सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

‘नियर टू होम’ (घराजवळ) लसीकरण केंद्रांच्या तरतुदीचा लाभ मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगजनांना होईल : रतन लाल कटारिया

Posted On: 28 MAY 2021 6:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 मे 2021

 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगजनांना लसीकरण केंद्रे घराजवळ उपलब्ध करून देण्याबाबत जारी केलेल्या निर्देशांचे स्वागत करीत, केंद्रिय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्य मंत्री, रतन लाल कटारिया म्हणाले की, मंत्रालयाने हे पाऊल उचलल्यामुळे याचा लाभ देशभरातील जवळपास 14 कोटी ज्येष्ठ नागरिक आणि 2.2 कोटी दिव्यांगजनांना होऊ शकणार आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने यापूर्वीच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे चाचणी, उपचार आणि लसीकरणात दिव्यांग व्यक्तींना भेडसावत असलेल्या समस्या मांडल्या होत्या.

एआयआयएमएस, दिल्ली येथील ज्येष्ठांसाठी असलेल्या कक्षाशी सल्लामसलत करून मंत्रालयाने 27 एप्रिल 2021 रोजी कोविड प्रतिबंधक वर्तनाचा अंगिकार करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. 

कटारिया म्हणाले की, मोदी सरकार लोकांच्या गरजाबाबत अतिशय संवेदनशील आहे आणि सध्या सुरू असलेल्या साथीच्या परिस्थितीत तातडीने आराम मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत. त्यांनी पुढे माहिती दिली की, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय हे समाजातील दुर्बल घटक आणि इतर असुरक्षित गटांप्रती वचनबद्ध आहे.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने तृतीयपंथीय  लोकांना मानसिक आधार देण्यासाठी  एक हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. आजूबाजूच्या परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या आणि अनिश्चित वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर ताणाला सामोरे जात असलेल्या तृतीयपंथीयांसाठी तज्ञ मानसशास्त्रज्ञांच्या माध्यमातून समुपदेशन सेवा उपलब्ध आहे.

संबंधित राज्य सरकारांनी लागू केलेल्या टाळेबंदीच्या निर्बंधामुळे विपरित परिणाम झालेल्या  तृतीयपंथीय व्यक्तींना एकरकमी 1,500 रुपये आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा मंत्रालयाने केली आहे. अंतरिम मदत म्हणून गेल्या वर्षी तृतीयपंथीय समुदायाच्या 7,000 लोकांना लाभ देण्यात आला.

कटारिया पुढे म्हणाले, मंत्रालाने 20 मे 2021 रोजी जारी केलेल्या एका पत्राद्वारे सर्व राज्यसरकारांना असे आवाहन केले होते की, तृतीयपंथीय समुदायामध्ये स्थानिक भाषांमधून कोविड लसीकरण कार्यक्रमाबाबत जनजागृती निर्माण करावी, सध्या सुरू असलेली लसीकरण केंद्रे तृतीयपंथीयस्नेही असावीत तसेच तृतीयपंथीयांसाठी लसीकरणासाठी स्वतंत्रपणे शिबिरे आयोजित करावीत तसेच फिरते लसीकरण बूथ तयार करावेत.

मंत्री म्हणाले की, आपण जगातील सर्वांत मोठ्या,व्यापक आणि  गतिशील लसीकरण कार्यक्रमाचे साक्षीदार आहोतसरकारने 130 दिवसांमध्ये 20.27 कोटी लसींच्या मात्रा पुरविल्या आहेत. कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेविरोधात एकत्रितपणे लढा देण्यासाठी सर्व सार्वजनिक , प्राथमिक भागधारकांना एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. कटारिया यांनी  पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  दृढ नेतृत्त्वाप्रति विश्वास व्यक्त केला आणि  लवकरच समाजातील सर्व घटकांच्या सहकार्याने आपण दुसऱ्या लाटेवर मात करू शकू असा विश्वास व्यक्त केला.

 

Jaydevi PS/S.Shaikh/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1722505) Visitor Counter : 128