आयुष मंत्रालय
आंतरराष्ट्रीय योग दिन 2021 साजरा करण्याची पूर्वतयारी म्हणून ऑनलाईन योग प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन
Posted On:
22 APR 2021 9:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 एप्रिल 2021
या वर्षीच्या 21 जूनला येणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिवस 2021 साजरा करण्यास अवघे दोन महिने राहिलेले असताना केंद्र सरकारचे आयुष मंत्रालय आणि युवक व्यवहार व क्रीडा मंत्रालय एका संयुक्त कार्यक्रमासाठी एकत्र आले असून त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी ऑनलाईन योग प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केला आहे. 21 एप्रिल 2021 रोजी या कार्यक्रमाची सुरुवात झाली असून 1 मे 2021, 21 मे 2021 आणि 1 जून 2021 या तीन दिवशी हाच संपूर्ण कार्यक्रम पुन्हा परत घेतला जाणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात सोप्या रीतीने योग शिकण्यासाठी तयार केलेल्या सामायिक योगविषयक नियमावलीनुसार योगाभ्यास शिकविला जाणार आहे. प्रत्येक प्रशिक्षण वर्गात 24 सत्रे आहेत आणि प्रत्येक सत्र जास्तीत जास्त एक तास कालावधीचे आहे. दोन्ही मंत्रालयांनी ह्या प्रशिक्षण कार्यक्रमाची वेळ आंतरराष्ट्रीय योग दिनाला अनुरूप ठरेल अशा रीतीने निश्चित केली आहे कारण हा दिवस सर्वसामान्य जनतेच्या मनात आणि दैनंदिन जीवनात योग साधनेचा समावेश व्हावा यासाठी एक आदर्श निमित्त उपलब्ध करून देतो.
सध्या सर्वत्र पसरलेल्या महामारीशी संपूर्ण जग अत्यंत धैर्याने लढा देत आहे, तरीही या रोगाचा संसर्ग झालेल्यांची संख्या पुनःपुन्हा वाढताना दिसत आहे. लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर या महामारीचा होत असलेल्या परिणामाबाबत सर्वदूर चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. जीवनाच्या या कष्टदायी टप्प्यात बहुआयामी फायदे करून देणारा योगाभ्यास सर्वसामान्यांना अत्यंत उपयोगी पडत आहे आणि बदललेल्या या कटू सत्य परिस्थितीत, आपल्या रोजच्या जीवनात समतोल साधण्यासाठी दीर्घकाळ मदत करणाऱ्या योगाच्या आरोग्य संवर्धक दृष्टीकोनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सातत्याने केलेला योगाभ्यास आरोग्य सुधारण्यास आणि नैसर्गिक प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतो.
सामायिक योगविषयक नियमावली म्हणजे 45 मिनिटे चालणारी विविध योगासनांची विशिष्ट मालिका असून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आयोजनाचे ते केंद्रस्थान आहे. भारतातील काही अत्यंत व्यासंगी योग गुरूंनी 2015 मध्ये योगासनांच्या या मालिकेची रचना केली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करताना, जनसामान्यांकडून सुसंवादी स्वरूपात एकत्रितपणे योगाभ्यास करवून घेण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या गरजेतून नवशिक्यांकडून योगाभ्यास करून घेण्यासाठी यात काही आसनांची आदर्श जुळणी करण्यात आली आहे. सर्वांना शिकण्यास सोपी व्हावी अशा पद्धतीने या आसनांच्या मालिकेची रचना करण्यात आली आहे आणि साध्या प्रशिक्षण सत्रांमधून ऑनलाईन वर्गांमध्ये ही आसने शिकता येण्याजोगी आहेत.
S.Thakur/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1713474)
Visitor Counter : 269