवण्यास पूर्णतः कटिबद्ध आहेत.  

 

* * *

M.Iyengar/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1743361) Visitor Counter : 69


Read this release in: English , Urdu , Hindi