माहिती आणि प्रसारण मंत्रालय

शिक्षणासाठी सहा तासांचा प्रवास, मात्र तो उपयुक्त असल्याचा त्यांना विश्वास होता : ग्रीन ब्लॅकबेरीचे संचालक पृथ्वीराज दास गुप्ता

Posted On: 20 JAN 2021 8:40PM by PIB Mumbai

पणजी, 20 जानेवारी 2021
 

“शाळेत जाण्यासाठी त्यांना आधी चालत जावे लागत होते, नंतर बोट वल्हवून पुढे आणखी काही वाहने घ्यावी लागत होती. म्हणजे शिक्षणासाठी त्यांना 6 तासांचा प्रवास करावा लागत होता. शाळांमध्ये आम्हाला आढळले की फक्त एकच खोली होती आणि प्रत्येक बाक हा एक वर्ग होता. तरीही, जे काही ज्ञान आहे आणि ज्यांना शिक्षणाचे महत्त्व माहित आहे अशा मुलांना व प्रौढांना भेटणे हे प्रेरणादायी होते. तिथे आम्हाला जाणवले की हे पुढे न्यायला हवे . त्याच आशा आणि उत्कटतेने ही कथा समोर आली. ” अशा शब्दात 51 व्या इफ्फीतील ग्रीन ब्लॅकबेरी या इंडियन पॅनोरमा नॉन फीचर फिल्मचा प्रवास दिग्दर्शक पृथ्वीराज दास गुप्ता यांनी उलगडून दाखवला. ते आज 20 जानेवारी 2021 रोजी गोव्यातील पणजी येथील महोत्सवाच्या ठिकाणी पत्रकार परिषदेत बोलत होते. लेखक आणि दिग्दर्शक म्हणून ग्रीन ब्लॅकबेरी हा त्यांचा दुसरा चित्रपट आहे.

ते ईशान्य भारतातील दुर्गम खेड्यातील मुलांविषयी बोलत होते, ज्यांची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. "ईशान्य भारतातील दुर्गम खेड्यांमध्ये मुलांना शिक्षण घेण्यासाठी करावा लागलेला संघर्ष आणि अडथळे आणि त्यावर त्यांनी केलेली मात या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ." असे ते म्हणाले.

पृथ्वीराज यांच्या म्हणण्यानुसार, निशु आणि निमा ही चित्रपटातील मुख्य पात्र वास्तविक जीवनातील व्यक्तिरेखेतून प्रेरणा घेऊन साकारण्यात आली आहेत. “ईशान्येकडील नयनरम्य खेड्यांच्या पार्श्वभूमीवर चित्रित हा चित्रपट उच्च शिक्षणाची आवड असूनही निसर्ग या मुलांसाठी कसा खलनायक बनला हे दर्शविण्याचा प्रयत्न आहे. इतर अनेक सत्य घटनांमधून प्रेरणा मिळालेली ही खरी गोष्ट आहे.”

मुलांचा संघर्ष आणि शाळांमध्ये शिक्षकांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता, पृथ्वीराज म्हणाले की या भागांमधील शाळा बर्‍याचदा अशा ठिकाणी स्थापन केल्या जातात जिथे पोहचणे लोकांना अवघड आहे. “ पाया आधीच रचण्यात आला आहे. तेथील लोकांना शिक्षणाचे महत्त्व माहित आहे आणि बदल हळूहळू घडून येतील. ” अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

हा चित्रपट बहुभाषिक आहे कारण नेपाळी, बंगाली आणि रिआंग या ईशान्य प्रदेशातील काही आदिवासींची भाषा यात वापरली आहे.

 

 

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1690575) Visitor Counter : 103


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi