जलशक्ती मंत्रालय
जल जीवन अभियान: मार्च, 2022 पर्यंत 25 लाख नळ जोडण्या देण्याची कर्नाटकची योजना
Posted On:
18 APR 2021 5:19PM by PIB Mumbai
कर्नाटक राज्याने जल-जीवन मिशन अंतर्गत 2021-22 साठी राज्याच्या कृती योजनेचा तपशील तसेच संपूर्ण राज्यासाठी परिपूर्ण योजनेसह आपला वार्षिक कृती आराखडा आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सादर केला, ज्यामध्ये प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाद्वारे पाण्याच्या जोडण्या मिळतील. सन 2021-22 मध्ये राज्यातील ग्रामीण भागात 25 लाख नळ जोडण्या पुरवण्याचा राज्याचा विचार आहे.
कर्नाटक राज्यात 91.19 लाख ग्रामीण कुटुंबे आहेत, त्यापैकी फक्त 28.44 लाख (31.2%) कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा होत आहे. आतापर्यंत राज्यातील 23 पंचायती आणि 676 गावे ‘हर घर जल’ म्हणजेच प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाद्वारे पाणी पुरवठा जाहीर करण्यात आली आहेत. समाजाला सक्षम बनवणारा हा एक मोठा निर्णय आहे, जो स्त्रिया आणि तरुण मुलींना केवळ सुलभ जीवनशैली देत नाही तर त्यांना शिक्षण सुरु ठेवण्यासाठी, वेगवेगळे व्यावसायिक अभ्यासक्रम शिकण्यासाठी, कौशल्य विकसित करण्यासाठी तसेच कुटुंबासाठी अतिरिक्त वेळही देतो.
कर्नाटकमध्ये 95 टक्के शाळा आणि 95 टक्के अंगणवाडी केंद्रे, 84 टक्के आश्रमशाळा,91 टक्के ग्रामपंचायत इमारती आणि 92 टक्के आरोग्य केंद्रांवर नळाद्वारे पाणी पुरवठा आहे. पुढील काही महिन्यांत शैक्षणिक केंद्रे, जीपी इमारत आणि आरोग्य केंद्रांना समाविष्ट करण्याची राज्याची योजना आहे. लोकांमध्ये सांडपाण्याचे व्यवस्थापन आणि वर्तन बदलण्याची तातडीने गरज आहे जेणेकरून मर्यादित स्त्रोत असलेल्या पाण्याचा योग्य वापर केला जाऊ शकेल. चालू आर्थिक वर्षात प्राधान्य गटात येणारी 17,111 गावे अर्थात दुष्काळग्रस्त व वाळवंट प्रदेश, अनुसूचित जाती-जमाती बहुल वस्त्या , महत्त्वाकांक्षी जिल्हे इत्यादीमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची राज्याची योजना आहे.
राज्याने सादर केलेल्या योजनेचे राष्ट्रीय समितीने विश्लेषण केले आणि सूचना दिल्या. मागील वर्षाचे राहिलेले काम तसेच चालू वर्षासाठी नियोजित कामाला गती देण्याचे समन्वित प्रयत्न करण्याचे आवाहन राज्याला करण्यात आले.2021-22 मध्ये कर्नाटकातील 30 जिल्ह्यांपैकी दोन जिल्ह्यांमध्ये ग्रामीण कुटुंबाना 100 टक्के नळ जोडणी सुनिश्चित करण्याची राज्याची योजना आहे. समितीने केवळ घरातच नव्हे तर शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्येही पुरवठा होत असलेल्या पाण्याची तपासणी करण्याच्या गरजेवर भर दिला.
***
G.Chippalkatti/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1712555)
Visitor Counter : 158