माहिती आणि प्रसारण मंत्रालय
ज्याला ‘स्व’चा उद्देश कळला आहे आणि आयुष्याची वेळ मर्यादित असल्याचीही जाणीव झाली आहे, अशा व्यक्तीची कथा म्हणजे –‘प्रवास’: दिग्दर्शक शशांक उदापूरकर
“रॅट रेस मधून बाहेर पडा, अल्पसंतुष्ट व्हायला शिका”
पणजी, 23 जानेवारी 2021
“आधी आपण संपूर्ण जगाला आपले एक कुटुंब समजणारे तत्वज्ञान- वसुधैव कुटुंबकम मानत असू, मात्र आता तर खरोखरचे कुटुंब देखील कुटुंब समजले जात नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हे चित्र बदलण्यासाठी आपल्याला रॅट रेस मधून, जीवघेण्या स्पर्धेतून बाहेर पडावे लागेल, आनंदी राहावे लागेल आणि आपण एकमेकांना मदत केली तरच आपणही सुखी होऊ शकतो, हे सत्य समजून घ्यावे लागेल.”, असा भावनिक संदेश, मराठी चित्रपट ‘प्रवास’चे दिग्दर्शक शशांक उदापूरकर यांनी दिला आहे. 51व्या इफ्फीमध्ये इंडियन पॅनोरमाच्या फिचर फिल्म विभागात हा चित्रपट दाखवला गेला. हा चित्रपट आयुष्याचा प्रवास सांगणारा आहे, त्याचवेळी तो मानवी भावविश्वातल्या महत्वाच्या गोष्टींवरही भाष्य करतो. प्रतिष्ठीत ICFT युनेस्को गांधी पदकासाठी देखील हा चित्रपट स्पर्धेत आहे. महात्मा गांधी यांची शांती, सहिष्णूता आणि अहिंसेची शिकवण प्रभावीपणे मांडणाऱ्या चित्रपटाला इफ्फीमध्ये हा विशेष पुरस्कार दिला जातो. आज इफ्फीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिग्दर्शक उदापूरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
‘प्रवास’ चित्रपटात अभिजात ईनामदार आणि त्यांची सहधर्मचारिणी लता या ज्येष्ठ जोडप्याची कथा सांगण्यात आली आहे. अभिजात आता साठीत असून त्यांची प्रकृतीही चांगली नाही. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असून जगण्यासाठी त्यांना डायलेसीसचाच आधार आहे. त्यांना आयुष्यातल्या अनेक गोष्टींबद्दल खंत वाटते आणि आयुष्य जवळपास संपलेलेच आहे अशी त्यांची भावना झाली आहे. लतानेही परिस्थितीपुढे हार मानली आहे. मात्र, एक दिवस त्याला अंतःप्रेरणेतून काहीतरी जाणीव होते आणि तिथेच त्याच्या आयुष्याच्या एका नव्या टप्प्याची सुरुवात होते.
अभिजातला लक्षात येते की आपल्या आसपास असे अनेक लोक आहेत, ज्यांना मदतीची गरज आहे, आणि तो त्यांना मदत करायला सुरुवात करतो. त्यातून त्याला एक विलक्षण समाधान जाणवते आणि स्वतःचीच नव्याने ओळख होते.
या चित्रपटामुळे आपल्या सर्वांनाच जाणीव होते की आपल्याला या पृथ्वीवर जगण्यासाठी मर्यादित वेळ मिळाला आहे आणि म्हणूनच आपण आपले आयुष्य कसे जगतो, हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. “आजच्या भौतिक जगात, आपण फक्त एका जीवघेण्या स्पर्धेत धावतो आहोत. असे म्हटले जाते की आयुष्यात दोन दिवस अत्यंत महत्वाचे असतात, जेव्हा तुम्ही जन्म घेता तो दिवस आणि दुसरा म्हणजे तुमच्या जन्माचा उद्देश काय? याची जाणीव ज्या दिवशी तुम्हाला लख्खपणे होते, तो दिवस. ‘प्रवास’ ही कथा अशा व्यक्तीची आहे, ज्याला हे कळले आहे की त्याच्याकडे अत्यंत मर्यादित वेळ आहे. कथानायक अभिजातची कथा, तुम्हा-आम्हा सर्वांची कथा आहे. जेव्हा आपण इतरांना मदत कारतो आणि आपले आयुष्य अर्थपूर्ण रीतीने जगतो, तेव्हा, आपण पृथ्वीवरचे सर्वात आनंदी व्यक्ती असतो.
“आपण केवळ आपल्या हृदयाचे ठोके ऐकले पाहिजेत, हेच ‘प्रवास’आपल्याला सांगतो.”
आपण या रॅट रेस मधून बाहेर कसे पडू शकतो, या प्रश्नाला उत्तर देतांन शशांक यांनी सांगितले की छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानायला, अल्पसंतुष्ट व्हायला शिकलो, तर सुखी होऊ शकू. कमीतकमी गरजा असणे ही आज काळाची गरज आहे. आजच्या आधुनिक युगात अनेक आवडीनिवडी आपल्यावर लादल्या जातात. उदाहरण द्यायचे झाल्यास, आपला मोबाईल सारखा बदलण्याविषयी आपल्याला सांगितले जाते. अशा संस्कृतीतूनच आपल्याकडे पैशांची अधिकाधिक गरज भासत राहते आणि पैशांचे एक दुष्टचक्र सुरु होते.
मग अधिकाधिक लोक या मार्गाचा अवलंब का करत नाहीत? या प्रश्नाला उत्तर देताना उदापूरकर यांनी सांगितले की –“गांधीजी केवळ एकच होते. त्याच प्रमाणे कमीत कमी गरजांमध्ये संतुष्ट व्हायला, समाधानी असायला शिका. हे साधे तत्वज्ञान असले तरी कठीण आहे, असे, उदापूरकर यांनी सांगितले.
उदापूरकर यांनी धावाधाव, कार्यतत्व अशा सिनेमांमध्ये नायकाची भूमिका केली आहे. अण्णा हा त्यांचा पहिला चित्रपट असून दुसरा चित्रपट ‘प्रवास’ हा आहे.
आंतरराष्ट्रीय चित्रपट, दूरचित्रवाणी आणि दृक्श्राव्य चित्रपट परिषद भारतातील इफ्फिसह युनेस्कोच्या गांधी शांतता पुरस्काराने, गांधीवादी विचारांवरच्या चित्रपटाला UNESCO गांधी पुरस्काराने सन्मानित केले जाते. या विभागात, ‘प्रवास’सह दहा चित्रपट स्पर्धेत आहेत.
* * *
S.Tupe/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1691585)
Visitor Counter : 350