संरक्षण मंत्रालय

तामिळनाडूची बेपत्ता मच्छिमार बोट ‘मर्सिडीझ’ची भारतीय तटरक्षक दलाकडून सुटका

Posted On: 01 MAY 2021 8:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 मे 2021

भारतीय तटरक्षक दलाने अतिशय व्यापक शोधमोहीम राबवून तामिळनाडूच्या बेपत्ता असलेल्या ‘मर्सिडीझ’ या मच्छिमार बोटीची सुखरूप सुटका करत आणखी एक शोध आणि बचावकार्य यशस्वी केले आहे. गोव्यापासून सुमारे 1100 किलोमीटर (590 मैल) अंतरावर असलेल्या समुद्रात 24 एप्रिल 2021 पासून या बोटीच्या शोधासाठी अतिशय व्यापक मोहीम राबवण्यात आली. केरळच्या किनारपट्टीवरून 6 एप्रिल 2021 रोजी ही बोट खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी 30 दिवसांच्या प्रवासासाठी निघाली होती. मात्र, 24 एप्रिल रोजी इतर मच्छिमार बोटींना काही अवशेष सापडल्यामुळे ही बोट बुडाल्याचे समजून ही माहिती तामिळनाडूच्या मत्स्य प्राधिकरणाला कळवण्यात आली. भारतीय तटरक्षक दलाच्या मेरिटाईम रेस्क्यू को ऑर्डिनेशन सेंटरने (एमआरसीसी) ही बोट ज्या भागात असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती त्या भागात तात्काळ आंतरराष्ट्रीय सुरक्षा जाळ्याचा वापर करुन व्यापारी जहाजांना तिची माहिती कळवली. त्याच वेळी तटरक्षक दलाच्या समुद्र प्रहरी या जहाजाला या शोधासाठी पाचारण करण्यात आले. बेपत्ता बोटीचे संभाव्य स्थान पाकिस्तानच्या शोध आणि बचाव क्षेत्रात असल्याने कराचीच्या सागरी बचाव समन्वय केंद्राला देखील मदतीसाठी विनंती करण्यात आली. तसेच किनारपट्टीपासून हे स्थान खूपच दूर अंतरावर असल्याचे लक्षात घेऊन दूर अंतरावर गस्त घालणाऱ्या विमानाची मदत पुरवण्याची विनंती भारतीय नौदलाला करण्यात आली. या बोटीवर दळणवळणविषयक सामग्री देखील नसल्याचे आढळल्याने शोध पथकांना बोटीवरील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधता येत नव्हता.

किनारपट्टीपासून जास्त असलेले अंतर आणि हवामान यांसारख्या आव्हानांना तोंड देत चार दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर लक्षद्वीप बेटांपासून 370 किलोमीटर (200 मैल) अंतरावर बेपत्ता असलेली ही बोट आढळली. तटरक्षक दलाच्या डॉर्निअर विमानाला ही बोट सापडली. त्यानंतर मुंबईच्या एमआरसीसीने या मच्छिमार बोटीवर असलेल्या सॅटेलाईट फोनवरून संपर्क साधला आणि बोटीवरील कर्मचारी सुखरुप असल्याची खातरजमा केली. दरम्यानच्या काळात या कर्मचाऱ्यांनी देखील या फोनवरून आपल्या घरच्यांशी संपर्क साधून आपण सुखरुप असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर लक्षद्वीप इथं तैनात असलेल्या तटरक्षक दलाच्या विक्रम या जहाजाला देखील मच्छीमार बोटीवरील कर्मचाऱ्यांना लॉजिस्टिक्स आणि वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी पाठवण्यात आले होते. या जहाजाला 29 एप्रिल रोजी या बोटीचे स्थान लक्षद्वीपच्या सुहेली पारपासून 25 सागरी मैलांवर असल्याचे दिसून आले. त्या भागात जाऊन विक्रम या जहाजाने बोटीवरील कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रथमोपचार पुरवले आणि सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती दिली.   

 

S.Tupe/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1715434) Visitor Counter : 207