माहिती आणि प्रसारण मंत्रालय

ईश्वराची  कोणतीही निर्मिती केवळ  मासिक  पाळीमुळे  अशुद्ध ठरत नाही  याची आठवण आपले चित्रपट आपल्याला करून देतात – 51 व्या इफ्फीच्या इंडियन पॅनोरमा मधल्या ‘ब्रम्हा जाने गोपोन कोम्मोटी’ मधल्या प्रमुख कलाकार ऋतांभरी चक्रवर्ती


स्त्री-पुरुष समान असलेल्या समाजासाठी एकत्रित चळवळीचे बंगाली अभिनेते सोहम मुजुमदार यांचे पुरुष वर्गाला आवाहन

 

ईश्वराची  कोणतीही निर्मिती केवळ मासिक पाळीमुळे अशुद्ध ठरत नाही  याची आठवण आपले चित्रपट आपल्याला करून देतात असे मत ब्रम्हा जाने गोपोन कोम्मोटीया बंगाली चित्रपटातल्या  प्रमुख कलाकार ऋतांभरी चक्रवर्ती  यांनी व्यक्त केले.

गोव्यात पणजी इथे सुरु असलेल्या 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय  चित्रपट महोत्सव, इफ्फीच्या इंडियन पॅनोरमा मधल्या  फिचर फिल्म वर्गामध्ये हा चित्रपट दाखवण्यात आला. त्यानंतर दिग्दर्शक अरित्रा मुखर्जी, निर्माता शिबोप्रसाद मुखर्जी,पटकथाकार सम्राज्ञी बंडोपाध्याय, लेखिका झिनिया सेन आणि प्रमुख अभिनेते  सोहम मुजुमदार यांच्यासह घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. 

 

इफ्फिसाठी आपल्या चित्रपटाची झालेली  निवड हा चित्रपटाचा सन्मान आहे असे सांगून चित्रपटाचा विषय प्रत्येकाला आपलासा वाटणारा आणि मनोरंजक आहे. यामध्ये गंभीर विषयावर भाष्य करण्यात आले असले तरी तो  आनंददायी आहे. महिलांना सर्वत्र भेदभावाला सामोरे जावे लागते. पुजारी असलेल्या महिलेची ही कथा आहे. स्त्रियांच्या मासिक पाळीला निषिद्ध मानण्याबाबतची समजूत नष्ट करण्याचा लेखिकेचा उद्देश असून या चित्रपटात प्रमुख भूमिका  साकारायला मिळाली हा आपला सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

शबरी ही व्याख्यातीकलाकार आणि मुख्य म्हणजे पुजारी आहे. लग्नानंतर तिच्या जीवनातले अनेक  बदल स्वीकारण्यासाठी तिला कसे झगडावे लागले आणि पुजारी म्हणून विधी सुरु ठेवण्यासाठीचे तिचे प्रयत्न या चित्रपटात विनोदी ढंगाने मांडण्यात आले आहेत.  भारतीय समाजात मासिक पाळीला अद्यापही कसे  निषिद्ध मानण्यात येते याचे दर्शन घडवण्यावर चित्रपटाचा प्रामुख्याने रोख आहे. महिलांना प्रत्येक वेळी सुटकेची गरज नसते, आमच्याकडेही सांगण्यासाठी कथा असतात  असे त्यांनी नमूद केले.

ही कथा सांगण्याची गरज आहे असे मला जाणवले. मासिक पाळीमुळे धार्मिक विधीत भाग घेण्याला महिलेला नाकारण्यात आले तिथून हा प्रवास सुरु झाला असे पटकथा लेखिका झिनिया सेन यांनी सांगितले. हा आपला पदार्पणाचा चित्रपट असून या चित्रपटात आणखीही नवोदित असल्याचे त्या म्हणाल्या.  

पुरुषांनी एकत्रितपणे  पाऊल उचलले नाही तर स्त्री-पुरुष समान असलेल्या समाजाची निर्मिती आपण करू शकणार नाही असे मत चित्रपटात विक्रमादित्य ही नायकाची भूमिका साकारणाऱ्या सोहम मुजुमदार यांनी व्यक्त केले. विक्रमादित्य हा आपल्या पत्नीला तिच्या प्रत्येक पावलावर पाठींबा देतो,ते एकत्रित वाटचाल करतात असे त्यांनी  आपल्या भूमिकेविषयी सांगितले.

 

M.Chopade/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1689829) Visitor Counter : 372


Read this release in: Hindi , Urdu , Punjabi , English