शिक्षण मंत्रालय
विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधानानी केले संबोधित
सृजनशीलता आणि ज्ञान अमर्याद :पंतप्रधान
गुरुदेव टागोर यांना बंगालच्या अभिमानाइतकाच भारताच्या विविधतेचाही अभिमान : पंतप्रधान
आत्मनिर्भर भारत घडवण्याच्या दृष्टीकोनातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे महत्वाचे पाऊल : पंतप्रधान
Posted On:
19 FEB 2021 5:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला दूर दृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. पश्चिम बंगालचे राज्यपाल आणि विश्व भारती विद्यापीठाचे कुलपती जगदीप धनखर, केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ रमेश पोखरीयाल निशंक आणि केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री संजय धोत्रे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
वीर शिवाजी यांच्यावरच्या गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या आपल्याला स्फूर्ती देणाऱ्या काव्यपंक्ती पंतप्रधानांनी नमूद केल्या. विद्यार्थी आणि शिक्षक हे केवळ विद्यापीठाचाच भाग आहेत असे नव्हे तर एका सळसळत्या परंपरेचे वाहक आहेत यावर पंतप्रधानांनी भर दिला.गुरुदेवांनी या विद्यापीठाला विश्व भारती म्हणजे जागतिक विद्यापीठ असे नाव दिले कारण विश्व भारती विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येणारी व्यक्ती भारत आणि भारतीयत्वाच्या दृष्टीकोनातून जगाकडे पाहेल अशी त्यांची अपेक्षा होती. म्हणूनच त्यांनी विश्व भारती हे शिक्षणासाठीचे असे स्थान निर्माण केले ज्याकडे भारताचा समृध्द वारसा म्हणून पाहता येईल.भारतीय संस्कृती आत्मसात करून त्यावर संशोधन करून गोर- गरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. गुरुदेवांसाठी विश्व भारती हे विद्यापीठ म्हणजे केवळ ज्ञान देणारी संस्था नव्हती तर भारतीय संस्कृतीच्या सर्वोच्च उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता.
वेगवेगळ्या विचारधारा आणि मतभेद यांच्या कोलाहलातून आपण स्वतःचा शोध घेतला पाहिजे असे गुरुदेवांचे विचार होते. गुरुदेव टागोर यांना बंगालच्या अभिमानाइतकाच भारताच्या विविधतेचाही अभिमान होता. गुरुदेवांच्या दृष्टिकोनामुळे, शांतीनिकेतनच्या खुल्या आकाशाखाली मानवता समृध्द होत राहिली. अनुभवावर आधारित शिक्षण या पायावर उभारलेले विश्व भारती म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर असल्याचे प्रशंसोद्गार पंतप्रधानांनी काढले. सृजनशीलता आणि ज्ञान हे अमर्याद असते. हाच विचार घेऊन गुरुदेवांनी या महान विद्यापीठाची स्थापना केली.ज्ञान, विचार आणि कौशल्य ही स्थिर नव्हे तर सातत्याने बदलणारी प्रक्रिया आहे याचे स्मरण ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. ज्ञान आणि सत्ता यांच्याबरोबरच जबाबदारीही येते. ज्याप्रमाणे सत्तेत असताना संयमित आणि संवेदनशील असावे लागते त्याचप्रमाणे प्रत्येक बुद्धिवान व्यक्ती ही ज्यांना ज्ञान नाही अशांप्रती जबाबदार असते असे पंतप्रधान म्हणले.
