माहिती आणि प्रसारण मंत्रालय
डिजिटल स्थानांतरणामुळे चित्रपट निर्मात्यांच्या मानसिकतेत बदलः 51व्या इफ्फी चर्चासत्रात आदित्य विक्रम सेनगुप्ताचे यांचे मत
“ चित्रपट निर्मिती म्हणजे जवळजवळ डायरी लेखन”
“ ओटीटीमुळे बरीच सामग्री निर्माण होत आहे, पण परिपक्वतेसाठी वेळ दिला जात नाही”
पणजी, 19 जानेवारी 2021
ऍनालॉगकडून डिजिटल स्वरुपाकडे स्थानांतरित झाल्यामुळे चित्रपट निर्मितीच्या कलेत बदल झाला आहे आणि त्याचवेळी चित्रपट निर्मितीसाठीच्या मानसिकतेमध्येही बदल झाला आहे. “ डिजिटलायजेशन एक परिवर्तनकारक प्रक्रिया ठरली आहे. डिजिटल युगाच्या आगमनामुळे चित्रिकरणाच्या वेळी रिटेक्स करणे सोपे झाले आहे आणि व्हिजुअलायजेशन मागे पडले आहे. आता एखादे दृश्य चित्रित करताना नंतर ते कसे दिसेल हि अनिश्चितता आणि हुरहूर न राहिल्याने त्यात पूर्वीची मजा/ आनंद नाही, असे मत पुरस्कार विजेते दिग्दर्शक, छायाचित्रकार आणि ग्राफिक डिझायनर आदित्य विक्रम सेनगुप्ता यांनी व्यक्त केले आहे. पूर्वी अगदी छायाचित्रे घेतानाही काही गोष्टीं अनिश्चित असल्याने त्यात जादू असायची, असे सेनगुप्ता यांनी 51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात “ पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर ऑफ व्हिजुअलयाजेशन या विषयावर दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पत्रकार आणि माहितीपट निर्माते रोहित गांधी यांच्याशी झालेल्या चर्चासत्रात सांगितले.
चित्रपट क्षेत्राची वृद्धी व्हावी यासाठी सेवा करणारा मी केवळ एक माध्यम आहे, असे आपल्या नव्या चित्रपटाच्या आखणीमध्ये व्यग्र असणाऱ्या या चित्रपट निर्मात्याने सांगितले. यावेळी त्यांनी आपल्यावर असलेला प्रभाव आणि प्रेरणास्थानांची माहिती दिली. माझे बालपण, मोठा होण्याचा काळ यांचा आपल्या चित्रपटांवर प्रभाव आहे. कोलकात्याशी आपला अतिशय घनिष्ठ संबंध होता आणि अगदी लहान वयापासूनच या शहराविषयी आपल्याला जिव्हाळा असल्याचे त्यांनी सांगितले. अपघातानेच आपण चित्रपटनिर्मिती क्षेत्रात आलो आणि प्रत्यक्षात आपल्याला डॉक्टर बनण्याची इच्छा होती, असे सेनगुप्ता म्हणाले. जीवनावर प्रेम करत राहायचे आणि त्यामध्ये इतरांना सहभागी करण्याचा माझा उद्देश होता. चित्रपट निर्मिती म्हणजे एखादी डायरी लिहिण्यासारखे आहे. मला जे काही व्यक्त करायचे आहे ते व्यक्त करण्याचे हे हे एक साधन आहे आणि मला त्याची अतिशय आवड आहे, असे त्यांनी सांगितले. ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल बोलताना ते म्हणाले की हे एखाद्या मॉलप्रमाणे आहे. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सामग्री आहे. आता चित्रपट ही कला उरलेली नाही. प्रत्येकजण जितक्या जास्त प्रमाणात काही निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे पण त्या प्रयत्नात परिपक्वतेसाठी वेळ उरलेला नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
सर्व चित्रपटांना एकाच श्रेणीत ठेवता येणार नाही. मी तयार करत असलेल्या चित्रपटांची आर्थिक गरज राजकुमार हिरानीच्या चित्रपटांपेक्षा वेगळी असेल. वाहिन्या, उत्पन्न, वितरण हे सर्वच वेगळे असेल. प्रेक्षकवर्ग वेगळा असेल, बाजारपेठा वेगळ्या असतील, असे सेनगुप्ता यांनी सांगितले.
2014 मध्ये या चित्रपट निर्मात्याच्या पदार्पणाच्या चित्रपटाने त्यांना 62 व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंदिरा गांधी सर्वोत्तम पदार्पण पुरस्कार मिळवून दिला होता. बॉलिवुड चित्रपटांमध्ये अद्यापही पूर्वीचा जुना फॉर्म्युला वापरला जात असल्याचे त्यांचे मत आहे. पण पूर्वी अतिशय भक्कम कथा असायची आणि आता मात्र कथेचे स्वरुप कमकुवत झाले आहे आणि त्या दिशेने खूप जास्त काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सुचवले. तरीदेखील आपण स्वतःला बॉलिवुडवासीच मानत असल्याचे आणि अनिल कपूर यांचे चित्रपट पाहायला आवडत असल्याचे एकेकाळी मिथुन चक्रवर्ती यांचे सर्वात मोठे फॅन असलेल्या या निर्मात्याने सांगितले.
Jaydevi P.S/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1690202)
Visitor Counter : 176