माहिती आणि प्रसारण मंत्रालय

एनएफएआय ला मिळाला जुन्या, 30 ते 50 च्या दशकातील अधिक तेलगू चित्रपटांच्या 450 काचेच्या स्लाइड्सचा दुर्मिळ खजिना


या काचेच्या स्लाइड्स म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टीच्या परंपरेचा समृद्ध वारसा : संचालक, एनएफएआय

Posted On: 30 JUL 2021 12:48PM by PIB Mumbai

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या चित्रपट खजिन्यात एक मोलाची भर पडली आहे. 450 पेक्षा अधिक काचेच्या स्लाइड्स या खजिन्यात सामावल्या आहेत. चित्रपट सृष्टीच्या अगदी सुरुवातीच्या काळातील या चित्रफिती असून ह्या दुर्मिळ स्लाइड्स सिनेमाच्या प्रारंभ युगाची साक्ष देणारे ठरले आहे.

दोन पातळ काचांच्या मध्ये चित्रफीत पॉझिटिव्ह दाबून या काचा तयार केल्या जात असत. एखादा नवा सिनेमा येणार असेल, तर त्याची घोषणा करण्यासाठी, जाहिरात करण्यासाठी या स्लाइड्सचा वापर होत असे. सिनेमाच्या मध्यंतरात किंवा चित्रपट सुरु होण्यापूर्वी थिएटर मध्ये या स्लाइड्स दाखवल्या जात असत.


"या ग्लास स्लाइड्स म्हणजे भारतीय चित्रपट परंपरेचा वैभवशाली दस्तावेजच आहेत. आमच्या चित्रपट संग्रहात हा खजिना जतन करतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे" अशी प्रतिक्रिया एनएफएआय चे संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. आज वेगाने बदलत असलेल्या  तंत्रज्ञानाच्या काळात हा ऐतिहासिक खजिना एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडणे अतिशय दुर्मिळ आणि म्हत्वाचा शोध म्हणता येईल.

ज्या फिल्म पॉझिटिव्ह, या स्लाइड्स तयार करण्यासाठी वापरल्या जात, त्या चित्रपटाच्या पोस्टर किंवा इतर प्रचार/ जाहिरातीचेच लघुरुप असे.

 


या महत्वाच्या खजिन्याबद्दल प्रतिक्रिया देताना, एनएफएआय च्या दस्तऐवज विभागाच्या प्रभारी आरती कारखानीस म्हणाल्या,"या ग्लास स्लाइड्स आपल्याला त्या प्रारंभीच्या काळातील तेलगू चित्रपट सृष्टीच्या जाहिरात कलेचे विहंगावलोकन घडवणाऱ्या आहेत. चित्रपटसृष्टीचे संशोधन करणाऱ्या लोकांसाठी हा एक महत्वाचा संदर्भ आहे. आम्ही लवकरच हे डिजिटल स्वरूपातही आणू." 
चित्रपट संग्राहलयाला मिळालेल्या खजिन्यात, अनेक महत्त्वाच्या चित्रपटांच्या ग्लास स्लाइड्स आहेत. यात व्ही व्ही राव यांचा, विधवा पुनर्विवाहावर आधारित गाजलेला सामाजिक चित्रपट 'मल्ली पेल्ली' (1939), बी एन रेड्डी यांचा 'वंदे मातरम' (1939), यात चित्तोड व्ही नागय्या अभिनित 'किलु गुरर्म' (1949), एन टी रामाराव यांचा 'दासी' (1952), शरदचंद्र चटटोपाध्याय यांच्या गाजलेल्या देवदास चित्रपटाची तेलगू आवृत्ती, राघवय्या यांचा 'देवदासु' (1953) यांसारख्या अनेक उत्तमोत्तम 70 तेलगू चित्रपटांच्या स्लाइड्स यात आहेत. सुमारे 1939 ते 1955 या काळातील हे चित्रपट आहेत.


 

सध्या एनएफएआय च्या संग्रहालयात, हिंदी, गुजराती आणि तेलगू भाषेतील 2000 पेक्षा अधिक काचेच्या स्लाइड्स आहेत.

 

********
 

STupe/RadhikaA/CYadav 

Follow us on social media: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1740650) Visitor Counter : 308