आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्यासाठी केंद्र सरकारने उचलली पावले
औद्योगिक ऑक्सिजन 9 उद्योगांसाठी मर्यादित
द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनच्या वाहतुकीच्या दृष्टीने ग्रीन कॉरिडॉरमधून धावणाऱ्या विशेष ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ गाड्या
Posted On:
18 APR 2021 10:45PM by PIB Mumbai
देशभरातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविडच्या दैनंदिन रुग्णांमध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे. कोविड रूग्णांच्या उपचारासाठी वैद्यकीय ऑक्सिजनची आवश्यकता ही एक महत्त्वपूर्ण बाब आहे. देशात कोविड-19 रुग्णांच्या नुकत्याच झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर, कोविड रुग्णांवरील परिणामकारक वैद्यकीय उपचारांसाठी ऑक्सिजनची आवश्यकताही अनेक पटींनी वाढली आहे. आधीच एकूण दैनंदिन ऑक्सीजन उत्पादन 60 टक्क्यांपर्यंत पोचले आहे आणि आता यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने (डीपीआयआयटी) दिली आहे. वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याची नोंद,काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून झाली आहे.
भारत सरकार कोविडचा प्रादुर्भाव असलेल्या राज्यांना वैद्यकीय ऑक्सिजनसह आवश्यक वैद्यकीय उपकरणांचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करीत आहे आणि त्यावर नियमित देखरेख ठेवत आहे. तसेच वेळोवेळी उद्भवणार्या आव्हानांवर मात करीत आहे. देशभरात वैद्यकीय उपकरणे, वैद्यकीय ऑक्सिजनसहित औषधांचा आवश्यक पुपुरवठ्याचे व्यवस्थापन करण्याचे आदेश भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग (डीपीआयआयटी) चे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारप्राप्त गट -II (ईजी -II ) यांनी दिले आहेत. देशभरात वैद्यकीय ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी भारत सरकारने अलिकडच्या काळात त्वरित आणि वेळेवर अनेक उपाययोजना केल्या आहेत.दैनंदिन उत्पादन वाढविण्यासह वैद्यकीय ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. ऑक्सिजनचे दैनंदिन उत्पादन आणि साठा वाढविणे तसेच उपलब्ध ऑक्सीजनच्या अनुकूल आणि तर्कसंगत उपयोगासाठी राज्ये / केंद्रशासित प्रदेश योग्य ती पावले उचलत आहेत. मात्र सध्याची गरज बघता अतिरिक्त उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
केंद्र सरकारने घेतलेल्या आज दुसर्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार , उत्पादक आणि पुरवठादारांकडून औद्योगिक उद्देशासाठीच्या ऑक्सिजनचा पुरवठा 22.04.2021 पासून पुढील आदेश येईपर्यंत प्रतिबंधित करण्यात आला आहे. डीपीआयआयटीने सर्व भागधारकांसोबत ही बाब विचारात घेऊन विचारविनिमय केल्यानंतर वैद्यकीय ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ऑक्सिजनच्या औद्योगिक वापरावर निर्बंध घालण्याचा विवेकी निर्णय घेतला.
या तात्पुरत्या निर्बंधामुळे उपलब्ध असणारा अतिरिक्त ऑक्सिजन कोविड-19 रूग्णांच्या उपचारासाठी वैद्यकीय ऑक्सिजन म्हणून वापरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तथापि, हे प्रतिबंध खालील नऊ उद्योगांच्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर लागू राहणार नाहीत
i) औषधाची हवाबंद कुपी आणि कुप्या
ii) औषधोत्पादन
iii) पेट्रोलियम शुद्धीकरण उद्योग
iv) पोलाद प्रकल्प
v) अणु उर्जा सुविधा
vi) ऑक्सिजन सिलेंडर उत्पादक
vii) सांडपाणी प्रक्रिया करणारे प्रकल्प
viii) अन्न व पाणी शुध्दीकरण
ix) भट्टी, प्रक्रिया इत्यादींच्या अखंडित कार्यान्वयनाची आवश्यकता असलेले संबंधित राज्य सरकारांनी मंजूरी दिलेले प्रक्रिया उद्योग
ऑक्सिजन मिळवण्याच्या स्थितीत नसलेल्या वरील औद्योगिक उद्योगांव्यतिरिक्त विशिष्ट गरजा असलेल्या उद्योगांनी ऑक्सिजनची आयात करणे किंवा आवश्यक असणार्या ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी स्वतःचे एअर सेपरेटर युनिट्स (एएसयू) बसविणे यासारख्या पर्यायी उपायांचा विचार करावा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व मुख्य सचिवांना या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी आणि त्यांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.
याव्यतिरिक्त, रेल्वे मंत्रालय मुख्य कॉरिडॉरमधून द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन (एलएमओ) आणि ऑक्सिजन सिलेंडरची वाहतूक करण्यासाठी आणि ऑक्सिजन एक्सप्रेस चालविण्यासाठी सज्ज आहे. देशभर ऑक्सिजनच्या सुलभ आणि सुरळीत वाहतुकीच्या सोयीसाठी तसेच ऑक्सिजन एक्सप्रेस गाड्यांची ये जा वेगवान होण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार केला जात आहे. यामुळे रूग्णांना मोठ्या प्रमाणात आणि जलदगतीने वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा होईल.
***
R.Aghor/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1712597)
Visitor Counter : 255