PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 13 APR 2021 7:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 13 एप्रिल 2021

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

गेल्या चोवीस तासांत 40 लाखांहून अधिक मात्रा देत, लसीकरण उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी भारताचे आजवरचे एकूण लसीकरण 10.85 कोटींच्या पुढे

आज सकाळी सात वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अंतरिम अहवालानुसार देशात एकूण 16,08,448 सत्रांमध्ये लसीच्या 10,85,33,085 मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये पहिली मात्रा घेतलेल्या 90,33,621 इतक्या आणि दुसरी मात्रा घेतलेल्या 55,58,103 आरोग्य कर्मचाऱ्यांचा (HCW) समावेश आहे.

दररोज निदान होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत 10 राज्यांमध्ये अजूनही चढते प्रमाण

भारतातील दररोजची नवीन रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत देशभरात 1,61,736 नवीन रुग्ण आढळले आहेत.

महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान आणि केरळ या दहा राज्यांमध्ये कोव्हिडच्या नवीन रुग्णसंख्येत वाढ नोंदली गेली आहे.

आपत्कालीन परिस्थितीत स्पुटनिक-व्ही लसीच्या मर्यादित वापराला राष्ट्रीय नियमकाकडून मंजुरी

केंद्र सरकार कोविड-19 शी लढा देण्यासाठी पुढाकाराने संपूर्ण जबाबदारी उचलून विचारपूर्वक आणि वेळेपूर्वी पावले टाकत आहे. यामध्ये टाळेबंदी, सर्वेक्षण, चाचण्या, कोविड-उचित वर्तन आणि लसीकरण या पैलूंवर भर देण्यात येत आहे. 16 जानेवारी 2021 पासून देशव्यापी लसीकरण मोहीम सुरु आहे. आपत्कालीन परिस्थितीतील वापरासाठी अधिकृत (EUA) म्हणून दोन लसींना राष्ट्रीय नियामक- म्हणजेच भारतीय औषध महानियंत्रकांकडून (DCGI) या पूर्वी मंजुरी मिळाली आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेली 'कोव्हीशील्ड' आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने तयार केलेली 'कोव्हॅक्सिन' या त्या दोन लसी आहेत. तसेच, देशात इतर अनेक लसी, विकसनाच्या विविध टप्प्यांवर आहेत.

परदेशात तयार झालेल्या व आपत्कालीन स्थितीत मर्यादित वापरासाठी अन्य देशांची मंजुरी मिळालेल्या कोविड-19 लसींना तातडीने परवानगी देण्याच्या प्रक्रियेला केंद्र सरकारने दिला वेग, जेणेकरून देशांतर्गत वापरासाठी विविध लसी उपलब्ध होऊन लसीकरणाचा वेग व व्याप्ती वाढेल

कोविड-19 साथीचा जोमाने प्रतिकार करण्यासाठी भारत एक सर्वंकष दृष्टिकोन ठेवून वाटचाल करीत आहे. या संदर्भात, मे-2020 मध्ये भारताने लसींच्या निर्मितीसाठी संशोधन व विकास करण्याकरिता प्रधान वैज्ञानिक सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली एका कृतिदलाची स्थापना केली. तर ऑगस्ट-2020 मध्ये नीती आयोगाच्या सदस्यांच्या अध्यक्षतेखाली लसीकरण कार्यक्रम सुरु करण्यात मदत करण्यासाठी तज्ज्ञ गटाची स्थापना केली. या रणनीतीमुळे, देशांतर्गत लसीकरणासाठी 'भारतात तयार झालेल्या' - मेड इन इंडिया अशा दोन लसी उपलब्ध असणारा भारत हा पहिला देश ठरला.

क्षयरोग मुक्त भारत

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी, जागतिक आरोग्य संघटना व राष्ट्रीय क्षयरोगासाठीचे प्रणालीच्या माध्यमातून क्षयरोग तंत्रज्ञान कन्सल्टंट नेटवर्कला संबोधित केले. या वेळी जागतिक आरोग्य संघटना- SEARO च्या विभागीय अध्यक्ष पूनम क्षेत्रपाल सिंग आणि जागतिक आरोग्य संघटनेचे भारतातील प्रतिनिधी डॉक्टर रोड्रिको आफ्रीन हे उपस्थित होते.

महाराष्ट्र अपडेट्स

राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा नियोजन समित्यांना 30 टक्के निधी वापराची परवानगी असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण झाला आहे. तरीसुद्धा पूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे. ते म्हणाले, कोरोनाविरोधातील लढ्यात पुढचा पंधरवडा अतिशय महत्त्वाचा आहे. उपचारासाठी लागणाऱ्या खाटांची संख्या वाढवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. शासनाने खासगी रुग्णालयांतील खाटा ताब्यात घेतल्या आहेत. तसेच ऑक्सिजन पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठ्याच्या नियंत्रणाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली. रेमडेसिवीर इंजेक्शन विक्रीतील गैरप्रकार थांवबण्यासाठी त्याच्या किरकोळ विक्रीवर निर्बंध आणले आहेत.   

राज्यात सोमवारी 51,751 रुग्णांची नोंद झाली, ज्यामुळे एकूण रुग्णसंख्या 34,58,996 एवढी झाली आहे. तसेच 258 मृत्यूंची नोंद झाली, त्यामुळे एकूण मृत्यूसंख्या 58,245 एवढी झाली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 81.94 % आहे तर मृत्यूदर 1.68% आहे. राज्यात सध्या 5,64,746 सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईत 6893 नवीन रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 5,27,391 एवढी झाली. तर, सोमवारी 43 मृत्यूंची नोंद झाली.

***

S.Thakur/ P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1711562) Visitor Counter : 220