माहिती आणि प्रसारण मंत्रालय

दिग्दर्शकाचे 90 टक्के काम व्यवस्थापनाचे असते: इफ्फी-51 मधील ‘इन कन्व्हरसेशन’ सत्रात चैतन्य ताम्हाणे यांनी व्यक्त केले मत


“सिनेनिर्मितीत सर्वोच्च ठिकाणी असलेला दिग्दर्शक अनेकदा एकटा असतो”

“सिनेमासाठी कलाकारांची योग्य निवड 70 टक्के यश मिळवून देते”

पणजी, 23 जानेवारी 2021

 

स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांना आपल्या कामाची सुरुवात शून्यातून करावी लागते, असे मत दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांनी व्यक्त केले. 51 व्या इफ्फीमध्ये आज झालेल्या ‘इन-कन्व्हरसेशन’सत्रात आज  ताम्हाणे यांच्याशी  ‘बॉलीवूड हंगामा’ या लोकप्रिय वेबसाईटचे फरीदून शहरायार यांनी संवाद साधला, त्यावेळी ‘स्वतंत्र चित्रपट निर्मिती’ या विषयावर ताम्हाणे यांनी आपली  मते मांडली.

एखाद्या स्वतंत्र चित्रपट निर्मात्याचे सिनेमाचे बजेट कसे ठरवत असतो?

तुम्ही  केव्हा चित्रपटाचे चित्रीकरण कराल, याचा काहीही फॉर्म्युला नसतो, असे ताम्हाणे यांनी सांगितले, त्याला शून्यातून काम करायला आवडते, असे सांगत- ‘पैसा हा अनेक स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांसाठी महत्वाचा प्रश्न असतो. अनेक स्त्रोतांकडून पैसा उभारला जात असतो. चित्रीकरण कुठे करायचे यावरही खर्च अवलंबून असतो. जसे की, मुंबईत शूटिंग करायचे असेल तर ते खर्चिक असते. शिवाय, दिग्दर्शकाच्या कार्यशैलीवर देखील हे अवलंबून असते. स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांनी काळजीपूर्वक खर्च करायला हवा.

विषयाची निवड :

“मला  एखाद्या विषयात रुची वाटली, तरच मी त्यावर काम करू शकतो. कोणत्याही सिनेमामध्ये आशा आणि सकारात्मकता असणे गरजेचे असते. विविध संस्कृतींचा अभ्यास  करण्यासाठी,  त्यांचा वेध घेण्यासाठी,  चित्रपट निर्मात्याकडे कुतूहल आणि त्याविषयीची ओढ असणे अत्यंत आवश्यक आहे.” असे ताम्हाणे यांनी सांगितले.  

ओटीटी विरुध्द मोठा पडदा

ओटीटी प्लॅटफॉर्म हे स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांसाठी नवे आयुष्य देणारे वरदान ठरले आहे, असे ताम्हाणे म्हणाले. “भारतात, माझ्यासारख्या लोकांच्या चित्रपटासाठी काहीही बजेट नसते. त्याहीपलीकडे, चित्रपटांचे मार्केटिंग आणि  जाहिरात यावर नीट काम करावे लागते, तरच प्रेक्षक आपले चित्रपट बघायला येतात. आधी वितरण क्षेत्रात प्रस्थापित लोकांची एकाधिकारशाही असल्याने मार्केटमध्ये आपला चित्रपट लढण्याची लढाई जिंकणे जवळपास अशक्य होते, मात्र, अशा सर्वांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म ने नव्या संधीचे दर उघडले आहे. मात्र, असे असले तरीही थियेटर्स अर्थात सिनेमागृहांची ची जागा कोणीही घेऊ शकत नाही,” असे ताम्हाणे म्हणाले.

अल्फान्सो कुरियॉन सारख्या दिग्गज दिग्दर्शकाकडून मिळालेल्या मार्गदर्शनाचा अनुभव

‘रोमा’ या ऑस्कर विजेत्या चित्रपटाच्या निर्मितीवेळी, सुप्रसिद्ध  मेक्सिकन दिग्दर्शक अल्फान्सो कुरियॉन यांच्यासोबत एक वर्ष घालवण्याची संधी आपल्याला मिळाली असे चैतन्य ताम्हाणे यांनी सांगितले. या अनुभवाविषयी बोलतांना ते म्हणाले, “हा अनुभव विलक्षण होता, रोमाच्या सेट वर त्यांना काम करतांना बघणे माझ्यासाठी आनंददायी, अविस्मरणीय अनुभव होता. त्यांनी मला  दिग्दर्शनाची कला शिकवली. या अनुभवाचा लाभ मला माझ्या चित्रपटनिर्मितीत निश्चितच झाला.”

‘द डीसायपल’

‘द डीसायपल’ हा चैतन्य ताम्हाणे यांनी लिहिलेला, दिग्दर्शित आणि संपादित केलेला चित्रपट लवकरच जगभर प्रदर्शित होईल, असे त्यांनी सांगितले.

हा मराठी चित्रपट म्हणजे, एका शिष्याचा बालपणातून किशोरवयात येतांनाचा प्रवास आणि भारतीय शास्त्रीय संगीतातील गुरु-शिष्य परंपरा यावर आधारलेले कथानक आहे. हा ताम्हाणे यांचा दुसरा चित्रपट आहे. अल्फान्सो कुरियॉनसारख्या दिग्दर्शकाचे मार्गदर्शन तर यासाठी लाभलेच, शिवाय, इतर अनेक जागतिक चित्रपट कलाकारांचे  एकत्रीकरण यात बघायला मिळणार आहे.

दिग्दर्शक म्हणून...

“एक उत्तम दिग्दर्शक एक उत्तम व्यवस्थापक असावा लागतो. त्याचे 90 टक्के काम तेच असते. चित्रपट निर्माता एखाद्या वाद्यवृंदाच्या संचालकासारखा काम करत असतो.”

दिग्दर्शकाची जबाबदारी काय? तर आपल्या चमूला सतत प्रोत्साहन देत राहणे, एवढीच! असे ताम्हाणे म्हणाले.

पटकथा लिहिण्याचे महत्त्व :

पटकथा म्हणजे दिग्दर्शकाच्या उद्देशाचे ब्लूप्रिंट असते. मी ज्या पद्धतीने काम करतो, त्यात माझा सर्वाधिक भर पटकथेवर असतो.

आणि लेखन हे एकट्याने करण्याचे करण्याचे काम आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

संवेदनशील विषयांवरील चित्रपटनिर्मिती

असे अनेक चित्रपट निर्माते आहेत, जे अत्यंत हुशारीने, संवेदनशील मुद्यांवरची कथा चित्रपटातून मांडत असतात. अनेकदा या मर्यादांमधूनही आपण अधिक सृजनशील होऊ शकतो.

चित्रपटाची भाषा

भाषेची निवड ही सिनेमाचा पोत कसा आहे, यावर अवलंबून असते. “माझी कथा ज्या भाषेत अधिक प्रवाही होईल, असे मला वाटते त्या भाषेत मी चित्रपट बनवेन,” असे त्यांनी सांगितले. त्यापुढे, ते म्हणाले की ‘चित्रपटाची स्वतःची अशी एक सार्वत्रिक भाषा असते ''

भूमिकांसाठी कलाकारांची निवड किती महत्वाची ?

“पटकथेनंतर, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कलाकारांची निवड. योग्य कलाकार निवडलेत तर तुमचे 70 टक्के काम झाले असे समजा. आपण चित्रपट बघायला जातो त्याचे कारण त्यात काम करणारी माणसे हेच असते.”

दिग्दर्शकासाठी शिकण्याची प्रक्रिया

“मला वाटते, काम करत राहणे महत्वाचे असते,  खरे शिक्षण आपले अनुभवच देत असतात.”

मौनाचे/शांततेचे  महत्व

मौनाचे/शांततेचे चित्रपटात अत्यंत महत्व असते. जर सिनेमात नुसताच गोंधळ असेल, तर मला वैयक्तिकरित्या तो चित्रपट आकर्षित करत नाही, चित्रपटात विरोधाभास, ताल आणि पोत महत्वाचा असतो.

चित्रपटाची लांबी किती असावी?

“हे आधीपासून ठरवता येणार नाही. ते प्रेक्षकांच्या प्रतिसादावर अवलंबून आहे.”

मात्र, मनोरंजन विश्वातील बदलत्या परिस्थितीनुसार त्यात बदल करत राहणे नवोदित दिग्दर्शकांसाठी अत्यंत महत्वाचे आहे, असे ताम्हाणे यांनी सांगितले.

 

* * *

Jaydevi PS/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1691675) Visitor Counter : 712


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi