सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राज्यमंत्री भानूप्रताप सिंह वर्मा यांनी स्वीकारला सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कार्यभार

Posted On: 08 JUL 2021 12:37PM by PIB Mumbai

केंद्रीय मंत्री नारायण तातू राणे यांनी आज देशाचे  सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यांनी याआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तसेच, उद्योग, महसूल, बंदरे, रोजगार आणि स्वयंरोजगार मंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी आतापर्यंत सार्वजनिक जीवनात 35 वर्षे विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

 

 लोकसभेत पाचव्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या भानूप्रताप सिंह वर्मा यांनी देखील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. अनुसूचित जाती आणि जमाती कल्याण समितीचे सदस्य म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. एमएसएमई मंत्रालयाचे सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांचे स्वागत केले.

 

केंद्रीय मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर, नारायण तातू राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधानांच्या सक्षम नेतृत्वगुणाची तसेच एमएसएमई क्षेत्राविषयी त्यांना असलेल्या कळकळीचे त्यांनी कौतुक केले. आर्थिक विकास, नवोन्मेष आणि रोजगाराला चालना देण्यासाठी एमएसएमई क्षेत्रात मोठी क्षमता असल्याचे राणे यावेळी म्हणाले. या क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी, “एमएसएमई क्षेत्राला मुक्त करुन त्यांच्या पूर्ण क्षमता वापरण्याचा प्रयत्न करत, पाच ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट गाठण्यात योगदान देण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या क्षेत्रात रोजगारनिर्मिती, निर्यात आणि एकात्मिक विकासातून लाखो इच्छुकांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचा निश्चय त्यांनी व्यक्त केला.”

 

आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत, एमएसएमई क्षेत्राच्या उत्थानासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे असे राज्यमंत्री वर्मा यांनी सांगितले. पायाभूत विकास, पतहमी आणि अर्थसहाय,  तंत्रज्ञान अद्ययावतीकरण आणि कौशल्यविकास, या सर्व माध्यमातून, तसेच, , एमएसएमई च्या व्याखेत  बदल करत इतर अनेक व्यवसाय आणि निर्यातदारांना त्यात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.

 

कार्यभार स्वीकारल्यानंतर, मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधतांना राणे म्हणाले, एमएसएमई क्षेत्राला सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना सुरु आहेत. एमएसएमई विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील या क्षेत्राच्या प्रगतीसाठी आपले संपूर्ण योगदान द्यावे, असे राणे यावेळी म्हणाले.

***

Jaydevi PS/RA/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1733641) Visitor Counter : 341