माहिती आणि प्रसारण मंत्रालय
कलिरा अतिता : कालच्या भूतकाळात राहणाऱ्या एका माणसावर झालेल्या हवामान बदलाचा भावनिक प्रभाव दाखवतो गावे नष्ट होताना पाहिली आहेत, वास्तवाच्या संतुलनावर विश्वास नाही- दिग्दर्शक नीला माधब पांडा
पणजी, 20 जानेवारी 2021
“मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने गेल्या काही वर्षात ओदिशाच्या किनारपट्टीवरील तीन गावे समुद्राने गिळंकृत करताना पाहिली आहेत. माझ्या चित्रपटात, मी वास्तवाचे आणि जे मी पाहिले आहे त्याचे प्रतिबिंब मांडत असतो, लोकांना काय पाहायला आवडेल ते नाही. जेव्हा माझ्या समोर वास्तव असते तेव्हा त्याऐवजी गोष्टी संतुलित स्वरुपात दाखवण्यावर माझा विश्वास नाही. ''कलिरा अतिता ''मध्ये मी एका माणसावर हवामान बदलाचा झालेला भावनिक परिणाम दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ज्याला या हवामान बदलाचा तडाखा बसला आहे.” या भावना आहेत पद्मश्री पुरस्कार विजेते आणि चित्रपट दिग्दर्शक नीला माधब पंडा यांच्या, ज्यांचा कलिरा अतिता हा हवामान बदलाच्या परिणांमावर आधारित चित्रपट 51व्या इफ्फीमध्ये इंडियन पॅनोरमामध्ये नॉन फीचर फिल्म म्हणून समाविष्ट करण्यात आला. गोव्यामध्ये पणजी येथे आयोजित करण्यात आलेल्या 51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीमध्ये आज झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते.
नीला माधब पांडा हे प्रख्यात दिग्दर्शक असून सामाजिक विषयांवर आधारित चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 83 मिनिटांच्या या चित्रपटात एका घटनेने हादरून गेलेल्या माणसाच्या भावनांचे चित्रिकरण आहे ,ज्याचे गाव समुद्राने गिळंकृत केल्यावर तो भूतकाळातच राहात असतो, अशी माहिती पंडा यांनी या चित्रपटाविषयी बोलताना दिली. साधारणपणे लोक हवामान बदलाच्या आर्थिक आणि भौतिक परिणामांबाबतच बोलत असतात. पण माझ्या चित्रपटातील नायक हा हवामान बदलाचा आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या भावनिक परिणामांचा बळी आहे, असे त्यांनी सांगितले. “कलिरा अतिता म्हणजे कालचा भूतकाळ, माझा नायक खरोखरच कालच्या भूतकाळात राहात आहे.”
या चित्रपटाची संकल्पना कशी निर्माण झाली? याविषयी बोलताना पंडा म्हणाले ,समुद्राच्या पाण्यात सापडलेल्या एका हातपंपाची अतिशय धक्कादायक आणि भीतीदायक बातमी यासाठी कारणीभूत आहे. 2006 मध्ये एकदा माझ्या वाचनात एक बातमी आली त्यामध्ये समुद्राच्या पाण्यात दहा फूट लांबीचा एक हातपंप मी पाहिला. त्याबाबत मी आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हे सर्व समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचे परिणाम होते हे मानायला कोणीच तयार नव्हते.
सुदैवाची बाब म्हणजे 2006 मध्ये पंडा यांना एका पर्यावरणविषयक चित्रपटासाठी युनायटेड किंग्डमच्या उच्चायुक्त कार्यालयाची आणि डिस्कव्हरी वाहिनीची फेलोशिप मिळाली होती. या संधीचा त्यांनी फायदा घेतला आणि या फेलोशिपसाठी या विषयावर चित्रपट घेण्याचा निर्णय घेतला.
जागतिक महामारीच्या काळातही हा महोत्सव आयोजित केल्याबद्दल त्यांनी इफ्फीच्या आयोजकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. हे स्थळ पाहिल्यावर मला आता जाणीव होत आहे की हळूहळू सर्व काही पूर्वपदावर येत आहे, असे पंडा म्हणाले.
कलिरा अतिता विषयी
चक्रीवादळ येण्याचा पाच दिवस आधी सातावया या गावातील गुणू हा तरुण आपल्या उद्ध्वस्त झालेल्या गावाकडे परततो त्यावेळी त्याला आपल्या इतिहासातील त्या क्षणांची आठवण होते ज्यावेळी एक धर्मगुरु त्याला सारखे भेटत राहातात. निर्मनुष्य झालेल्या किनाऱ्यावर आश्चर्यकारकरित्या बचावलेला गुणू, त्याचे अस्तित्व आणि निसर्गाच्या तांडवासमोर त्याने जगण्यासाठी केलेला संघर्ष या सर्वांमुळे त्याच्यावर झालेल्या मानसिक आघाताचे आणि मानवी विजयाचे हे चित्रिकरण आहे. या तडाख्यातून गुणू सावरू शकेल का आणि पुन्हा आपल्या कुटुंबाशी त्याची भेट होईल का?
नीला माधब पंडा यांच्या आय ऍम कलाम या पहिल्या फिचर फिल्मने एका राष्ट्रीय पुरस्कारासह 34 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले होते. जलपरी, बबलू हॅपी है, कौन कितने पानी मे आणि कडवी हवा आणि हलका हे त्यांचे आणखी काही गाजलेले चित्रपट आहेत.
* * *
Jaydevi PS/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1690621)
Visitor Counter : 291