रेल्वे मंत्रालय

राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम साध्य करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या उत्तम पद्धती आणि धोरणे एकमेकांना सांगावीत- पियुष गोयल


रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या कामकाजाचा घेतला आढावा

रेल्वेने कोविड विषयक खबरदारी आणि नियमांचे पालन करणे अनिवार्य

Posted On: 20 FEB 2021 10:15PM by PIB Mumbai

 

कोविडचे संकट असल्यामुळे हे वर्ष अपवादात्मक समजून भारतीय रेल्वेने कमी साधनात उत्तम काम करण्याचे आणि किमती कमी करण्याचे धोरण राबवावे तसेच सर्व स्तरावरील उत्पादकता वाढवण्यासाठी पुन्हा जोमाने प्रयत्न करावेत, असे मत,रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केले. आज देशातल्या सर्व रेल्वे क्षेत्रीय कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेतांना ते बोलत होते.

राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम काम करण्यासाठी, सर्व क्षेत्रातील रेल्वे अधिकाऱ्यांनी आपापल्या भागात अवलंबलेल्या उत्तम पद्धती आणि धोरणे सर्वांना सांगावीत, असे रेल्वेमंत्री यावेळी म्हणाले. यात प्रवासी सेवा, सुरक्षितता, महसूल संकलन आणि मालवाहतूक आणि व्यावसायिक विकास, गती वाढवणे, अशा सर्व उपाययोजना एकमेकांना सांगाव्यात, अशी सूचना त्यांनी केली.

ज्या उत्तम पद्धती किंवा कल्पना एका ठिकाणी यशस्वी होतात, त्या इतर ठिकाणीही अमलात आणल्या जाऊ शकतात, ज्यातून सर्वोत्तम उद्दिष्ट साध्य केले जाऊ शकते.

गाडयांसाठी लागणाऱ्या इंधन खर्चात बचत करता येईल, का याचे उपाय शोधले जावेत, असे गोयल म्हणाले.

यंदाच्या अर्थसंकल्पात भांडवली खर्चासाठी मोठी तरतूद करण्यात आली असून ही आपल्याला क्षमता विस्तार करण्याची आणि भविष्यासाठी सज्ज अशी रेल्वेव्यवस्था उभारण्याची मोठी संधी आहे, असे गोयल यावेळी म्हणाले.

रेल्वे मालवाहतुकीमुळे देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात मोठे योगदान देण्यात आले असून, ही मालवाहतूक पुढेही सुरु रहावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विविध टप्प्यात असलेले पायाभूत प्रकल्प पूर्ण होण्याकडे बारीक लक्ष दिले जावे आणि हे प्रकल्प पूर्ण करण्याच्या कालावधीचे पालन केले जावे, असेही ते म्हणाले. रेल्वेने कोविड विषयक खबरदारी आणि नियमांचे काटेकोर पालन सुरूच ठेवायला हवे, अशी सूचनाही त्यांनी केली.

यावर्षी रेल्वेसाठी अर्थसंकल्पात, विक्रमी, म्हणजेच, 1.10 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे नमूद करत, येत्या आर्थिक वर्षासाठी, 2.15  लाख कोटी रुपयांच्या भांडवली खर्चा ची तरतूद करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

***

Jaydevi PS/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1699723) Visitor Counter : 100


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi