संरक्षण मंत्रालय

सीमा रस्ते संघटनेच्या महासंचालकांनी जोशीमठ येथे भेट देऊन हिमकडा तुटून झालेल्या जलप्रलयानंतरच्या नुकसानाचा आढावा घेतला

Posted On: 13 FEB 2021 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2021

 

सीमा रस्ते संघटनेचे महासंचालक, लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी यांनी आज जोशीमठ येथे जाऊन दुर्घटनाग्रस्त भागातील बीआरओच्या  बचाव, मदत आणि पुनर्वसन कार्याचा आढावा घेतला. उत्तराखंड मधील चमोली जिल्ह्यात सात फेब्रुवारीला हिमकडा तुटल्यामुळे झालेल्या जलप्रलयामुळे या भागातील जलविद्युत प्रकल्प वाहून गेले आणि काही कर्मचारी अडकून पडले होते. ऋषीगंगा नदीत झालेल्या जलप्रलयात, बीआरओ ने रायनी गावादरम्यान जोशीमठ-मलारी दरम्यान बांधलेला 90 मीटर लांबीचा आरसीसी पूलही वाहून गेला. नीती सीमेवर जाण्यासाठी या पुलाचा एकमेव पर्याय होता.

‘श्रेयमेना सर्वम साध्यं’ या घोषवाक्यानुसार बीआरओने ताबडतोब मदत आणि बचाव कार्याला सुरुवात केली, असे बीआरओच्या महासंचालकांनी सांगितले. 100 वाहने/उपकरणे, यात जमीन खोदकाम करणारी आणि ढिगारे उपसणारी एक्सकॅव्हेटर्स, बुलडोझर, जेसीबीसारखी अतिशय अवजड 15 उपकरणे घेऊन बीआरओची टीम अविरत काम करते आहे.

बीआरओ ने भारतीय हवाई दलाच्या मदतीने काही महत्वाची उपकरणे हवाई मार्गानेही घटनास्थळी उतरवली आहेत. शिवालिक प्रकल्पाअंतर्गत सीमा रस्ते कृती दलाच्या (BRTF) 20 चमू बचाव आणि पुनर्वसन कार्यात गुंतलेल्या आहेत. सुरुवातीला परिस्थितीचा आढावा घेतल्या नंतर बीआरओने सर्व ठिकाणची संपर्कव्यवस्था पुनर्प्रस्थापित करण्याचे काम सुरु केले आहे.

शिवालिकच्या चमूचे कठोर परिश्रम आणि प्रामाणिक प्रयत्नांचे कौतुक करतांनाच बीआरओच्या महासंचालकांनी सांगितले की अतिशय खराब हवामानामध्ये  बीआरओ चे जवान अखंड काम करत असून, 200 फुटांचा बेली ब्रिज बांधून विस्कळीत झालेला संपर्क पुन्हा जोडण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

बीआरओच्या चमूला साथ दिल्याबद्दल त्यांनी राज्य सरकारचेही आभार मानले.


* * *

S.Patil/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1697820) Visitor Counter : 185


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil