इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते मल्टीफंक्शनल इलेक्ट्रॉनिक मटेरिअल्स प्रोसेसिंग -2021 च्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन

Posted On: 08 MAR 2021 6:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 मार्च 2021

सेंटर फॉर मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (सी-एमईटी) च्या 30 व्या स्थापना दिवसानिमित्त, केंद्रीय शिक्षण, दूरसंवाद, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते, आज मल्टीफंक्शनल इलेक्ट्रॉनिक मटेरिअल्स प्रोसेसिंग -2021 च्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन झाले.

इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि घटक हे सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा गाभा आहे. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गॅझेटची क्षमता आणि कार्यक्षमतेचा आधारस्तंभ म्हणजे त्यातील सामग्री. इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची कार्यक्षमता वापरल्या जाणार्‍या घटकांवर थेट अवलंबून असते असे धोत्रे यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या मार्गदर्शनानुसार इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे देशांतर्गत उत्पादन भरघोस वाढ नोंदवत 2014-15 मधील 1,90,000 कोटी रुपयांवरून 2019-20 मध्ये 5,33,550 कोटी रुपयांवर पोचले आहे.

सी-एमईटीच्या तांत्रिक नवोन्मेषाचे धोत्रे यांनी कौतुक केले. ते म्हणाले, मला आनंद आहे की सी-एमईटी देशाच्या सेवेसाठी इलेक्ट्रॉनिक साहित्यात अनन्य कौशल्य विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करीत आहे. मला हे देखील जाणून आनंद होत आहे की सी-एमईटी अनेक वर्षांपासून विश्वासार्ह स्त्रोत म्हणून महत्वाच्या क्षेत्रासाठी (डीआरडीओ आणि इस्रो) हफनियम आणि सिलिकॉन कार्बाईडची निर्मिती करीत आहे.

मल्टीफंक्शनल इलेक्ट्रॉनिक मटेरिअल्स प्रोसेसिंग - 2021 विषयी :

पुण्यातील सेंटर फॉर मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (सी-एमईटी), 8-10 मार्च 2021 दरम्यान भारतातील पुणे येथे मल्टीफंक्शनल इलेक्ट्रॉनिक मटेरिअल्स प्रोसेसिंग (एमईएमपी 2021) वर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करीत आहे. एमईएमपी -2021 वैज्ञानिक, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ तरूण विद्यार्थ्यांना विविध अनुप्रयोगांसाठी आणि उपकरणे बनविण्याच्या प्रक्रियेसाठी मल्टीफंक्शनल इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या क्षेत्रात कार्यरत प्रख्यात वैज्ञानिक/तंत्रज्ञांशी संवाद साधण्याची संधी देईल.

सेंटर फॉर मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी विषयी-

इलेक्ट्रॉनिक सामग्रीच्या स्थापनेत सक्षम संशोधन आणि विकासास समर्पित असलेले सेंटर फॉर मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (सी-एमईटी), हे भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत एक वैज्ञानिक संस्था म्हणून कार्यरत आहे.

 

 

 

S.Tupe/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1703284) Visitor Counter : 314