पर्यटन मंत्रालय
जागतिक वारसा दिन 2021 निमित्ताने ' भारतीय वारसा : सामर्थ्य पर्यटनाचे’ या विषयावरील वेबिनारमध्ये प्रल्हाद सिंह पटेल यांचे भाषण
रामायणावरील पहिल्या ऑनलाईन प्रदर्शनाचे उदघाटन
Posted On:
18 APR 2021 9:56PM by PIB Mumbai
केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) प्रल्हाद सिंह पटेल यांनी आज जागतिक वारसा दिन 2021 च्या निमित्ताने पर्यटन मंत्रालयाच्या वतीने आयोजित “भारतीय वारसा : सामर्थ्य पर्यटनाचे” या वेबिनारला संबोधित केले. महर्षी वाल्मिकी लिखित ‘रामायण’ या महाकाव्यावरील आतापर्यंतच्या पहिल्याच ऑनलाईन प्रदर्शनाचे उदघाटनही त्यांनी केले. या ऑनलाईन प्रदर्शनात 17 व्या शतकापासून ते 19 व्या शतकापर्यंत भारतातील विविध कला विद्यालयांच्या दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयाने संग्रहित केलेल्या एकोणपन्नास (49) लघु चित्रकृती मांडण्यात आल्या आहेत.
https://nmvirtual.in/Virtual_Tour/Ramayan/ या वेबलिंकवर हे ऑनलाईन प्रदर्शन पाहता येईल.
आपल्या भाषणात पटेल म्हणाले की, जागतिक वारसा दिन हा गेल्या 39 वर्षांपासून साजरा केला जात असला तरी, आपला वारसा हजारो वर्षे जुना आहे.
मंदिरे, नृत्य, संगीत, शास्त्रे यांचा भारताला अनोखा वारसा आहे जो जगात कुठेही आढळत नाही आणि भविष्यातील पिढ्यांसाठी या अमूल्य वारशाचे रक्षण करणे ही एक सामुहिक जबाबदारी आहे. आणि यामध्ये नियामक आणि प्रशासकीय चौकटी व्यतिरिक्त समाजाच्या सहभागावर आणि जागृतीवर नव्याने भर देणे आवश्यक आहे.
आपली वारसा स्थळे आणि स्मारके यांचा विविध कलात्मक परंपरा आणि संस्कृतींशी जवळचा संबंध आहे. आपल्याकडे बहुतांश पुरातन स्थळे आणि मंदिरे आहेत मात्र पात्र असूनही जागतिक व्यासपीठावर त्यांना अद्याप स्वीकारण्यात आलेले नाही, असे पटेल यावेळी म्हणाले. भारताच्या विशाल संस्कृतीवर योग्य प्रकाश टाकू शकतील आणि आपली संस्कृती, व्यावसायिक पध्दतीने जागतिक व्यासपीठावर घेऊन जाऊ शकतील अशा संवर्धक, पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इतिहासकारांचा समावेश असलेल्या दर्जेदार विद्वान आणि अभ्यासकांना एकत्र आणणे आवश्यक आहे.
सरकार पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करत आहे असे सांगत,आपली संस्कृती आणि वारसा पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण आहेत, असेही पटेल यावेळी म्हणाले.
या दिशेने, आपली संस्कृतीच आणि वारसा यांचा पद्धतशीर विकासाचा समावेश असलेली दीर्घकालीन योजना आपल्याकडे असणे आवश्यक आहे आणि त्यामध्ये तरुण पिढीच्या सहभागासह ठोस परिणाम मिळण्यासाठी ही योजना योग्य मंचांवर मांडली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
***
R.Aghor/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1712592)
Visitor Counter : 228