उपराष्ट्रपती कार्यालय
समाजातील प्रत्येक स्वरूपातली स्त्री-पुरुष असमानता दूर करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
राजयोगिनी दादी जानकी यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट केले प्रकाशित
सध्याच्या कोविड -19 महामारी मध्ये गरजूंना मदत करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
Posted On:
12 APR 2021 9:15PM by PIB Mumbai
समाजातील स्त्री-पुरुष असमानता दूर करत स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रात समान हक्क देण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी आज केले.
उपराष्ट्रपतींनी आज नवी दिल्लीत ब्रह्मकुमारी संस्थेच्या माजी प्रमुख राजयोगिनी दादी जानकी यांच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट जारी केले. ब्रह्मकुमारी ही स्त्री नेतृत्वाखालील संघटना असल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. जागतिक स्तरावरची ही चळवळ म्हणजे स्त्रीसक्षमता आणि स्त्रीस्वातंत्र्य ही उद्दिष्टे साध्य करणारी आदर्श चळवळ आहे. अध्यात्मिक दृष्टीमुळे स्त्री- पुरुष असमानता ओलांडता येतो याचे भान या चळवळीने दिले.
वैदिक काळातील गार्गी आणि मैत्रेयी या महान विद्वान स्त्रियांचा उल्लेख करून नायडू म्हणाले की, भारताला प्रत्येक क्षेत्रातील स्त्री नेतृत्वाचा इतिहास आहे. प्राचीन भारतात दैवी स्त्रीला शक्ती स्वरूपात पूजले जात होते, याचा उल्लेख करून, जी मूल्ये नाकारल्याने समाजात सर्वदूर स्त्रियांच्या बाबतीतील भेदभाव दिसून येतो ती मुल्ये पुनर्स्थापित करण्याचे आवाहन केले .
आदरणीय दादी जानकी यांच्याबरोबर ब्रह्मकुमारी संस्थेच्या शांतीवन प्रांगणात 2019 मध्ये झालेल्या भेटीचा त्यांनी उल्लेख करत, दादी जानकीयांचा उल्लेख आधुनिक काळातील एक महत्वपूर्ण अध्यात्मिक नेतृत्व असाकेला. शांतपणा आणि सामंजस्याची मूर्ती असा दादी जानकी यांचा उल्लेख करत, त्यांनी ज्याची शिकवण दिली त्याचे आचरण आयुष्यभर केले असे उपराष्ट्रपतींनी नमूद केले.
दादीजींच्या ईश्वर समर्पित आणि मानवतेच्या निस्वार्थ सेवेला समर्पित जीवनापासून लोकांनी प्रेरणा घ्यावी असे उपराष्ट्रपतींनी सांगितले. प्रेम, सेवा आणि साधेपणा ही त्यांची शिकवण सर्वांसाठीच खरोखर अनुकरणीय आहे असे सांगत त्यांनी प्रत्येकाला समान संधी असलेला आणि सर्वजण एकमेकांशी सुसंवाद राखत आहेत असा भारत निर्माण करण्यासाठी लिंगभेद, जातिभेद आणि जातीय वाद यासारख्या सामाजिक दुर्गुणांशी लढा देण्याचे आवाहन केले. ‘सर्वांबद्दल काळजी’ तसेच ‘वसुधैव कुटुम्बकम’ यासारखी भारतीय मुल्ये हा जागतिक शांततेकडे जाणारा शाश्वत मार्ग आहे असे त्यांनी सांगितले .
अध्यात्मिकता हा सर्व धर्मांचा पाया असल्याचे आवर्जून सांगत नायडू म्हणाले की फक्त अध्यात्मिक ज्ञान हे जगात खरी शांती एकता आणि सुसंवाद यांची हमी देऊ शकते. अध्यात्मिकता ही प्रत्येकाला त्याच्या सामाजिक आणि नैसर्गिक वातावरणाशी जोडून ठेवते असे उपराष्ट्रपतीनी सांगितले. जेव्हा अशा प्रकारचा सुसंवाद होतो तेव्हा प्रत्येक जण समाजाला आणि देशाला सकारात्मक योगदान देतो असेही त्यांनी नमूद केले.
ब्रम्हकुमारी सारख्या संस्था लोकांच्या शंकांना तसेच प्रश्नांना सोप्या भाषेत उत्तर देऊन मदत करतात तसेच त्यांच्या जीवनात शांतता आणि सुसंवाद आणतात याबद्दल नायडू यांनी समाधान व्यक्त केले.
इतरांची सेवा हाच आनंद या दादी जानकी यांच्या तत्त्वाला अनुसरत प्रत्येकाने सध्याच्या कोविड -19 महामारीत गरजूंना मदत करावी तसेच आधार द्यावा असा सल्ला नायडू यांनी दिला.
अशा अध्यात्मिक गुरूच्या पहिल्या स्मृतीदिनाला टपाल तिकीट प्रदर्शित करायला मिळणे ही त्यांना योग्य श्रद्धांजली असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, सीबीआयचे माजी संचालक डी आर कार्तिकेयन, ब्रह्मकुमारी भगिनी आशा, ब्रह्मकुमारी भगिनी शिवानी, मृत्युंजय आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. ब्रह्मकुमारी संस्थेचे इतर सदस्य जगभरातून या कार्यक्रमाला दूर दृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते
***
N.Chitale/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1711247)
Visitor Counter : 648