आयुष मंत्रालय

कोविड-19 उपचारात उपयुक्त अशा 20 औषधी वनस्पतींविषयीच्या ई-पुस्तकाचे किरेन रिजिजू यांच्या हस्ते प्रकाशन

Posted On: 08 JUN 2021 8:54PM by PIB Mumbai

 

कोविड-19 वरील उपचारांमध्ये उपयुक्त ठरणाऱ्या 20 औषधी वनस्पतींविषयीच्या इ-पुस्तकाचे आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) किरेन रिजिजू यांनी आज प्रकाशन केले. 2021 मध्ये कोविड-19 उपचारांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या 20 औषधी वनस्पती हे इ-पुस्तक राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाने तयार केले आहे. महत्त्वपूर्ण वनौषधी आणि त्यांचे उपचारविषयक गुणधर्म  अधोरेखित करण्यासाठी या  पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. या औषधी वनस्पती कोविड-19 चा प्रतिबंध आणि व्यवस्थापन यांसाठी उपयुक्त आहेत.

ताप, खोकला, सर्दी, अशक्तपणा, वेदना इत्यादी लक्षणे निर्माण होण्यासारखी परिस्थिती असल्यास, या इ-पुस्तकात वर्णन केलेल्या वनौषधी वापरता येतील. या इ-पुस्तकात त्या वनस्पतींची वनस्पतिशास्त्रीय नावे, प्रादेशिक भाषांतील नावे, रासायनिक घटक, उपचारात्मक गुणधर्म, औषधशास्त्रीय तत्त्वे आणि महत्तपूर्ण सूत्रेही नमूद करण्यात आली आहेत. यातून सर्वसामान्य जनतेला, कोविडच्या प्रमाणित उपचार व देखभालीबरोबरच, त्याच्या प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी उपयुक्त अशा औषधी वनस्पतींबद्दल ज्ञान मिळेल. औषधी वनस्पतींच्या वैविध्याविषयी जागृती निर्माण होईल.

देशभरात औषधी वनस्पतींची लागवड आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाला किरेन रिजिजू यांनी यावेळी प्रोत्साहन दिले. तर देशाच्या सर्व भागांमध्ये औषधी वनस्पतींची लागवड, संवर्धन व विपणन करण्यासाठी या मंडळाकडून होत असलेल्या प्रयत्नांची आयुष सचिव- वैद्य राजेश कोटेचा यांनी प्रशंसा केली. मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जे.एल.एन.शास्त्री यांनी यावेळी बोलताना, स्थानिक पातळीवर बहुजनांमध्ये वनौषधींच्या अधिक चांगल्या वापराविषयी जनजागृती करण्याच्या गरजेवर भर दिला.

***

M.Chopade/J.Waishampayan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1725439) Visitor Counter : 779


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu