कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय

कोविड 19 आघाडीवरील कर्मचाऱ्यांसाठी आवश्यकतेनुसार  अल्पावधीचे अभ्यासक्रम

Posted On: 23 JUL 2021 9:52PM by PIB Mumbai

 

कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयाने पंतप्रधान कौशल्य विकास योजना या 18/06/2021 रोजी सुरू झालेल्या  योजनेच्या मुख्य उद्देशाला अनुसरून  आरोग्य क्षेत्राशी संबंधित सहा  रोजगार  प्रकारातील कामे करणाऱ्या एक लाख कोविड योद्ध्यांना तसेच 28,00 वाहनचालकांना द्रवरूप औषधी ऑक्सीजनच्या वाहतुकीसाठी प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने कोविड आघाडीवरील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आवश्यकतेनुसार  कमी कालावधीचे कौशल्य विकास अभ्यासक्रम जारी केले आहेत.

कुशल आरोग्य कर्मचाऱ्यांची वाढती मागणी पूर्ण करणे तसेच आरोग्य क्षेत्रातील व्यवसायिकांवरील ओझे कमी करणे आणि देशात त्वरित उपयोगात येऊ शकणारी आरोग्य यंत्रणा उभारणे ही या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे आहेत.

या आवश्यकतेनुसारच्या अल्प कालावधीतील अभ्यासक्रमांमुळे तरुणांना कौशल्याधारित प्रशिक्षण विनामूल्य घेता येईल आणि रोजगारासाठी आवश्यक ते प्रमाणपत्र व संधी मिळेल. या अभ्यासक्रमांमध्ये सहा आरोग्य क्षेत्राशी संबंधित रोजगार प्रकारातील प्रशिक्षण मिळेल. मूलभूत वैद्यकीय सहाय्य, घरच्या घरी पुरवता येणारे वैद्यकीय सहाय्य, ॲडव्हान्स केअर सपोर्ट आणि वैद्यकीय उपकरणे वापरण्यासाठी सहाय्य असे हे सहा प्रकार आहेत.  144 तास ते 312 तास असा  या अभ्यासक्रमांचा कालावधी  असेल.

प्राथमिक कौशल्य शिकण्यासाठी 21 दिवसांचा  माहिती आधारित क्लासरूम प्रशिक्षण दिले जाईल त्यानंतर साधारणतः 90 दिवसांचे ऑन जॉब प्रशिक्षण दिले जाईल. आरोग्य केंद्रे, रुग्णालये, निदान केंद्रे, नमुना जमा केंद्रे अशा ठिकाणी हे ऑन जॉब प्रशिक्षण असेल.

कौशल्य विकासासाठी  वरील सहाही क्षेत्रात एक आठवड्याचा जोड-अभ्यासक्रम असेल.

द्रवरूप वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजनची हाताळणी आणि वाहतूक यासाठी वाहन चालकांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा कालावधी 217 तास किंवा सत्तावीस दिवस असा आहे. अवजड वाहने चालवण्याचा परवाना असलेल्या वाहन चालकांना घातक रसायने तसेच  वैद्यकीय वापरासाठीच्या द्रवरूप ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी विशेष प्रशिक्षण दिले जाईल. याशिवाय वैद्यकीय वापरासाठीच्या द्रवरूप ऑक्सिजनची वाहतूक करताना सावधानतेने गाडी चालवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.

या आवश्यकतेनुसारच्या  कमी कालावधीतील अभ्यासक्रमांसाठी रु.  276 कोटी खर्च अपेक्षित आहे. रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, छोटी रुग्णालये, निदान केंद्रे या सगळ्यांचा अंतर्भाव करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंत्रालय प्रयत्न करेल.

कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात  ही माहिती दिली.

***

G.Chippalkatti/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1738360) Visitor Counter : 121


Read this release in: English , Urdu , Bengali , Telugu