वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारत आणि अमेरिका यांच्यातला सेवा व्यापार उभय देशांच्या वाढत्या संबंधांमध्ये खूप महत्वाची भूमिका बजावेल-पियुष गोयल


फिनटेक, ऍग्रीटेक, अकौंटन्सी, कायदा, आरोग्यसेवा आणि सायबर सुरक्षा ही संधींची नवीन क्षेत्रे आहेत

भारताची एकूण सेवा निर्यात गेल्या दोन दशकांत बारा पटींनी वाढून 205 अब्ज अमेरिकी डॉलर्स झाली आहे

Posted On: 31 JUL 2021 5:05PM by PIB Mumbai

मुंबई, 31 जुलै 2021

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री  पियुष गोयल यांनी आज सांगितले की, कोविडनंतरच्या काळात आर्थिक घडी सावरण्यात मदत करण्यासाठी सेवा क्षेत्रात मोठी क्षमता आहे.

इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स (IACC) द्वारे आयोजित  दुसऱ्या भारत-अमेरिका सेवा शिखर परिषदेला संबोधित करताना गोयल म्हणाले की जगभरात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित  करण्यासाठी भारत आणि अमेरिका एकत्र काम करत आहेत.

ते म्हणाले की सेवा व्यापार हा उभय देशांमधील वाढत्या संबंधांमध्ये  खूप महत्वाची भूमिका बजावेल. भारत आणि अमेरिका हे दोन नैसर्गिक भागीदार आहेत आणि समानता, स्वातंत्र्य आणि लोकशाही या आमच्या सामायिक मूल्यांमुळे आमचे संबंध काळाच्या कसोटीवर खरे उतरले आहेत.

गोयल यांनी दोन दशकांपूर्वीच्या  Y2K आव्हानाचा उल्लेख केला  आणि भारतीय प्रतिभेने अमेरिकेला याचा सामना करण्यात कशी मदत केली आणि जगाने भारताची कौशल्ये, क्षमता आणि वचनबद्धता याची दखल घ्यायला कशी सुरुवात केली  याची आठवण करून दिली. “यामुळे भारताबद्दलचे मत  बदलले. ” असे ते म्हणाले.

भारत आता 'कमी किमतीच्या सेवा प्रदात्या'कडून  उच्च मूल्यवर्धन भागीदार 'म्हणून  वाटचाल करत आहे आणि भारतातील बॅक ऑफिसेस आता ब्रेन ऑफिस म्हणून  विकसित होत आहेत. 57 स्टार्ट अप युनिकॉर्न्सची उदाहरणे देत  गोयल म्हणाले की, तरुण भारतीयांची उद्योजकतेची भावना देशाला अव्वलस्थानी घेऊन जाईल असे गोयल म्हणाले.

2001-02 मध्ये भारताची  एकूण सेवा निर्यात 17 अब्ज डॉलर्स होती , ती आता 2020-21 मध्ये  12 पटीने वाढून 205 अब्ज डॉलर्सवर पोहचली आहे अशी माहिती त्यांनी दिली.

“जेव्हा आपण भारत-अमेरिका भागीदारीबद्दल बोलतो, तेव्हा आपल्या प्रत्येकाकडे सामर्थ्याची क्षेत्रे आहेत  ज्यात आम्ही  उत्कृष्ट आहोत. अमेरिका नवसंशोधन , तंत्रज्ञान, संशोधन आणि दर्जेदार शिक्षणाचे केंद्र आहे. भारताकडे स्वस्त दरात  कुशल आणि बुद्धिमान मनुष्यबळ आहे. आपली शक्ती एकत्र केल्यास  एक अजिंक्य आघाडी  तयार होईल, ”असे गोयल यांनी सांगितले. 

ते पुढे म्हणाले की, जगातील सर्वात मोठ्या डिजिटल बाजारपेठांपैकी एक बनण्यासाठी भारत देखील वेगाने प्रगती करत आहे. आदरातिथ्य,  फिनटेक, ऍग्रीटेक , करमणूक, लेखा, कायदा, सायबर सुरक्षा, आरोग्य सेवा आणि पर्यटन इत्यादी काही क्षेत्रे आहेत ज्यात भारत आणि अमेरिका परस्पर फायद्यासाठी सहकार्य करू शकतात.

गोयल यांनी सेवा उद्योगाच्या हितधारकांनी केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, भारताने गेल्या 15-16 महिन्यांत अपयशी न होता आंतरराष्ट्रीय दायित्व निभावले आहे.  ते म्हणाले, "आमच्या सेवांची निर्यात मागील वर्षाच्या 97% च्या पातळीवर परत आली आहे."

गोयल यांनी सध्याच्या महामारीच्या काळात अशा महत्त्वपूर्ण विषयाची  निवड करून आयएसीसीने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले . ते म्हणाले, "भारत -अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी नेहमीच आघाडीवर असलेल्या आयएसीसीने अत्यंत महत्वाच्या  वेळी हा संवाद सुरू केला आहे."

YouTube लिंक

दुसऱ्या भारत-अमेरिका सेवा शिखर परिषदेतील केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे भाषण यावर पाहता येईल.  

https://youtu.be/5rvMBxXuldw

 

 

* * *

Jaydevi PS/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1741049) Visitor Counter : 285


Read this release in: Hindi , English , Urdu