आपले ज्ञान हे केवळ आपले ज्ञान नाही तर ते समाजाचे ज्ञान आहे,देशाचा वारसा आहे असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. तुमचे ज्ञान आणि कौशल्य हे देशासाठी अभिमानाचे ठरू शकते किंवा त्याचा दुरुपयोग केल्यास समाजाला खाईत अथवा अंधकाराकडेही नेऊ शकते. जगात दहशत आणि हिंसाचार पसरवणारे अनेक जण उच्च शिक्षित आणि उच्च कौशल्य प्राप्त आहेत असे त्यांनी सांगितले. तर एकीकडे असे अनेक लोक आहेत जे कोविड महामारीसारख्या काळात, आपला जीव धोक्यात घालून रुग्णालयात,प्रयोगशाळेत ठाण मांडून लोकांचे प्राण वाचवत आहेत. ही विचारधारा नव्हे तर मानसिकता आहे मग ती सकारात्मक असो किंवा नकारात्मक. दोन्हींसाठी वाव आहे आणि दोन्हींसाठी मार्गही खुले आहेत. विद्यार्थ्यांनी निर्णय घ्यायचा आहे की त्यांना समस्येचा भाग बनायचे आहे की त्यावरच्या उपायाचा भाग ठरायचे आहे. त्यांनी राष्ट्र सर्वप्रथम ठेवले तर त्यांचा प्रत्येक निर्णय हा काही उपायांच्या दिशेने वळेल. निर्णय घ्यायला घाबरू नका असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.जोपर्यंत देशातल्या युवकांना नवोन्मेशाची आस आहे, जोखीम पत्करत पुढे जाण्याची ओढ आहे तोपर्यंत देशाच्या भविष्याची चिंता करण्याचे कारण नाही. देशासाठी युवकांच्या या प्रयत्नात सरकार त्यांच्या समवेत असल्याचे आश्वासन त्यांनी युवकांना दिले.
पारंपरिक भारतीय शिक्षण पद्धतीच्या ऐतिहासिक सामर्थ्याचे स्मरण करत गांधीवादी श्री धर्मपाल यांच्या ‘ द ब्युटीफुल ट्री – इंडेजीनस इंडियन एज्युकेशन इन एटीन सेंच्युरी या पुस्तकाचा संदर्भही दिला. प्रत्येक गावात एकापेक्षा जास्त गुरुकुल होती आणि स्थानिक मंदिरांशी ती संलग्न होती, साक्षरतेचा दरही अतिशय उच्च असल्याचा अंदाज 1820 च्या एका सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. ब्रिटीश विद्वानांनीही हे स्विकृत केले होते. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी विश्व भारती मध्ये अशी पद्धती विकसित केली जी भारतीय शिक्षण आधुनिक करण्याचे आणि भारतीय शिक्षण गुलामगिरीच्या तावडीतून सोडवण्याचे माध्यम होते.
त्याचप्रमाणे नव्या शैक्षणिक धोरणातही जुने निर्बंध मोडून विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता जाणण्याची मुभा देण्यात आली आहे. माध्यम आणि विषयांची निवड यामध्ये यात लवचिकता प्रदान करण्यात आली आहे. उद्योज्यकता आणि स्वयं रोजगार, संशोधन आणि नवोन्मेश यांना हे धोरण प्रोत्साहन देते. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
केंद्र सरकारने विद्वत जनांना लाखो जर्नल पर्यंत पोहोचण्याची मोफत संधी दिली आहे. राष्ट्रीय संशोधन फौंडेशन मार्फत संशोधनासाठी 5 वर्षात 50 हजार कोटी रुपये यंदाच्या अर्थ संकल्पात प्रस्तावित करण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली. जेंडर इन्क्ल्युजन फंड अर्थात लिंगभाव समावेशकता निधी साठी या शैक्षणिक धोरणात तरतूद करण्यात आली असून यामुळे मुलीना नवा आत्मविश्वास लाभणार आहे. शाळा अर्ध्यावर सोडण्याच्या मुलींच्या प्रमाणाचा बारकाईने अभ्यास करून प्रवेश आणि निर्गमन पर्यायासाठी व्यवस्था करण्यात आली.
एक भारत- श्रेष्ठ भारत संकल्पनेसाठी बंगाल हे प्रेरणा ठरल्याचे सांगून 21 व्या शतकाच्या ज्ञान अर्थव्यवस्थेत,जगाच्या कानाकोपऱ्यात भारतीय ज्ञानाचा प्रसार करून विश्व भारती महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. येत्या 25 वर्षासाठी 25 मोठी उद्दिष्टे नमूद करणारा आराखडा या प्रतिष्ठित संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार करावा असे आवाहन त्यांनी केले. भारताप्रती जाणीव आणि जागृती निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. भारताचा संदेश जगापर्यंत पोचवण्यासाठी आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी विश्व भारतीने सर्व शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधित्व करावे. आपल्या जवळची गावे आत्मनिर्भर करून तिथली स्थानिक उत्पादने जागतिक पातळीवर नेण्यासाठी मार्ग शोधण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
* * *
Jaydevi PS/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1699426)
Visitor Counter : 149