उपराष्ट्रपती कार्यालय

सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांमध्ये उच्च गुणवत्ता आणि माफक किंमत या दोन्ही बाबींकडे लक्ष द्यायला हवे - उपराष्ट्रपती


इमारतीचा आराखडा मंजूर करतांना पुरेशी खेळती हवा आणि प्रकाश हे दोन घटक अनिवार्य केले जावेत - उपराष्ट्रपती

ग्रामीण भागातून शहरांकडे होणारे स्थलांतरण रोखण्यासाठी ग्रामीण भागातील घरांची कमतरता आणि सुविधांकडे लक्ष द्यावे - उपराष्ट्रपती

Posted On: 10 FEB 2021 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 फेब्रुवारी 2021

 

देशातील वाढत्या मध्यमवर्गासाठी परवडणारी, सुरक्षित आणि टिकावू घरे उपलब्ध करून देण्याची गरज आहे असे सांगत, ही घरे बांधतांना गुणवत्तेशी कुठलीही तडजोड केली जाऊ नये, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केले.

त्याचवेळी, या घरांचे स्थापत्यही चांगले असले पाहिजे, असेही ते म्हणाले. केंद्रीय इमारत संशोधन संस्था (CSIR-CBRI) च्या अमृतमहोत्सवी व स्थापना वर्षानिमित्त आयोजित समारंभाचे आभासी स्वरुपात उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि वाढते शहरीकरण यामुळे घरांची मागणी प्रचंड वाढली असून त्यांचे नियोजन करणे आव्हानात्मक बनले आहे, असे नायडू पुढे म्हणाले.

कोविडमुळे आपल्याला घरात खेळती हवा आणि सूर्यप्रकाशाचे महत्व समजले आहे. त्यामुळे वास्तूविशारद, नियोजनकर्ते आणि CBRI सारख्या सरकारी संस्थांनी इमारतीचा आराखडा तयार करतांना हे घटक असतील याकडे आवर्जून लक्ष द्यावे असे उपराष्ट्रपती म्हणाले. 

‘सर्वांसाठी घरे’ ही जबाबदारी, खऱ्या अर्थाने पूर्ण करतांना, अद्ययावत, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असा सल्ला त्यांनी दिला. यात प्री-फॅब्रीकेटेड इमारती, कारखान्यात तयार झालेले साहित्य आणि स्टोन ब्लॉक्स अशा साधनांचा वापर केला जावा, असे नायडू म्हणाले. सध्याच्या पद्धती कामगार आणि बांधकाम साहित्य प्रवण असून, त्यात वेळ आणि खर्च अधिक होतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

ग्रामीण भागात घरांची असलेली कमतरता भरून काढण्याकडे लक्ष दिले जावे, अशी सूचनाही त्यांनी केली. केंद्र सरकारने, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) सुरु केली असून, या अंतर्गत 2022 पर्यंत ग्रामीण भागात सर्वांसाठी पक्की घरे बांधून दिली जाणार आहेत, असे उपराष्ट्रपती म्हणाले. माजी राष्ट्रपती एपी जे अब्दुल कलाम आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांना उजाळा देत, ग्रामीण भागात नागरी सोयीसुविधा देण्याचे त्यांचे विचार प्रत्यक्षात आणले जावेत, असे त्यांनी सांगितले. जर आपण गावातच सर्व सुविधा आणि घरे उपलब्ध केलीत, रोजगाराच्या संधी निर्माण केल्या तर, गावातून शहरांकडे होणारे स्थलांतरण थांबू शकेल, असे उपराष्ट्रपती म्हणाले.

 

* * *

S.Tupe/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1696922) Visitor Counter : 129