आदिवासी विकास मंत्रालय

आदिवासी कलाकार आणि कारागीरांसाठी संरचना विकास तसेच कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यासाठी ट्रायफेडने क्राफ्ट व्हिलेज संस्थेसोबत केला सामंजस्य करार

Posted On: 17 MAR 2021 5:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 मार्च 2021

आदिवासींचे जीवनमान आणि उपजीविकेची साधने यांच्यात सुधारणा घडवण्यासाठी तसेच आदिवासी सक्षमीकरणाच्या दृष्टीने सुरु असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून ट्रायफेड अर्थात भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास मंडळाने एकत्र येऊन सामुहिकरित्या काम करण्यासाठी विविध संस्थांशी भागीदारी करण्याचा उपक्रम अविरत सुरू ठेवला आहे. या संदर्भात, ट्रायफेडने आता हस्तकला क्षेत्रातील प्रशिक्षण आणि जाहिरातीसाठी काम करणाऱ्या क्राफ्ट व्हिलेज- बाय झेफायर या प्रसिध्द संस्थेशी सहकार्याचा हात मिळविला आहे.

ट्रायफेड आणि क्राफ्ट व्हिलेज यांच्यात काल एक सामंजस्य करार झाला. यावेळी ट्रायफेडचे कार्यकारी संचालक अनुपम त्रिवेदी आणि क्राफ्ट व्हिलेजच्या संस्थापक इति त्यागी यांनी कराराच्या कागदपत्रांचे आदानप्रदान केले. या प्रसंगी ट्रायफेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीर कृष्ण आणि दोन्ही संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आदिवासी समाजाच्या समग्र उत्कर्षासाठी दोन्ही संस्थांनी या करारान्वये खालील क्षेत्रांमध्ये एकत्र येऊन भागीदारीने काम करण्यास मान्यता दिली आहे.

  1. ट्रायफेड आणि क्राफ्ट व्हिलेज एकत्रितपणे कार्यक्षम तसेच जागतिकदृष्ट्या स्वीकारार्ह असलेल्या विविध संकल्पना विकसित करतील. त्या संकल्पनेच्या संरचना विकासाचे काम क्राफ्ट व्हिलेजच्या  परिसरात आणि या उपक्रमासाठी नाव नोंदणी केलेले  आदिवासी समूह किंवा कारागीर किंवा कलाकार गटांतर्फे देखील केले जाईल. अशा पद्धतीने विकसित केलेल्या उत्पादनांचे विपणन, ट्राईब्ज इंडियाच्या दुकानांची स्वतःची साखळी वापरून आणि ऑनलाईन मंचाद्वारे  ट्रायफेडतर्फे केले जाईल.
  2. आदिवासी कला आणि त्यांच्या हस्तकलेच्या वस्तू यांच्याबद्दल सामान्य जनतेला माहिती देऊन जाणीव जागृती करण्यासाठी या दोन्ही संस्था आदिवासी कला आणि हस्तकला यांच्याविषयीच्या कार्यशाळा आणि चर्चासत्रे आयोजित करतील.
  3. सोबतच  आदिवासी कलाकार आणि कारागीरांनी उत्तम उत्पादनांची निर्मिती करावी यासाठी या दोन्ही संस्था एकत्रितपणे आदिवासी कलाकार आणि कारागीरांकरिता प्रशिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रमांचे आयोजन करतील

या अभिनव भागीदारीतून या संस्था इतर अनेक उपक्रम राबवतील.  आदिवासी कलाकारांसाठी उत्तम आर्थिक संधी निर्माण करण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने या संस्था निवडक आंतरराष्ट्रीय लोक कला बाजारांमध्ये मदत, खेळांचे प्रदर्शन हा यापैकी एक उपक्रम आहे . तसेच आदिवासी समाजाची अधिकाधिक माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवावी या उद्देशाने या दोन्ही संस्था आदिवासी कला संस्कृती आणि पाककला यांच्यावर चित्रपट तयार करण्यासाठी एकत्र येऊन काम करण्यासाठीचे नियोजन देखील या दोन्ही संस्थांनी केले आहे. आदिवासी उत्पादनांना जागतिक पातळीवर ओळख मिळवून द्यायला मदत करणारी सर्वांसाठी अनुकूल, समाजावर आधारित अशी सर्जनशील उत्पादन यंत्रणा विकसित करणे हा या भागीदारीचा मुख्य उद्देश आहे.

ह्या भागीदारीतून अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविल्यामुळे, आदिवासी कलाकारांची कौशल्ये विकसित झाल्यामुळे त्यांच्या उपजीविकेची साधने विकसित करून उत्पन्नाचे नवे मार्ग शोधून काढल्यामुळे ते  अधिक सक्षम होतील तसेचत्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय ग्राहकांशी सुलभतेने संपर्क साधता येईल अशी अपेक्षा ट्रायफेडने व्यक्त केली आहे. या आणि अशा इतर उपक्रमांतून ट्रायफेड, देशातील आदिवासींचे जीवनमान आणि उपजीविकेच साधने यांच्यात आमुलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी सतत कार्य करीत  आहे.

 

Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1705504) Visitor Counter : 231