भूविज्ञान मंत्रालय

उर्जा क्षेत्राशी संबंधित हवामानशास्त्रविषयक भाकिते आणखी अचूक करण्याच्या प्रयत्नांना सरकार पुढील पाच वर्षात आणखी बळकटी देणार - केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव, डॉ. एम राजीवन


‘पवन आणि सौरउर्जा निर्मितीसाठी हवामानशास्त्रीय भाकितः सद्यस्थिती आणि भविष्यकालीन दृष्टीकोन’ या विषयावर ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन

Posted On: 14 JUL 2021 6:42PM by PIB Mumbai

 

उर्जा क्षेत्राशी संबंधित हवामानशास्त्रविषयक भाकिते आणखी अचूक करण्यासाठी भूविज्ञान मंत्रालय 2021 ते 2026 या नियोजन कालावधीमध्ये  या भाकितांशी संबंधित विविध प्रकारच्या कामांना आणखी बळकटी देईल, असे केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव, डॉ. एम राजीवन यांनी सांगितले आहे. पवन आणि सौरउर्जा निर्मितीसाठी हवामानशास्त्रीय भाकितः सद्यस्थिती आणि भविष्यकालीन दृष्टीकोन’ या विषयावर आज एका ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रामध्ये ते बोलत होते. नव्या आणि नूतनक्षम उर्जा स्रोतांचा वापर वाढवण्यासाठी आणि जीवाश्म इंधनांचा वापर कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पर्यायांची सरकार चाचपणी करत आहे, असे ते म्हणाले. देशातील पवन आणि सौरउर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योग आणि संबंधितांना मदत करण्याची सामाजिक जबाबदारी भूविज्ञान मंत्रालयावर असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्था, भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि नॅशनल सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फोरकास्टिंग (एनसीएमआरडब्लू) यांसारख्या भूविज्ञान मंत्रालयाच्या संस्था सर्व संबंधितांसाठी पवन आणि सौर उर्जाविषयक हवामानाचे अंदाज जारी करत असतात, अशी माहिती त्यांनी दिली. दैनंदिन स्वरुपात हे अंदाज बऱ्यापैकी उपयुक्त ठरत असतात. मात्र सातत्याने वाढणाऱ्या मागणीमुळे आणि या क्षेत्रातील संबंधितांच्या अपेक्षांमुळे या भाकितांच्या स्वरुपात बदल करण्याची गरज निर्माण झाली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. आता 24 तासांऐवजी 15 मिनिटांच्या अंतराने अंदाज वर्तवण्याचा विचार सुरू आहे. या क्षेत्रातील विविध हितधारकांकडून वाऱ्यांचा वेग, ढगांचे आच्छादन आणि सौर किरणोत्सार लहरी या विषयीच्या अंदाजांची सातत्याने विचारणा होत असते. पवन आणि सौर उर्जा क्षेत्रातील हितधारक आणि उद्योगातील संबंधित यांच्याकडून अशा प्रकारच्या अंदाजांबाबतच्या वाढीव मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेले अभिप्राय जाणून घेण्याच्या उद्देशाने पुण्याच्या आयआयटीएमने या कार्यशाळेचे आयोजन केले होते.

