वस्त्रोद्योग मंत्रालय
खेळणी ही भारताची गुणवत्ता, वैशिष्ट्य, अभिनवता, पर्यावरण-स्नेही आणि भारतीय खेळण्यांमधील थरार प्रदर्शित करण्याचे प्रतीक बनू शकतात- केंद्रीय मंत्री पियुष गोयल
व्हर्च्युअल टॉय फेअरचा कालावधी 4 मार्च पर्यंत वाढवला
Posted On:
02 MAR 2021 9:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मार्च 2021
वाणिज्य व उद्योग, रेल्वे, ग्राहक व्यवहार आणि अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल म्हणाले की खेळणी ही भारताची गुणवत्ता, वैशिष्ट्य, अभिनवता, पर्यावरण-स्नेही आणि भारतीय खेळण्यांमधील थरार प्रदर्शित करण्याचे प्रतीक बनू शकतात. इंडिया टॉय फेअर (टीआयटीएफ) 2021 च्या समारोप समारंभात बोलताना गोयल म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळण्यांची खरी क्षमता ओळखण्यासाठी आणि भारतात खेळण्यांच्या परिसंस्थेच्या विकासासाठी आत्मनिर्भर भारतचा एक भाग म्हणून ही चळवळ सुरू केली. ते म्हणाले की, आपल्या मुलांना त्यांच्या सुरुवातीच्या काळात जडणघडणीत मदत करेल अशी क्षमता खेळणी उद्योगात असल्याचे पंतप्रधानांनी ओळखले. या आभासी समारोप समारंभात वस्त्रोद्योग सचिव आणि केंद्र तसेच राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
ते म्हणाले की इंडिया टॉय फेअर (टीआयटीएफ) 2021 ने आपले कारागीर, एमएसएमई, स्टार्टअप्स, तरुण डिझायनर्स आणि विचारवंतांसाठी संधीची एक खिडकी खुली केली आहे. मानसशास्त्राला तंत्रज्ञानाशी आणि पर्यावरण-स्नेहीला पर्यावरण-प्रणालींशी जोडणे हे यशाचे सूत्र आहे. आपल्या खेळण्यांमधून केवळ आपली समृद्ध संस्कृती आणि वारसाच दिसून येत नाही तर आपल्या मुलांची मने विकसित करण्याच्या प्रशिक्षणातील प्रचंड क्षमता आहे, असेही ते पुढे म्हणाले.
गोयल म्हणाले की आमचे ध्येय फक्त खेळण्यांमध्ये भारताला आत्मनिर्भर बनवणे एवढेच नाही तर भारतात बनलेली आणि विकसित खेळणी म्हणून जगात ब्रँड इंडिया ही ओळख निर्माण करणे हे देखील आहे.
यावेळी वस्त्रोद्योग सचिव यू.पी. सिंग यांनी जाहीर केले की लोकांच्या आग्रहास्तव व्हर्चुअल टॉय फेअरचा कालावधी आणखी दोन दिवस म्हणजेच 4 मार्च पर्यंत वाढवण्यात आला आहे. या व्हर्च्युअल टॉय फेअरनंतर देशी खेळण्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 10-12 प्रादेशिक खेळण्यांचे मेळावे प्रत्यक्ष स्वरूपात आयोजित केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
इंडिया टॉय फेअरमध्ये टॉय डिझाईन चॅलेंजचे देखील आयोजन केले होते. टॉय डिझाईन चॅलेंजमध्ये दोन श्रेणीत 225 प्रवेशिका होत्या. 1. व्यावसायिक 2. हौशी. प्रत्येक श्रेणीत प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक विजेत्यांसाठी 1 लाख रुपये . 50,000 रुपये आणि 25 हजार रुपये रोख आणि मान्यतेचे ‘प्रमाणपत्र’ अशी पारितोषिके होती. वस्त्रोद्योग सचिवांनी टॉय डिझाईन चॅलेंजच्या विजेत्यांची नावे जाहीर केली:ती पुढीलप्रमाणे आहेत -
व्यावसायिक श्रेणी
प्रथम पुरस्कारः आदित्य गुप्ता
द्वितीय पुरस्कारः गरिमा कौशिक
तिसरा पुरस्कारः आदिती गणपती
हौशी श्रेणी
प्रथम पुरस्कारः नवीन शुक्ला
द्वितीय पुरस्कार : संजना रामकृष्णन
तिसरा पुरस्कारः ईशा विजयन
इंडिया टॉय फेअर -2021 विषयी-
खेळण्यांशी संबंधित संस्थांचा सक्रिय सहभाग असलेला इंडिया टॉय फेअर 2021 हा पहिलाच आंतर-मंत्रालयीन उपक्रम आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशांतर्गत उत्पादनांना चालना देण्यासाठी भारतातील खेळणी उद्योगांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने 27 फेब्रुवारी , 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल इंडिया टॉय फेअर -2021 चे उद्घाटन करण्यात आले.
या मेळाव्यासाठी 110 पेक्षा अधिक देश आणि देशातील 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 20 लाखाहून अधिक अभ्यागतांनी नोंदणी केली. आतापर्यंत 39 लाखाहून अधिक अभ्यागतांनी भेट या मेळाव्याला भेट दिली आहे. देशभरातील 1,074 प्रदर्शकांनी या मेळाव्यात आपली उत्पादने प्रदर्शित केली. 10 ग्लोबल सीईओ / सह-संस्थापकांसह 103 वक्ते यांच्या सहभागाने 41 पॅनेल चर्चा, वेबिनार आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले.
S.Tupe/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1702065)
Visitor Counter : 180