नौवहन मंत्रालय
स्वदेशी बनावटीच्या ‘विक्रांत’ या विमानवाहू युध्दनौकेचे पहिले सागरी परीक्षण
Posted On:
04 AUG 2021 4:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2021
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी स्वदेशी बनावटीच्या ‘विक्रांत’ या विमानवाहू युध्दनौकेच्या सर्वात प्रथम होत असलेल्या सागरी परिक्षणांची सुरुवात केली. भारताच्या सर्वात जटील यंत्रणा असलेल्या ‘विक्रांत’ या विमानवाहू युध्दनौकेची बांधणी भारतीय नौदलाच्या कोचीन शिपयार्डमध्ये संपूर्ण स्वदेशी पद्धतीने करण्यात आली आहे. स्वदेशी विमानवाहू युध्दनौकेची रचना आणि बांधणी यशस्वी होणे ही देशासाठी खूप मोठी सफलता आहे असे सोनोवाल म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमांचे हे खऱ्या अर्थाने प्रतिबिंब आहे असे त्यांनी सांगितले. राष्ट्राला अभिमान वाटावा अशी कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी कोचीन शिपयार्ड आणि भारतीय नौदलाचे अभिनंदन केले आहे.
विक्रांत नौकेवरील दिशादर्शक यंत्रणा, संपर्क यंत्रणा आणि मुख्य सांगाड्यातील साधने यांच्या परीक्षणासोबत नौकेला पाण्यावर प्रवास करण्यासाठी आवश्यक यंत्रणेचे देखील कठोर परीक्षण केले जाणार आहे. बंदराच्या ठिकाणी या नौकेवरील विविध साधनांचे परीक्षण केल्यानंतर या स्वदेशी विमानवाहू युध्दनौकेचे प्रत्यक्ष सागरी परीक्षण करता येणे, विशेषतः कोविड-19 महामारीच्या कठीण काळात हे शक्य करणे हे देशासाठी फार मोठे यश आहे असे त्यांनी सांगितले. केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या मजबूत पाठींब्याने कोचीन शिपयार्डच्या बांधणी गोदामात ऑगस्ट 2013 मध्ये स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू नौकांच्या बांधणीची सुरुवात झाल्यामुळे भारताने विमानवाहू जहाजांची रचना आणि बांधणी करण्याची क्षमता असणाऱ्या देशांच्या गटात दिमाखात प्रवेश केला होता.
‘विक्रांत’ या स्वदेशी विमानवाहू युध्दनौकेची मूळ रचना भारतीय नौदलाच्या नौदल रचना संचालनालयाने भारतात विकसित केली आहे. तसेच या नौकेची संपूर्ण तपशीलवार अभियांत्रिकी रचना, बांधणी व त्यावरील प्रणालींचे एकत्रीकरण हे सर्व काम कोचीन शिपयार्ड मर्यादित या कंपनीने केले आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या विमानवाहू नौकेच्या आकाराच्या जहाजाचे संपूर्ण त्रिमितीय मॉडेल आधी तयार करण्यात आले आणि या त्रिमितीय मॉडेलच्या आधाराने निर्मितीसंबंधी आरेखने तयार करण्यात आली.
'विक्रांत’ या सर्वात मोठ्या स्वदेशी विमानवाहू युध्दनौकेची बांधणी देशात करण्यात आली असून तिचे वजन सुमारे 40,000 टन आहे.
ही विमानवाहू युध्दनौका म्हणजे एक तरंगते शहर असून विमानांच्या परिचालनासाठी असलेल्या तळाचे क्षेत्रफळ दोन फूटबॉल मैदानांच्या एकत्र क्षेत्रफळाइतके आहे.
* * *
Jaydevi PS/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1742314)
Visitor Counter : 302