संरक्षण मंत्रालय

इंडो-थाय कोओर्डीनेटेड पॅट्रोल (कॉर्‌पॅट )

Posted On: 09 JUN 2021 3:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 जून 2021

 

भारतीय नौदल आणि रॉयल थाय नौदल यांच्यात 31 वी भारत-थायलंड समन्वयित टेहळणी (इंडो-थाय कॉर्‌पॅट ) कवायत 9-11 जून 2021 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. भारतीय नौदल जहाज (आयएनएस) शरयू  ही स्वदेशी बनावटीची गस्ती नौका  आणि  थायलंडची  क्रबी ही गस्ती नौका तसेच दोन्ही नौदलातील डॉर्नियर सागरी गस्त विमाने कॉर्‌पॅट मध्ये सहभागी होत आहेत.

दोन्ही देशांदरम्यान सागरी संबंध मजबूत करण्यासाठी आणि हिंद महासागराच्या या महत्वाच्या भागाला आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने, दोन्ही नौदल 2005 पासून आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेलगत (आयएमबीएल) वर्षातून दोनदा कॉर्‌पॅटचे आयोजन करतात. यामुळे  नौदलांमध्ये सामंजस्य  आणि आंतरपरिचालन वाढते आणि बेकायदेशीर मासेमारी, अंमली पदार्थ तस्करी, सागरी दहशतवाद, सशस्त्र दरोडे आणि चाचेगिरी सारख्या अवैध घटना रोखण्यासाठी आणि त्यांना दडपण्याच्या उपाययोजना सुलभ होतात. तसेच तस्करी, अवैध स्थलांतर रोखण्यासाठी आणि समुद्रात मदत आणि बचावकार्यासाठी माहितीच्या देवाणघेवाणी द्वारे परिचालन ताळमेळ  वाढण्यास  मदत होते.

केंद्र सरकारच्या सागर (प्रदेशातील सर्वांची सुरक्षा आणि विकास) संकल्पनेचा एक भाग म्हणून, भारतीय नौदल प्रादेशिक सागरी सुरक्षा वाढवण्यासाठी हिंद महासागर प्रदेशातील देशांबरोबर क्रियाशील  सहभाग वाढवत आहे.  द्विपक्षीय आणि बहुपक्षीय कवायती, समन्वयित टेहळणी, संयुक्त ईईझेड देखरेख आणि मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (एचएडीआर) उपक्रमाद्वारे ते केले जाते.  भारतीय नौदल आणि थाय नौदल दरम्यान घनिष्ट आणि मैत्रीपूर्ण संबंध असून अनेक उपक्रम आणि परस्पर संवादांचा यात समावेश आहे. जे गेल्या अनेक वर्षात अधिक बळकट झाले आहेत.

आंतर-परिचालन क्षमता एकत्रित करण्यासाठी आणि थाई नौदलाबरोबर मैत्रीचे बंध अधिक घट्ट करण्याच्या भारतीय नौदलाच्या प्रयत्नांमध्ये 31-इंडो-थाय कॉर्‌पॅट योगदान देईल.

S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1725601) Visitor Counter : 311