या कार्यशाळेचा प्रारंभ करतानाच भूविज्ञान मंत्रालयाच्या सचिवांनी हा उद्देश स्पष्ट केला. अपारंपरिक उर्जा क्षेत्र अतिशय महत्त्वाचे आहे आणि भूविज्ञान मंत्रालयाने यामध्ये अतिशय बारकाईने लक्ष घातले पाहिजे आणि पवन आणि सौर उर्जा क्षेत्रातील संबंधितांना आवश्यक असलेले हवामानाचे अंदाज उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध असले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. पवन आणि सौर उर्जा स्रोतांद्वारे वीज निर्मिती करताना येणाऱ्या अडचणींची आम्हाला पुरेपूर जाणीव आहे, त्यासाठी खूपच जास्त स्थानिक आणि स्थाननिहाय अंदाजांची गरज असते, असे ते म्हणाले. पवन उर्जा स्रोतांद्वारे वीज निर्मिती करण्यासाठी हवामानाचे भाकित अतिशय  महत्त्वाचे असते, विशेषतः ताशी 15 किमीपेक्षा कमी गतीने वारे वाहणाऱ्या आणि डोंगराळ भागात पवनउर्जा निर्मितीसाठी हवामानाचे भाकित अचूक असणे आवश्यक असते. त्याच प्रकारे सौर उर्जा निर्मितीसाठी निरभ्र आकाश असताना भाकित करणे सोपे असते मात्र, ढगाळ वातावरण असताना सूर्यप्रकाशाबाबतचे भाकित करणे अवघड होते, असे ते म्हणाले. पवन व सौर ऊर्जेद्वारे वीजनिर्मिती वाढविण्यासाठी केंद्र सरकारने विविध उपक्रम हाती घेतले आहेत आणि महासागरासारख्या दुसर्‍या अक्षय स्त्रोताद्वारे देखील उर्जा निर्मितीसाठी प्रयत्न करत असल्याचे राजीवन यांनी सांगितले. या क्षेत्रातील विविध संबंधित या कार्यशाळेमध्ये उपस्थित असल्याचे पाहून आपल्याला अतिशय आनंद झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. उद्योगांना मदत करण्यासाठी आम्ही यापूर्वीच काम सुरू केले आहे, आणखी सुधारणा करण्याची आमची इच्छा आहे आणि या कार्यशाळेद्वारे विविध उपयुक्त शिफारसी मिळण्याची आशा आहे, असे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेमध्ये सौर आणि पवन उर्जा यांसारख्या अपारंपरिक उर्जा क्षेत्रातील विविध उद्योगांचे प्रतिनिधी आणि भारतीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्थेचे संचालक प्रा. रवी नन्जुन्दीया, भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा, नॅशनल सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फोरकास्टिंगचे (एनसीएमआरडब्लू) प्रमुख डॉ. ए. के मित्रा यांच्यासह विविध तज्ञ आणि शास्त्रज्ञ उपस्थित होते. एनडब्लूडी अंदाजांमध्ये असलेली अनिश्चितता दूर करण्याची क्षमता असलेल्या  सुधारित अंदाज प्रणालीचा वापर भूविज्ञान मंत्रालयाने सुरू केला असल्याची माहिती डॉ. मित्रा यांनी यावेळी दिली. या प्रणालीमुळे उर्जा क्षेत्रातील हवामानविषयक विविध मुद्द्यांची हाताळणी करणे शक्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हवामानाचा अंदाज एक महत्त्वाची भूमिका बजावतो आणि उर्जा क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करू शकतो असे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा म्हणाले. हवामानात दिवसभरात होणारे फेरफार उर्जानिर्मिती, वितरण आणि भार याविषयीच्या अंदाजांवर परिणाम करत असतात असे त्यांनी सांगितले. सध्याच्या हवामान बदलाच्या स्थितीत कार्बन फूटप्रिंटमध्ये कपात करणे गरजेचे आहे. आपल्याला नैसर्गिक हरित आणि पर्यावरणाला अनुकूल असणारे पर्याय शोधले पाहिजेत. सौर आणि पवनउर्जा हे असे आश्वासक पर्याय आहेत ज्यांचा भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होतो, असे भारतीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्थेचे संचालक प्रा. रवी नन्जुन्दीया यांनी सांगितले. आपल्या सरकारने 2022 पर्यंत अपारंपरिक स्रोतांपासून 175 गिगावॉट उर्जानिर्मितीची क्षमता साध्य करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी भाकिते अचूक असणे आवश्यक आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. या कार्यशाळेत इतर विविध तज्ञांनी मार्गदर्शन केले आणि विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच या क्षेत्रामध्ये आवश्यक असलेल्या सुधारणा करण्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती या तज्ञांनी या कार्यशाळेत दिली.

 

***

S.Tupe/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1735550) Visitor Counter : 262


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil