राष्ट्रपती कार्यालय
समाजात बदल घडवून आणण्यासाठी शिक्षण उत्प्रेरकाची भूमिका बजावत असून युवकवर्ग हा सामाजिक परिवर्तनासाठीचा अत्यंत शक्तिशाली घटक आहे : राष्ट्रपती कोविंद
भारताच्या राष्ट्रपतींच्या उपस्थितीत अन्ना विद्यापीठाचा 41 वा दीक्षांत समारंभ संपन्न
प्रविष्टि तिथि:
11 MAR 2021 3:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मार्च 2021
समाजात बदल घडवून आणण्यासाठी शिक्षण उत्प्रेरकाची भूमिका बजावत असून युवकवर्ग हा सामाजिक परिवर्तनासाठीचा अत्यंत शक्तिशाली घटक आहे असे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी म्हटले आहे. चेन्नईच्या अन्ना विद्यापीठाच्या आज झालेल्या 41 व्या दीक्षांत समारंभात ते उपस्थितांना संबोधित करत होते.
समाजाच्या सध्याच्या आणि भविष्यकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, स्थापत्य शास्त्र आणि उपयोजित विज्ञान या विषयांतील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे उत्तम शिक्षण उपलब्ध करून देणारे अन्ना विद्यापीठ जगातील काही मोठ्या तंत्रज्ञान विद्यापीठांपैकी एक आहे हे जाणून घेतल्यावर राष्ट्रपतींनी अत्यंत आनंद व्यक्त केला. हे विद्यापीठ शिक्षण क्षेत्रात परिणामकारक योगदान देत आहे, म्हणूनच क्यूएस वर्ल्ड आणि एनआयआरएफ या श्रेणीनिश्चिती संस्थांनी त्याची गणना प्रमुख विद्यापीठांमध्ये केली आहे असे त्यांनी सांगितले.
युवा विद्यार्थ्यांमध्ये योग्य शैक्षणिक दृष्टीकोन विकसित करणाऱ्या तंत्रज्ञानविषयक प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी अन्ना विद्यापीठाने अत्यंत अनुकूल वातावरण निर्माण केले आहे असे राष्ट्रपतींनी सांगितले. संस्थेने विद्यार्थ्यांमध्ये जोपासलेला वैज्ञानिक कल त्यांचे प्रकल्प आणि विविध यशस्वी कार्यांतून स्पष्टपणे दिसतो. इस्रोसोबत संयुक्तपणे काम करून उपग्रहाचे आरेखन, विकसन आणि परिचालन करणारे हे देशातील पहिले विद्यापीठ आहे हे कळल्यावर त्यांनी आनंद व्यक्त केला. ‘अनुसॅट’ हा उपग्रह हे सामान्य यश नसून जगभरातील युवा मनांना खुलेपणाने पुढे जाऊन ताऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठीची प्रेरणादेखील आहे असे ते म्हणाले.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 बद्दल बोलताना राष्ट्रपती म्हणाले की ज्ञान हा प्रत्येक व्यक्तीचे चारित्र्य ज्यावर उभे आहे असा पाया आहे. यावेळी बोलताना, समाजात बदल घडवून आणण्यासाठी शिक्षण उत्प्रेरकाची भूमिका बजावत असून युवकवर्ग सामाजिक परिवर्तनासाठीचा अत्यंत शक्तिशाली घटक आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला. शिक्षित युवकाला योग्य दिशा दाखवली तर तो समाजात क्रांतिकारी बदल घडवून आणु शकतो असे त्यांनी सांगितले. सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चे नेमके हेच उद्दिष्ट आहे. या नव्या धोरणाअंतर्गत, सध्याच्या शैक्षणिक गरजांनुसार, संशोधन, कौशल्य आणि बुद्धीमत्ता यांच्यावर आधारित आधुनिक शिक्षण पद्धती लागू करण्यात येईल. त्याच वेळी, त्यामध्ये आपला समृध्द वारसा आणि भविष्यवेधी दृष्टीकोन यांचा सुसंवादी समावेश असेल. या नव्या धोरणात आपली नैतिक मूल्ये समाविष्ट करून भारतीय संस्कृती समजून घेण्यावर मुख्य भर असेल. या नव्या धोरणाच्या अंमलबजावणीमुळे आधुनिक शिक्षण प्रक्रिया आणि शिक्षण यांचे नवे युग अवतरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यातून संशोधक आणि व्यावसायिकांची मोठी फळी तयार होईल आणि ती राष्ट्रीय आकांक्षेला खतपाणी घालत आपल्या देशाला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊन ठेवेल.
राष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1704129)
आगंतुक पटल : 340