रेल्वे मंत्रालय
बेकायदेशीर ई-तिकीट गैरप्रकार रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने केलेल्या उपाययोजना
Posted On:
17 MAR 2021 5:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 मार्च 2021
ई-तिकीट गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी भारतीय रेल्वेने अनेक प्रतिबंधात्मक आणि दंडात्मक उपाययोजना केल्या आहेत. आयआरसीटीसी आरक्षण संकेतस्थळ सुरक्षित राखण्यासाठी यासंदर्भात हाती घेतलेले काही महत्त्वपूर्ण उपक्रम खालील प्रमाणे आहेतः
i. तिकिटे आरक्षित करताना संक्षिप्त नावावर तिकिटे आरक्षित होणार नाहीत तसेच ज्या ठिकाणी लागू असेल तिथे प्रवाशाचे पूर्ण नाव व आडनाव तिकिटांवर छापले जाईल हे सुनिश्चित करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.
ii. आरक्षित श्रेणींतून प्रवास करत असताना प्रवाशांपैकी एकाला विहित ओळखपत्र जवळ बाळगणे अनिवार्य करण्यात आले आहे.
iii. स्क्रिप्टिंग सॉफ्टवेयर वापरण्यासह अनधिकृत तिकिटांचे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) केंद्रे, आरक्षण कार्यालये, प्लॅटफॉर्म, गाड्या यासारख्या गर्दीच्या ठिकाणी नियमित तपासणी केली जाते. सण, सुट्ट्यांच्या काळातही अशा प्रकारची तपासणी अधिक तीव्र केली जात आहे.
iv. तिकिटांचे ऑनलाईन बुकिंग करताना 35 सेकंदाच्या आत कोणतेही तिकीट आरक्षित करता येणार नाही. यूझर आयडी दररोज तपासले जातात आणि तिकिटांचे वेगवान बुकिंग सारख्या गैरप्रकारांसाठी वापरलेले आयडी रद्द केले जातात.
v. आगाऊ आरक्षण कालावधी (एआरपी) आणि तत्काळ बुकिंगच्या पहिल्या पंधरा मिनिटांत . आयआरसीटीसीच्या अधिकृत एजंटांना तिकिट आरक्षित करण्यास मनाई केली आहे.
vi. बेकायदेशीर घटकांकडून तिकीट खरेदी न करणे आणि या स्रोतांकडून तिकिट खरेदीचे दुष्परिणाम याबाबत सर्वसामान्य जनतेला सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीद्वारे आणि प्रसार माध्यमांद्वारे जागरूक केले जाते.
vii. प्रत्येक वापरकर्त्याचे आयआरसीटीसी यूजर आयडी बनवणे आणि तिकिटे आरक्षित करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
viii. नोंदणी, लॉगिन आणि बुकिंग पेजवर डायनॅमिक CAPTCHA टाकण्यात आला आहे.
ix. प्रमाणिकरण चाचणी आणि गुणवत्ता प्रमाणन (एसटीक्यूसी) द्वारे बहुस्तरीय सुरक्षा आणि नियमित ऑडिट.
x. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) पोर्टलवरून बुकिंग करताना वापरकर्त्याला एका महिन्यात 6 रेल्वे तिकिटांचे आरक्षण करण्याची मर्यादा निश्चित केली आहे. तर ज्यांनी आयआरसीटीसीच्या यूजर आयडीला संबधित आधार क्रमांकासह जोडले आहे अशा वापरकर्त्यांसाठी ही मर्यादा एका महिन्यात 12 रेल्वे तिकिटांपर्यंत वाढवली आहे.
रेल्वे, वाणिज्य व उद्योग आणि ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री, पियुष गोयल यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1705540)
Visitor Counter : 165